फळा - Black Board

फळा  - Black Board



फळा म्हटलं की आपणास शाळा कॉलेजचे दिवस आठवतात. परंतु याच फळ्याचा पुनर्प्रत्यय आमचे अपार्टमेंटमधील रहिवासी शाळेत न जाता दररोज  घेतात. हा फळा आहे मधुकोष अपार्टमेंटमधील गोखले काकूंचा. हा फळा अपार्टमेंट मध्ये राहायला आल्यापासून गेली सहा वर्ष काकू नियमितपणे  लिहीत आहेत. हा फळा आमच्या अपार्टमेंट मध्ये फारच लोकप्रिय आहे .विशेष म्हणजे  फळ्यावर अगदी दररोज नवीन लिखाण वाचायला मिळते. फळ्यावरील मजकूर व हस्ताक्षर दोन्ही गोष्टी  लक्ष वेधून घेतात.  या लिखाणास कोणत्याही विषयाचे बंधन नाही हे एक मनमुक्त लिखाण असते कधी कविता, कधी पाकक्रिया, कधी सुंदर कोटेशन्स,   कधी सणांविषयी आगळी माहिती, कधी जगातील छोट्या परंतु वेगळेपण जपणार्‍या देशांची थोडक्यात माहिती -बहुतांश मराठी तर कधी हिंदी व इंग्रजीत हा मजकूर  लिहला जातो .  असा एक प्रकारचा मनोहरी कोलाज या फळ्यावर आपल्याला वाचायला मिळतो. हा उपक्रम त्यांना स्वतःला व वाचकांना एक वेगळाच आनंद देतो. हा फळा अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर असल्याने सहजच प्रत्येकाच्या दृष्टीस पडतो. अपार्टमेंटमधील सर्व लहान थोर मंडळी, येथील रहिवासी मंडळीकडे येणारे नातेवाईक ,पाहुणेमंडळी आणि अगदी सुरक्षारक्षकही आवर्जून वेळ काढून वाचतात. प्रत्येकासच उद्या काय वाचायला मिळणार याची उत्सुकता   असते . काही हौशी ,दर्दी रसिक वाचक याचा फोटो काढून मित्रमंडळींना व्हाट्सअप वर शेअर  करतात . हा फळा वाचणे ती एक सहज प्रक्रिया झाली आहे. या वाचनातून आनंद व सकारात्मक ऊर्जा मिळते. दिवसाची सुरुवात चांगली होते .प्रसन्न चेहऱ्याने कामावर जाणारी मंडळी आपल्या इच्छित ठिकाणी मार्गस्थ होतात. काही जणांना सकाळी गडबडीत हा फळा नाही वाचता आला तर ते कामावरून परत घरी येताना आवर्जून वाचतातच. जसे उन्हाळ्यात बाहेर जाऊन आल्यावर माठातील थंड पाणी पिल्यावर जीवास दिलासा मिळतो तसेच फळ्यावरील मजकूर वाचनाने दिवसभरातील शीण कमी होण्यास मदत होते तर काही वेळेस असा मजकूर मन अंतर्मुख करून जातो. 



वास्तविक पाहता फळा हे शाळेच्या  काळ्या  पाटी पाठीचेच  मोठे रूप . शाळेत पाटी  व    फळा दोन्ही सोबत असतात. पुढे कॉलेजमध्ये व नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरमध्ये ही फळा आपल्याशी संवाद माध्यम म्हणून सोबत करत असतो.



  आज सकाळी   फळ्यावरील या एक सुंदर वाक्य -    " Truth is stranger than fiction, fiction has to stick to possibilities , truth need  not ! " वाचताना फळ्यावरील  लिखाण  आणि फळा  याबाबत काही विचार  मनात  उमटले . 

 माझ्या  बाल विकास मंदिर सोलापूर आदरणीय अवंतिका बाई केळकर  स्था पि त  शाळेतील फळा ( ही शाळा आता  ज्ञानप्रबोधिनी कडे  सुपूर्द करण्यात आली आहे ) त्याची आठवण झाली.   सदर  फळा हा शाळेच्या दर्शनी भागात  प्रवेशद्वारीच आहे . दररोज सकाळी आमच्या शाळेतील शिक्षिका  विशेषतः   आदरणीय           मठ बाई, बायस  बाई   या फळ्यावर सुंदर हस्ताक्षरात सुविचार तसेच शाळेतील  मुलांच्या वाढदिवसाच्या   नोंदी लिहीत असत. फळ्याच्या आजूबाजूस मोठ्या खिडक्या होत्या  व  त्या खिडक्यांवर  घाटदार, समान आकाराच्या काचेच्या बरण्यांमध्ये शाळेच्या आवारातीलच  रंगीबेरंगी फुले यांचे गुच्छ  करून  पाणी घालून   टांगून  ठेवलेले असत .  असा मनोहरी माहोल  शाळेत येतानाच आम्हाला पाहायला मिळत असे  व प्रसन्न मनाने  शाळेतील दिवसाची सुरुवात होत असे . या फुलांना जरी  गंध  नसला तरी त्यांचा  स्मरण गंध  आजही मनात  ताजा आहे.

 फळा म्हटलं   की  काही अपवाद वगळता तो काळ्या रंगाचाच असतो.  काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या  खडून  केलेले लिखाण चटकन  लक्ष  वेधून घेते .काही विशेष प्रसंगी मात्र  फळ्यावर  रंगीबेरंगी  खडूने  लिखाण   केले जाते. काळा रंग  हा आपल्या रुढी, परंपरा प्रथेनुसार  निषिद्ध  मानला आहे .परंतु फळ्याचा काळा रंग मात्र सर्वत्र  काळा असूनही सर्वमान्य  आहे .

 फळा पाहिल्यावर मला असे वाटते  की  सामान्य माणूस दैनंदिन जीवनात  जे दुःखाचे ओझे घेऊन  जगत असतो ते हे दुःख म्हणजे  फळ्याचे काळेपण  आहे आणि त्यावर दुःखावर मात करणे , धैर्यानी   अडचणींचा सामना  करणे   आणि सकारात्मक विचारांनी इच्छित ध्येय प्राप्ती करून घेणे. आपली ललाट  रेषा   बदलणे म्हणजे  आपला प्रयत्न रुपी पांढरा  खडू व आपल्या प्रयत्नास जोड देणारे मित्रमंडळी ,सहकारी नातेवाईक म्हणजे  विविधरंगी  खडू.  तर असा हा  फळा नियमित लिहता राहिला पाहिजे. खरंच ईश्वर आपल्याला प्रत्येकाला दररोज एक नवीन दिवस देत असतो त्याचा उपयोग आपण सत्कार्यासाठी, आत्मोन्नतीसाठी करावा म्हणून .  आपण मनाचा फळा दररोज रात्री स्वच्छ पुसून टाकावा म्हणजे येणारा नवीन दिवस प्रसन्न सकाळ घेऊन येईल "जगावेगळे व्हायचं असेल तर जगा  वेगळ ! " हाच संदेश आपल्याला संस्कृत  शिक्षिका  गोखले काकू यांच्या उपक्रमातून मिळतो त्यांना आदरपूर्वक  वंदन करून हा लेख  पूर्ण करतो.

टिप्पण्या

जयंत कुलकर्णी म्हणाले…
लेले साहेब फळ्याविषयी खूप सुंदर विवेचन केले आहे.शिवाय आपल्या सोलापूरच्या शाळेची आठवण मनाला भावली. मधुकोष मध्ये राहायला आल्यापासून मी देखील गोखले काकूंचा फळ्यावरील मजकूर आवर्जून वाचतो आणि त्याचा आनंद घेतो. त्यातील विविधता मनाला भावते. आपटे मॅडम देखील योग शिक्षिका म्हणून निस्वार्थ भावनेने महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने गोखले काकू आपटे मॅडम यांच्यासह मधुकोष मधील सर्व शिक्षक शिक्षिकाना सादर वंदन!
मदन करजगी म्हणाले…
सर, "फळा" एक उत्तम लेख.मधुकोष मधील गोखले काकूंनी नियमीत लिहीत असलेले मजकूर विषयी, शाळेतील फुल, आणि शेवट जीवनातील फुल असे उत्तम प्रवास. खूप छान. ह्या लेखनासाठी अभिनंदन. 👌🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी