आकाश पांघरुनी.....हलकं फुलकं या सदरातील लेख क्रमांक २


हलकं फुलकं या सदरातील लेख क्रमांक २

आकाश पांघरुनी.....

१९९७-९८ साल असावे नोकरीनिमित्त मी साताऱ्याला होतो ; दैनिक ऐक्य मध्ये रमेश तेंडुलकरांची व्यंगचित्रे येत असत. थंडी सुरू झाली आणि तीचा जोर वाढत चालला की मला नेहमी मंगेश तेंडुलकर यांच्या एका व्यंगचित्राची आठवण होते. व्यंगचित्रात वर्णन केलेला प्रसंग असा आहे -'मुंबई महाबळेश्वर लाल एसटी बस शिरवळ थांब्यावर थांबली आहे आणि दोघं प्रवासी महाबळेश्वरला थंडी कशी आहे याची चर्चा करत आहेत आणि त्याला एका प्रवाशांकडून उत्तर मिळतं- 'काय ईचारू नका निस्त नाव काढलं तरी घाम फुटतुया !'

थंडी आणि पांघरूण यांचं अतूट नातं आहे. तसं पाहिलं तर पांघरूण तर आपण दररोज वापरतोच परंतु इतर ऋतू पेक्षा हिवाळ्यात त्याची संरक्षणासाठी जास्त गरज असते जेणेकरून उब निर्माण झाल्याने झोप शांत लागते. पांघरूण प्रकारही विविध आढळतात जसे सोलापुरी चादर, पंढरपुरी घोंगडी .कांबळ, कापसाच्या जयपुरी दुलया, दोहर,जुन्या कापडांच्या वाकळ ,गोधड्या, वुलनच्या शाली ,ब्लांकेट्स इत्यादी. हवामानाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि व्यक्तीची प्रकृती यानुसार याचा वापर होत असतो. हा झाला पांघरूण या शब्दाचा सरळ अर्थ परंतु पांघरूण हा शब्द , शब्दप्रयोग म्हणूनही वापरला जातो. काहीवेळा एखादं मूल मोठेपणी व्यावहारिक जगात नीट न वागल्यास घरातील लोकांनी चुकांवर पांघरूण घातल्यामुळे असं घडलं आहे असं बोललं जातं. मातृ-पितृ छत्र हरपल्यावर नातेवाईक आप्तस्वकीय भेटून सांत्वन करतात आणि मायेचं पांघरूण घालतात. नैसर्गिक आपत्ती, अपघात घडल्यावर ही समाजातील सर्वच स्तरातील लोक आपदग्रस्तांना भेटून विविध प्रकारे मदत करतात हे ही एक मायेचे पांघरूणच असते ;ज्यामुळे त्या भयभीत जीवांना उब मिळून जीवनास पुन्हा उभारी धरण्यास मदत होते. नोकरीतून निवृत्त होताना निरोप समारंभात गुणगौरव करुन शाल श्रीफळ देऊन सत्कार केला जातो ही शाल म्हनजे नोकरी काळात केलेल्या कार्याची पोचपावती, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आविष्कार आहे; जरी नोकरीतले नातं संपलं तरी वैयक्तिक मायेचं नातं जपण्याची ही एक सुरुवात असते. थंडीमध्ये काही उदार मायाळू अंतकरण असणारी माणसं, संस्था एकत्र येऊन रस्त्यावर अपुर पांघरूण घेऊन झोपलेल्या अभागी जीवांच्या अंगावर गुपचूप नकळत उबदार पांघरुण घालून जातात व अशा उदारतेतून स्वतः ही ऊब मिळवतात. भटक्या मुक्या प्राण्यांना ही अभावाने का होईना थंडी ऊन आणि पाऊस यासाठी संरक्षण देण्यासाठी आसरा दिला जातो. बाबा आमटे आणि कुटुंबीय मंडळी समाजातील दुर्धर रोगाने पछाडलेल्या ग्रासलेल्या जीवांना आनंदवन उभं करून आगळवेगळ मायेच पांघरूणच घालत आहेत . 'तेथे कर माझे जुळती'असचं हे कार्य आहे. थंडी खूप पडल्यावर देवळातील देवदेवतांच्या मुर्तीसही लोकरीचे कपडे, जाकीट ,मुंडासे घातल्याचे आपणास पाहायला मिळते. साधुसंतांच्या समाधीवरही उंची वस्त्रे अच्छादलेली असतात. मुस्लिम बांधवांच्या कबरीवर ही उत्तम वस्त्र घातलेले असते. चर्चमधील पादरी पोप ही खांद्यावरून खाली येणारे असे छोटे वस्त्र परिधान करतात. माणसाने प्राण सोडल्यावर ही पार्थिवावर मायेने शाल पांघरली जाते. निसर्गातही वसंत ऋतु येताच पानगळीची जागा नवीन पालवी घेते सृष्टी नवीन रूप धारण करते ;वर्षा ऋतूत डोंगर पर्वतरांगा हिरवाईने नटून जातात. जुने डेरेदार वृक्ष पांथस्ताना सावली देतात व हायसं करतात. हे ही एक मायेचे पांघरूण म्हणायचं. आपल्या सर्वांची लाडकी अत्यंत गुणी अभिनेत्री स्मिता पाटील आपल्या बाळाला जन्म देऊन लगेचच जग सोडून गेली आणि आजी आजोबांनी त्या बाळास मोठं केलं. ज्या मातांना बाळ लहान असताना स्तन्यपान करताना दूध येत नाही अपूर असतां त्यांना Milk Bank सारख्या उपक्रमातून मदत मिळते. अनाथ मांजराच्या पिलांना कुत्र्याची आई दुध पाजत आहे अश्या बातम्याही आपण वाचत असतो. कविमन हे सार मनाच्या टिप कागदावर टिपत जाते - रात्रंदिन फिरे अवनी ,सुखदुःख भिडे कवी हृदयी अशीच काव्य प्रक्रिया असते. तीन-चार वर्षांपूर्वी अशाच एका थंडीत मी घराच्या गच्चीतून दाट धुकं पडल्याचा अनुभव घेत होतो आणि त्याच वेळी मला माता व बालक यांचं वात्सल्य नातं व्यक्त करणाऱ्या दोन ओळी सुचल्या-
" धुकं आलं दाटून,
शाल घ्यावी पांघरून
बाळाला थोडा गोंजारून,
पापा घ्यावा आवेगून"
या काव्या मधील दृश्य प्रसंग असा आहे-पहाटेची वेळ आहे , थंडी पडली आहे आणि थंडीचा अंदाज घेण्यासाठी माऊली गच्चीचं दार उघडते आणि तिला धुकं दिसतं; क्षणार्धात ती गच्चीचं दार बंद करते आणि पाळण्यात झोपलेल्या आपल्या तान्हुल्याकडे धाव घेते; बाळाच्या अंगावर पांघरूण नीट आहे ना याची खात्री करते; बाळ तर भरपूर पांघरुणात शांत निद्रिस्त असतं मग ती त्याला गोंजारते आणि आवेगाने त्याचा पापा घेऊन आणखीन ऊब देते. संत सहवास, संताचे अभंगही आपलं सैरभर मन शांत करून मायेचं पांघरूण घालत असतात. जगजेठी कुणी ना कोणाला तरी सोबत असतं म्हणून हे जग चाललेलं असतं हे सांगताना पंढरपुरात वाढलेले प्रसिद्ध कवी वि म कुलकर्णी एका कवितेत म्हणतात -
"रस्ता मोकळा मोकळा घराच्या पुढचा
रात्रभर एकटाच सहवास ना कुणाचा
महापालिकेचे दिवे सारी रात्र जागतात
आम्ही आहोत सोबतीला रस्त्याला सांगतात."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण