मृ‍दगंध..

उन्हाळ्यातील सुट्यांचा मौसम आता संपून लवकरच शाळा सुरू होतील. जून महिन्यातील शालेय जीवनातील आठवणींची लड उलगडणारा -मृ‍दगंध हा छोटासा लेख
मृ‍दगंध. ...
एक जूनची सकाळ झाली आणि खिडकीतून 'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ' हा कुमार गंधर्व यांनी गायलेला तुकारामांचा अभंग कानी पडला. लगेचच मन लहानपणात गेलं. जून महिन्यातील शालेय जीवनातील आठवणींची लड मनात उलगडू लागली. उन्हाळ्यातील सुट्यांचा मौसम आता संपून लवकरच शाळा सुरू होतील. वसंतातील नव्हाळी आणि ग्रीष्मातील लाही लाही संपून वर्षा ऋतू लवकरच धरतीवर आपलं अधिराज्य गाजवण्यासाठी हजर होईल. पहिला पाऊस हा तृषार्त धरतीवर पडतो आणि या उराउरी भेटीतून मृद्गंध आसमंती दरवळतो. जून महिना म्हणजे- शाळेतील पहिला दिवस , नवीन नवीन इयत्तेत पदार्पण, बाजारपेठेत पुस्तकं ,वह्या ,कंपास पेटी दप्तर , रंगीबिरंगी रेनकोट ,शाळेचा ड्रेस इत्यादी वस्तूंची खरेदी व ती घेण्यासाठी आई बाबा व लहानग्यांची उडणारी झुंबड, घरी आल्यावर नवीन पुस्तकांना ब्राऊन पेपर्सचे कव्हर घालणे, नवीन पुस्तकांशी पाने उलगडताना येणारा विशिष्ट वास, नवीन वर्ग भरत असलेल्या खोलीत / इमारतीत होणारा बदल, खिडकी शेजारचा बाक बळकवण्यासाठीची मुलांची धडपड, बाल मित्रांची उन्हाळी सुट्टीत काय मजा केली याची चर्चा , बदली झाल्यामुळे पूर्वीची शाळा बदलून नवीन शाळेत येणारी मुलं आणि त्यांना जुने मित्र ,जुनी शाळा हे सोडून नवीन ठिकाणी येताना बाल मनात उठलेली थोडीशी भीती आणि त्याचबरोबर नवीन मित्र कोण मिळणार याचं कुतूहल, अभ्यासाचे काही नवीन विषय , नवीन वर्गशिक्षक याबाबतची उत्सुकता असा सुंदर मनोहारी कोलाज मनःपटलावर उमटत गेला. साधारण पन्नास वर्षांपूर्वी त्याकाळी खेडेगावातून येणाऱ्या काही मुलांचे वाढदिवस एक जूनला असत (जरी प्रत्यक्ष जन्मतारीख वेगळी असली तरी). याचे कारण मास्तरांनी आई-वडिलांच्या संमतीने शाळा प्रवेश वयाच्या दृष्टीने सुलभ होण्याचा मार्ग म्हणून ही तारीख निवडलेली असे. शाळा सुरू होण्याअगोदर माझे बाबा आम्हाला जुन्या वह्यांमधील कोरी पाने बाजूला काढून काची दोऱ्याने शिवून कार्ड पेपर चे कव्हर असलेल्या एक दोन तरी वह्या बनवून देत असत. काहीवेळा जुन्या वह्यांमधील कोरी पाने बाजूला काढून बायंडर कडे देऊन नवीन वह्या केल्या जात असत.जवळपास प्रत्येकाच्या घरी हा उद्योग चालत असे. फाउंटन पेन आणि तेही AIRMAIL कंपनीचे व Globe या कंपनीची कंपास पेटी मिळणे ही एक चैन असे. फाऊंटन पेनाचा रंग पाण्यात हळदी कुंकू भिजवून बदलण्याचा आनंद काही वेगळाच असे. जून मध्ये शाळा सुटून घरी येताना येणारा पाऊस व त्यात भिजणे याची मजा औरच होती. पावसाचे पाणी रस्त्याच्या कडेला आणि घरच्या अंगणात साठलं असल्यास कागदी नावा तयार करून त्या मंदगतीने वाहत्या पाण्यात सोडण्याचा आणि न्याहाळण्याचा आनंद वेगळाच असे.
याच काळात घरी गुळंबा, साखरांबा , कैरीचं लोणचं आई तयार करत असे . या जिनसांनी  भरलेल्या चिनीमातीच्या फिरकीच्या झाकणाच्या बरण्या / काचेच्या बरण्या आणि त्यावर संरक्षक असा मऊ सुती कपड्यांचा बांधलेला दादरा यासह लाकडी फळीवर विराजमान झालेल्या असत. शाळेमध्ये डब्यात आई दररोज त्यातीलच काहीतरी देत असे. मधल्या सुट्टीत सारे मित्र एकत्र बसून डबा खायचा आनंद घेत असू. काही मुले आर्थिक परिस्थिती गरीब असल्याने जुनी पुस्तकं विकत घेत असत. आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असल्याने अशा मुलांचे आई-वडील हेडमास्तर यांना भेटून शाळेची फी भरण्याची मुदत वाढवून घेत असत ( त्यांच्या चेहऱ्यावरील आर्जवी भाव आज जास्त जाणवतात) . आमच्या बालविकास मंदिर ,सोलापूर शाळेत बाहेरून ड्रेस आणण्यास सक्त मनाई होती. जून महिन्यात सुरुवातीस काही दिवस आम्ही मागील वर्षाच्या ड्रेस घालून जात असू. जूनमध्ये शाळा उघडल्यावर आठवडाभरातच पतंगे टेलर्सचे मालक- सर्व मुला मुलांची ड्रेस ची मापे घेऊन लालसर तपकिरी रंगाचा ड्रेस शिवत असत. हा ड्रेस घालण्यास आमची नाखुषी असे कारण तो ढगळ सर शिवलेला असे आणि त्यामुळे इतर शाळेतील मुले आमची टिंगल उडवत असत. तर असा हा अ-जून लक्षात राहीलेला जून महिन्याचा आठवणींचा मृद्गंध.
आदरणीय कुमार गंधर्व यांच्या अतिशय आर्त भावनेने गायलेल्या अभंगाने मला आज वयातील मोठेपण विसरायला लावून अलगद बालपणात नेलं . जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरणी लीन होऊन आणि महान गायक कुमार गंधर्व यांना वंदन करून लेखाचा शेवट करतो.

' तुका म्हणे बरवे जाण
व्हावे लहानाहून लहान 
महापुरे झाडे जाती
तेथे लव्हाळ वाचती '


 

https://youtu.be/vdAzmboHigg
आदरणीय गोखले काकू  अभिप्राय 









टिप्पण्या

संतोष दोशी म्हणाले…
खूप सुंदर.मन हळूच त्या वयात आणि शाळेत जावून पोहोचलं.
संतोष दोशी
Unknown म्हणाले…
खूप छान.👌👌
रम्य ते बालपण!😊
Unknown म्हणाले…
बारकावे छान टिपले आहे.. आता पुनः प्रत्यय येतोय... असच लिहीत रहा.... सतीश नेरकर
मदन करजगी म्हणाले…
सर, खूप छान वर्णन. काही निवडक चित्र डोळ्यासमोर येऊन गेल्या. धन्यवाद. 👌👌
शालेय दिवसांची आठवण आली .
मन भूतकाळात गेले आणि मी तर केव्हाच शाळेतल्या नवीन वर्गाच्या बाकावर जाऊन बसले. अतिशय सुंदर लेख 👍👍
अनामित म्हणाले…
सुरेख वर्णन……मन खरंच त्या सोनेरी काळात फिरुन आले……..सांत्वना
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपल्या अभिप्रायाने नवीन लेखनासाठी उत्साह मिळतो खूप धन्यवाद
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आदरणीय गोखले काकू अभिप्राय....हस्तलिखित मूळ लेखाच्या खाली image दिली आहे.
जयंत कुलकर्णी म्हणाले…
बाल पणीच वर्णन वाचून माझ्याही शाळेतील आठवणी, शाळा प्रवेशाची लगबग, पुस्तके पाटी दप्तराची खरेदीच्या आठवणी जाग्या झाल्या. शाळा तीन गावात झाल्याने प्रत्येक ठिकाणी वेगळे मित्र त्यांच्याही आठवणी जाग्या झाल्या. एकूणच बाळ पणीचा काळ सुखाचा असे वाटून गेले. लेख खूप सुंदर आहे. आवडला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी