ऑफ पिरीयड


ऑफ पिरीयड
शाळेत तसेच कॉलेजमध्ये शिकत असताना ठराविक वेळापत्रकाप्रमाणे विषय शिकवले जातात. विषय वेळ व शिक्षक/ प्राध्यापक यानुसार दैनंदिन अभ्यासक्रम सुरू असतो. काही वेळा मात्र असे घडते की काही कारणांनी नेमून दिलेले शिक्षक/ प्राध्यापक वर्गात येऊ शकत नाहीत. आणि मग अशावेळी तो तास ऑफ पिरीयड म्हणून घोषित केला जातो. शिक्षण घेत असताना एखादा विषय अथवा तो विषय शिकवणारे शिक्षक , त्यांची शिकवण्याची पद्धत आपल्याला आवडत नाही. आणि एखाद्या दिवशी असा नावडत्या विषयाचा पिरीयड जर ऑफ पिरीयड म्हणून घोषित झाला तर विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो. तो आनंद व्यक्त करण्यासाठी चेष्टा मस्करी, टिंगल टवाळी असे उद्योग सुरू होतात आणि हे सर्व घडत असताना एखादे नवीन शिक्षक आपल्या वर्गात प्रवेश करतात मग मुलांच्या गलबला थांबतो आणि आनंदावर विरजण पडते. परंतु काही वेळेस असे ऑफ पिरीयड ला येणारे शिक्षक मुलांशी अगदी वेगळ्याच विषयावर संवाद साधतात, त्यांना बोलते करतात ;मग असा ऑफ पिरीयड मात्र सर्वांनाच आनंद देऊन जातो आणि तो विषय आणि संवाद साधणारे शिक्षक कायम लक्षात राहतात. अशाच एका ऑफ पिरीयड ची ही गोष्ट आहे.

सोलापूर इथे दयानंद कॉलेज मध्ये १९७५ साली प्री  डिग्री कॉमर्स मध्ये मी नुकताच प्रवेश घेतला होता . कॉलेज सुरू होऊन एक दोन महिने झाले होते ; शाळेतील ओलावा संपून कॉलेजमधील नवीन वातावरणाशी जुळवून घेताना काहीसे कोरडे पण जाणवत होते . आम्हाला इकॉनॉमिक्स शिकवणारे प्राध्यापक रजेवर होते व आमच्या संस्थेच्याच आर्ट्स कॉलेज मधील मराठीचे प्राध्यापक वि. म . कुलकर्णी आम्हास ऑफ पिरीयड म्हणून वर्गात संवाद साधण्यास आले. ते मराठीचे प्राध्यापक व उत्तम कवी होते . सर वर्गात प्रवेशते झाल्यावर मला खूपच आनंद झाला . वि. म. म्हणजे शांत तरीही हसतमुख , बारीक मिशा ठेवलेले, वयानुसार डोईवर  विरळ केस आणि अर्धगोल चश्मा असं रूप . सोलापूर शहर त्यावेळी फारसं मोठं नसल्याने अशा व्यक्ती बहुतांश जणांना माहित असत. शिक्षक व प्राध्यापक यांच्या विषयी आदरयुक्त भीती असण्याचा तो काळ होता. आम्ही त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलपाशी राहत होतो. चालतच सर्वकडे जाणे अथवा फार अंतर असल्यास सायकल वापरली जात असे . आम्ही दोन तीन मित्र सायकलने सकाळी सात सव्वासातला कॉलेजला जायला निघत असू. सरही त्यावेळेसच गावातून कॉलेजला सायकलवरून येत असत. त्यांचा रस्ता व आमचा रस्ता एकच असल्याने अधून मधून दृष्टा-दृष्ट होत असे . अशावेळी ते मंदसे स्मित करीत असत. माझ्या बाबांची व त्यांची ओळख होती हे मला नंतर समजले तो प्रसंग असा - आम्ही घरातील सर्वजण एकदा अक्कलकोटला 'गणेश याग' हा विशेष यज्ञ असल्याने त्या  कार्यक्रमास एसटीने चाललो होतो योगायोगाने सर ही या प्रवासात आमचे बरोबर त्याच कार्यक्रमासाठी येत होते . कवि, लेखक कसा असतो ,कसा दिसतो याविषयी मला फार कुतुहूल होते व आजही आहे .त्यावेळेस तर ते खूपच अप्रूप असायचे . सरांना आमच्या समोरील बाकावरच बसायला जागा मिळाली . सर आपल्या जवळ बसले आहेत याचा मला भारी आनंद झाला. सरांचे व माझ्या बाबांचे थोडाफार बोलणं झालं. प्रवास छोटा असल्याने व यज्ञास खूपच गर्दी असल्याने नंतर आमची भेट झाली नाही. या पार्श्वभूमीवर काही दिवसातच ऑफ पिरीयड साठी सरांचा वर्गात प्रवेश झाल्यावर सर आज काय सांगणार यात कुतूहल माझ्या मनात जाग झालं. त्यांनी कविता शिकवावी असं मला वाटत होतं आणि तसंच घडलं. सरांनी वर्गावर एक दृष्टीक्षेप टाकला आणि ते स्टेजवरील खुर्चीत स्थानापन्न झाले . सरांनी सांभाळ ही वीणा ही त्यांचीच स्वतःची कविता आम्हाला त्या तासात समजावून सांगितली. कविता ऐकणं, समजावून घेणे हा एक वेगळाच आनंद असतो व एखाद्या कवी कडून त्यांची कविता समजून घेणे हा तर एक विलक्षण योगायोगच होता अगदी
From the Horses Mouth असा तो क्षण होता. आजही तो सुगंधी क्षण विमंच नाव घेतल्यावर माझ्या मनात ताजा होतो.
तासाची सुरुवातच सरांनी अशी केली ते म्हणाले" आज मी तुम्हाला माझीच एक कविता सांगणार आहे खरं तर ही कविता आता माझी राहिली नाही ती आता तुमच्या मालकीची झाली आहे. कविचे शब्द पाटीवर  अथवा कागदावर उमटे पर्यंतच त्याचे असतात नंतर मात्र त्यांच्यावर जनमानसाचीच मालकी असते." अशी ही सुरुवात झाल्यामुळे वर्गात सर्वांची उत्कंठा वाढीस लागली सर पुढे म्हणाले " ही कविता आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील वीणे भोवती गुंफलेली आहे .सातशे वर्षांपेक्षाही जास्त काळ होऊनी ही वीणा सतत झंकारत आहे . ही वीणा कधीही खाली ठेवलेली नाही. कुणी न कुणी वारकरी अथवा भाविक ही वीणा गळ्यात घालून नामस्मरण , भगवंताचे गुणगान करीत आहे." सरांनी मग कविता म्हणत अर्थ समजावून सांगितला.

" बाळराजे पहाट वेळ झाली !
रात्रभर आम्ही पहारा केला
आताही वीणा आमच्या हातांनी
तुमच्या गळ्यात घालू द्या
उभा जन्म
उन्हा पावसात
जिवाभावाने सांभाळीत आणली आहे !

ही वीणा
कवित्वाची
कर्तुत्वाची
भोकर्तुत्वाची
तुमच्या गळ्यात घालू द्या
तुम्हाला डोळे भरून पाहू द्या !

.. आम्ही बरोबर घेऊन आलो
सज्जनांची प्रीती, श्रीहरीची भक्ती
पंढरीची वाट
आमच्या घरासमोरून
रोज देवाला जात होती :
ही माळ साक्षी ठेवा !

आम्ही जोडले गावोगाव सोयरे
त्यांच्या उराउरी भेटी - नेत्रांतील  पाण्यात
भिजलेल्या
आम्ही कधी विसरणार नाही :
तुम्ही त्या पुढे चालवा !

आम्ही बांधले सात्विकाचे घर
भलेपणाचा पायावर
भल्या भल्यांची पायधूळ झडते आमच्या घरी :
ती तुम्ही कपाळी लावा ! "


अशाप्रकारे कवितांच्या कडव्यांचे विवेचन सर करत गेले .सारा वर्ग शांतपणे ते ऐकत होता. मी तर मनाचे कान करून हे ऐकत होतो. त्यादिवशी कविता सरांनी उलगडून दाखवली खरी; परंतु ते वय सर्व अर्थ अवकाशामध्ये येईल एवढे निश्चितच नव्हते. सरांच्या वाणीने मंत्रमुग्धच झालो होतो मी. म्हणूनच सरांनी कवितेचा सांगितलेला सारांश आजही लक्षात आहे जसाचा तसा. कवितेचा त्यावेळी समजलेला आणि आता उमजलेला अर्थ असा आहे.

ज्ञानदेवांच्या समाधीस्थळी आळंदीत ज्याप्रमाणे वीणा अखंडपणे झंकारत आहे याप्रमाणेच प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना कधी अंतर देत नाहीत. तान्हुल्याला प्रथम हातावर, लहानग्याला नंतर खांद्यावर, नंतर बोट धरून तर कधी डोईवर घेऊन, उत्तम संगोपन करून त्याला जगाची ओळख करून देतात. हे सर्व होत असतानाच संस्कारक्षम वय असल्यामुळे मुलांकडे घराण्याचा वारसा,जीवनमूल्ये असे संस्कार संचित संक्रमित होत जाते . फुल फुलते त्या वेळी चांगले दिसते , अवती भवती सुवास सुगंधी पसरतो परंतु हे सर्व कसं घडतं हे मात्र पाहता येत नाही कारण ही एक निसर्ग किमया आहे . कळ्यांची जशी फुले होतात तशीच मुलं मोठी होत जातात व शैक्षणिक क्षेत्रात, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आणि सामाजिक उपक्रमात उत्तरोत्तर यशाच्या पायऱ्या चढत एके दिवशी आई वडिलांचे नाव उज्वल करतात; त्यावेळी त्या माता-पित्यांना होणारा आनंद आगळाच असतो. अशा सुखदायी क्षणांची त्यांनी मनात आस धरलेली असते आणि म्हणून 'भरून पावलो 'असाच तो क्षण असतो.

माणसाने आयुष्यात सर्वांना धरून राहून वैयक्तिक आणि सामूहिक प्रगती साधावी, समाधानी वृत्तीने जीवनातील घटनाक्रम स्वीकारावा, अन्यायाचा मुकाबला करावा तरीही कर्तव्याशी बांधील असावे व सर्वात महत्त्वाचे कृतज्ञ भाव मनी कायम असावा . अशा वर्तनातूनच कवीला स्वतःला जीवनाची सफलता लाभली असल्याने , या सर्व उदात्त भावाचं कवितेत चित्रण उमटलंआहे. हाच सद्गुणांचा वारसा पुढील पिढीस देताना तसेच कृतिशील वर्तन त्यांच्याकडून घडावे अशी अपेक्षा कवितेतून व्यक्त झाली आहे .

वि.म. ना आळंदीच्या ज्ञानोबा माऊली मंदिरातील वीणेचा झंकार सतत आयुष्यभर जाणवत होता.
आदरणीय वि.म. हे पंढरपूरचे असल्याने लहानपणापासूनच अध्यात्मिक ,समाजहितैषी विचारांच्या संस्कारात आणि भेदाभेद विरहित वातावरणात वाढले म्हणूनच ही कविता तसेच त्यांच्या बऱ्याच कविता कल्याणप्रद ,प्रासादिक भाव व्यक्त करणाऱ्या आणि सामान्य संसारिक माणसाच्या मर्यादा दाखविणाऱ्या आहेत.
तर असा हा अलौकिक आनंद देणारा ऑफ पिरीयड मला वेगळीच ऊर्जा देऊन गेला व माझ्यात कवितेची विशेष आवड निर्माण करून गेला. सदगुण रूपी वीणेचा झंकार व जागलेपण जे या कवीला लाभले, ते तुम्हा आम्हा मिळो. आदरणीय वि.म. च्या स्मृतीस त्रिवार वंदन करून आणि त्यांच्याच आणखी एका कवितेतील ओळी उदृत करून या लेखाचा शेवट करतो.

" रस्ता मोकळा मोकळा
घराच्या पुढचा
रात्रभर एकटाच
सहवास ना कुणाचा
महापालिकेचे दिवे सारी रात्र जागतात
आम्ही आहोत सोबतीला रस्त्याला सांगतात ".


तळटीप : "सांभाळ ही वीणा " कविता दहा कडव्यांची आहे . मृगधारा -वि.म. ची निवडक कविता या काव्यसंग्रहात समाविष्ट आहे. संपादक डॉक्टर अनुराधा पोतदार, प्रकाशक सुविचार प्रकाशन मंडळ पुणे.

टिप्पण्या

Kshama Paranjape Ganu म्हणाले…
लेले जी, खूपच अप्रतिम लेखन....आणि कविता फारच सुंदर....तसेच त्या कवितेबद्दल सांगितलेली पार्श्वभूमी यामुळें ती कविता जास्त उत्तम प्रकारे प्रकट झाली आणि समजून घेता आली.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
तू लेख वाचून लगेचच कळवलंस छान वाटलं. लेख लिहिला मला आनंद झाला तो आपल्या सारख्या दर्दी रसिकांनी वाचला की अधिक आनंद होतो..
Manisha Mehendale म्हणाले…
नि:शब्द.....वाचताना वर्ग डोळ्यांसमोर उभा राहीला...कविता आणि रसग्रहण अप्रतिम...

आमच्या शाळेतल्या जोगळेकर बाईंची आठवण आली....इतिहासाच्या तासाला पुस्तक कधीच हातात घेतले नाही ...आणि दर शुक्रवारी मृत्यूंजय माझी जन्मठेप अशी पुस्तके वाचूून दाखवायच्या...
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
मनःपूर्वक आभार।.
शिरीष लवाटे म्हणाले…
कुलकर्णी यांच्या काव्याला आपल्या लिखाणाने योग्य साज चढला आहे.
अनामित म्हणाले…
नंदु,
" सांभाळ ही विणा " आपले मा. प्रा. कविवर्य वि. म. कुलकर्णि यांनी लिहिलेली व आपणास तसेच इतर मित्रांना " आँफ पिरियड " असताना सार्थ, रसग्रहण करून सांगितलेली हि कविता व त्यावरील तुझे लेखन खूपच मनभावन आहे. कवितेत ओतयप्रोत भक्तीरस सामावलेला असून आध्यात्मिक पातळीवर कवितेची उंची सहज जाणवून देतो. अप्रतिम !
संजीव चांदोरकर.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
संजू तुझा अभिप्राय वाचून खूप आनंद झाला या कवितेमुळे मला साहित्य वाचनाची विशेषतः कवितेची जास्त आवड निर्माण झाली त्यामुळे सर कायम हृदयस्थ झाले.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
संजू तुझा अभिप्राय वाचून खूप आनंद झाला या कवितेमुळे मला साहित्य वाचनाची विशेषतः कवितेची जास्त आवड निर्माण झाली त्यामुळे सर कायम हृदयस्थ झाले.

१३ मे, २०२२ रोजी ३:३८ PM
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
तुमचा लेख वाचला आपला आवडता कवी ऑफ तासाला येणे
आणि त्यांनी आपली कविता निरुपणास घेणे म्हणजे सो नेपे सुहागा हा आनंद आपण अतिशय
लालित्यपूर्ण शैलीत शब्दांकित केला आहे असे प्रसंग मनात घर करून रहातात आणि त्यांची आठवण बकुळीच्या फुलासारखी असते
सुंदर लेख
अशोक आफळे कोल्हापूर
मुकुंद इंगळे म्हणाले…
अप्रतिम लेख आहे...पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा...आणि कविता तर ...वाचतानाच
मनात वीणा झंकारु लागते.अद्वितीय
विजय रणसिंग म्हणाले…
ऑफ पिरियड...
खूप सुंदर लिहिलंय श्री नंदकिशोर लेले साहेब
जुन्या आठवणींना उजाळा देणारं लिखाण नेहमी एक वेगळाच आनंद देऊन जातं. तुम्ही कवी मनाचे तर आहातच पण चांगले लेखक पण आहात. लिहीत रहा.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
सुप्रभात श्री विजयजी. आपला अभिप्राय वाचून खूपच आनंद झाला. त्याची मी वाटच पाहत होतो आपल्यासारखे उत्तम वाचकच दररोज ऊर्जा देत असतात. खूप खूप धन्यवाद.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी