कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू ....रसग्रहण
.jpg)
१९ एप्रिल १९३० श्रेष्ठ गायिका मालती पांडे यांची जयंती. मालतीताईंनी खेड्यामधले घर कौलारू, या कातरवेळी पाहिजेस तू जवळी, लपविलास तू हिरवा चाफा, त्या तिथे पलीकडे अशी एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत . कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू हे एक मातेची ममता महती सांगणार गीत आहे. घरात तान्हं बाळ झोपलेलं असलं की की आपण पाय नका वाजवू असे म्हणतो परंतु या गीतामध्ये निसर्गातील इतर घटकांनाही असे आवाहन केले आहे. गीताचे शब्द मातेच्या हृदयागत कोमल हळुवार आहेत. मालतीताईंनी ते अतिशय लडिवाळपणे गायलं आहे. अंदाजे चार एक वर्षांपूर्वी मालती पांडे यांच्या स्मृतिदिनी पुणे आकाशवाणीवर "आमच्या संग्रहातून "या सदरात त्यांची मुलाखत ऐकली आणि या गाण्याने माझ्या मनात घर केलं.आज मालती ताईंच्या जयंतीच्या निमित्ताने ते रेडिओवर पुन्हा ऐकायला मिळाले.खूप दिवसापासून या गाण्याचे रसग्रहण करण्याचे योजले होते ते आज फलद्रूप होत आहे. कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू नकोस चंद्रा येऊ पुढती थांब जरासा क्षितिजावरती चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू पुष्करिणीतून गडे हळुहळु जललहरी तू नको झ...