फिरत्या चाकावरती...


श्री शारदा माता प्रसन्न

फिरत्या चाकावरती...

शिवरात्र झाली थंडी संपत जाते आणि मार्च महिना उन्हाळा ऋतु बदल जाणवू लागतो . आपले पाणी पिण्याचे प्रमाण वाढू लागते. जरी फ्रिज असला तरी माठातील/ डेऱ्यातील गार पाणी पिण्याचे समाधान काही औरच. घरी नवीन माठ आणायला हवा असा सूर निघू लागला आणि संध्याकाळी मी व आमचे शेजारी बापूकाका माठ आणण्यास चालतच बाहेर पडलो. चालता चालता डेरा महात्म्य वर्णन सुरू झाले. सोलापूरकडे माठाला डेरा म्हणतात. या मातीच्या घड्याचे अनेक प्रकार आहेत-अगदी संक्रांतीची सुगडी, बोळकी ,दह्यासाठी वापरली जाणारी गाडगी, लाल अथवा काळ्या मातीचे माठ ,रांजण, कुंभ वगैरे .यात आणखीन एक प्रकार म्हणजे महाराष्ट्रा बाहेरील राज्यातून येणारे विविध घाटाचे माठ तोटीचे चे अगर बिनतोटीचे इत्यादी. ज्या ठिकाणी उष्णता जास्त आहे तिथे माठातील पाणी हे पुरवणीस येणारे व समान गार पडत असलेने आरोग्यदृष्ट्याही हितकारक असल्याने त्याचा वापर हा होतोच. शेतावर तसेच वाड्यावस्त्यावर, गावाकडील बस थांबे रेल्वेस्टेशन्स इत्यादी ठिकाणी माठ/ लाल कापड लावलेले रांजण येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची तहान भागवतात आणि अशी पाणीपुरवठा सेवा देणार्यांना थकल्याभागल्या क्लांत जिवांकडून दुवाही मिळतात. माठ रात्री भरून ठेवल्याने रात्रभर पाझरल्याने सकाळी गार पाणी मिळते. चाळीस वर्षांपूर्वी फ्रीज ही अगदी ही चैनेची वस्तू होती, त्यामुळे दर उन्हाळ्यात घरोघरी नवीन माठ आणले जात असत. सोलापूरला आईबरोबर मी 'लक्ष्मी मंडईत' माठ आणण्यासाठी जात असे.तिथे माठ विकणारे चार पाच कुंभार असत. माठ विकणारा कुंभार त्याच्याकडे असलेल्या माठांवर छोट्या काठीने टन टन असा आवाज काढून दाखवत असे " कुठला बी घ्या अस्सल माल आहे ताई, जरा बी काळजी करू नका ,वाटलं तर पाणी भरून गळका नाय ना खात्री करून दावतो "असं म्हणत असे. आई चार-पाच माठ नीट बघून आणि न्याहाळून चांगला भाजलेला डोळे दिसणारा माठ वाजवून विकत घेत असे. हे सर्व चालू असेपर्यंत तो कुंभार दुसऱ्या गिर्‍हाईकाला माठ उत्तम आहेत हे पटवून देण्यासाठी माठावर उभे राहूनही दाखवत असे. अशा तऱ्हेने अनेक क्लुप्त्या करून माठ विक्री चालू असे. कुंभार माठावर उभा राहिल्यावर (सोलापूरी भाषेत उभारल्यावर) तो माठ कसा फुटत नाही व कुंभाराचा तोल कसा जात नाही याचे भारी कुतुहूल असे. आता पुण्यात कुंभारवाडा भाग वगळता बहुतेक ठिकाणी बाहेरच्या राज्यातून आलेले लाल रंगाचेच उभट घागरीच्या घाटाचे मटके आणि खुजे विक्रीस ठेवलेले असतात. गावाकडील मातीचे माठ मिळतात का बघावे म्हणून आम्ही दोन-तीन ठिकाणी फेरफटका मारला. नशिबानी मला गावाकडील चांगला भाजलेला डोळे असणारा मातीचा माठ मिळाला. बापू काका यांनी ते विदर्भातील असल्याने लाल खूजा पसंत केला. सिंहाचे तोंड असलेले खुजे पूर्वी मिळत असत अशी आठवण त्यांनी सांगितली. 

काकांना आणि मला गाण्याची खूप आवड असल्याने माठ/मटका चा उल्लेख असणाऱ्या , त्याभोवती गुंफलेल्या गाण्यांची ही चर्चा माठ घेऊन परतताना झाली. 'मोहे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे' या मुगले आज़म या चित्रपटातील मोहक आणि लडिवाळ अभिनेत्री मधुबाला वर चित्रित झालेले गाजलेले गाणे काका गुणगुणायला लागले त्यांची तल्लीनता बघून गाणे पूर्ण होईपर्यंत आम्ही त्या कुंभाराच्या दुकानातच थांबलो. हे गाणं साध सोपं असून राधा व तिच्या सख्या पाणवठ्यावर मटका घेऊन पाणी भरून निघाल्या असताना कृष्ण राधेची खोडी काढतो आणि डोईवरील माठाला हानी पोहोचून तो फुटून तिचा अंगावरील घागारा पूर्णपणे भिजून जातो आणि नेत्र पल्लवीने प्रेमालापात तिचा घुंगटही दूर होतो . वास्तविक कृष्ण प्रेमाने मनाने राधा आणि राधिका भिजत असतानाच आता राधेचे तनही भिजून जाते . मटक्यातील जल जरी वाहून गेले तरी गीतातील अतिशय अर्थवाही शब्दरूपी जल आपलं पोट आणि हृदय भरून टाकते . आदरणीय शकील बदायुनी या गीतकाराच्याच लेखणीची ही अदाकारी आहे. पाणवठा ही अशी जागा आहे जिथे स्त्री सख्या पाणी भरण्यासाठी आल्या असताना एकमेकीशी मोकळेपणाने वार्तालाप करतात जणू आपल्या मनातील जे काय आहे ते खुलेपणाने बोलून मन मोकळ करतात जसे धड्यातून पाणी बाहेर ओतलं जात आणि घड्यामध्ये पाणी भरून घेऊन परत जगरहाटी संसारात परतात.
विठ्ठला तू वेडा कुंभार, ये ग ये ग सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून, माटी कहे कुम्हार को अशा सर्व गाण्यांची आठवण निघाली.विठ्ठला तू वेडा कुंभार हे गाणे प्रपंच या मराठी चित्रपटातील असून यात कुंभाराच्या जीवनाशी निगडित कहाणी गुंफलेली आहे. आधुनिक वाल्मिकी गदिमा यांनी अनेक गाणी मराठी चित्रपट सृष्टीला देऊन मोठे वरदानच दिले आहे.प्रपंच या चित्रपटासाठी त्यांनी उत्तम गाणी दिली त्यातीलच विठ्ठला तू वेडा कुंभार, पोटापुरता पसा पाहिजे या खास गाण्यांची चर्चा करता करता आम्ही घरी परतलो . घरी आलो आणि डेऱ्याचा मातकटपणा जावा म्हणून डेरा तीन-चार वेळा आतून-बाहेरून चांगला धुऊन घेतला आणि पाणी भरून ठेवून तिवईवर ठेवला. हात-पाय धुऊन हायसं व्हावं म्हणून दिवाणवर पहुडलो खरा, परंतु डोक्यातून डेऱ्यावरील डोळा आणि देसी डोळे परि निर्मिसी तयापुढे अंधार या विठ्ठला तू वेडा कुंभार गाण्याच्या कडव्यातील ओळी पुन्हा पुन्हा रुंजी घालू लागल्या. गदिमांच्या काव्यप्रतिभेपुढे नतमस्तकच व्हावे लागते. मला या ओळीतून दोन अर्थ जाणवले . एक अर्थ असा की परमेश्वर गरीब अथवा श्रीमंत घरी मूल जन्माला घालतो आणि जन्मतः ते मुल आंधळे निपजतं आणि आयुष्यभर ते मुल अन त्याचे आई-वडील यांची फरफट होते. दुसरा अर्थ असा की माणसं भौतिक सुखाच्या आहारी जाऊन माणुसकी हरवून बसतात; नातीगोती आप्तस्वकीयांनी केलेले उपकार सोयीस्कर रित्या विसरले जातात. संपत्तीच्या लोभाने तसेच खोटी प्रतिष्ठा प्रसिद्धीच्या पाठीमागे लागून डोळे असूनही मदांध होतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या "काट्याच्या अणीवर वसले तीन गाव" या कूट अभंगात ' मोघे 'असा उल्लेख आहे. ' मोघे' म्हणजे मातीचे मडके .
काट्याच्या अणीवर वसली तीन गावें ।
दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥
वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।
दोन थोटे एका घडेचिना ॥२॥
घडेचिना त्याने घडली तीन मोघे ।
दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥
आपण पाहतो ते जग नश्वर असून अशाश्वत अशा सत्व रज आणि तम या त्रिगुणांपासून निर्माण झाले आहे. जीवनाची आसक्ती प्रपंच करण्यास भाग पाडते आणि यातून जीव हा आंधळा बनतो त्याला सत्य समजत नाही. हे सत्य समजण्यासाठी, त्रिकालाबाधित परब्रह्माची ओळख करून देण्यासाठी सद्गुरु आवश्यक आहेत असं त्यात सांगितले आहे. आपण एखाद्या माणसाला काही सांगितल्यानंतर जर कळलं नाही तर तो माठ आहे असे संबोधतो; परंतु वरील अभंगातून आपण सारेच माठ आहोत हे ध्यानात येतं. चांगलं भाजलेल्या मडक्याला डोळे असतात आणि त्यात पाणी गार पडते तसेच जीवनातही कष्ट करून असाध्य ते साध्य करू शकतो याकरता डोळे उघडे ठेवून जिथून मिळेल तिथून ज्ञान प्राप्ती केली पाहिजे. लहानपणी गदिमां यांनी गरिबीचे खूप दाहक चटके सहन केले . त्यांच्या दारावर भिक्षेकरी गोसावी भिक्षा मागण्यास येत असे आणि त्यांची आई त्याला नेहमी शिधा देत असे . एके दिवशी मात्र त्यांच्या घरी भिक्षेकरी आला असता त्यांच्या घरात शिधा नव्हता तेव्हा त्या भिक्षेकराच्या झोळीतून त्यांच्या आईने पीठ घेतले आणि त्या दिवशीची गरज भागवली. गदिमांनी आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर त्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही भेटू शकला नाही आणि मग त्या उपकाराची उतराई करायची म्हणूनच त्यांनी 'पोटापुरता पसा पाहिजे ' हे गाणं प्रपंच या चित्रपटासाठी लिहिलं. गदिमांच्या घरातून आणि माडगूळ च्या मातीच्या संस्कारांनी , औंध संस्थानातील अनुभवांनी त्यांना खूपच समृद्ध केलं . लहानपणी आपल्याला कावळा माठावर बसला असून त्यातील पाणी एकेक खडा पाण्यात टाकून तहान भागवत असल्याचे चित्र पाहिल्याचे आठवत असेलच. प्रारब्ध आणि प्रयत्न यातील प्रयत्नांना प्राधान्य देऊन प्रारब्ध सुकर करता येतं असा संतांच्या साहित्यात सांगितल आहे.मनुष्यमात्राच्या शेवट हा जीव जावून होतो आणि आपलं शरीरही पार्थिव होतं. सत्कर्म आणि दुष्कर्म असा पाप-पुण्याचा घडा आपणच नित्य भरत असतो. मृत्यूनंतर अग्निसंस्कार करतानाही घेण्याचा मातीच्या घड्याचा उपयोग होतो (पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीत मृत्यूनंतरचे संस्कार करणारी मंडळी बहुतांशी 'मोघे' आडनाव असलेली आहेत). या संस्कारात शेवटी देहाचे दहन करण्यापूर्वी हा घडा तीनदा दगड मारून फोडला जातो. मला असं वाटतं, कदाचित ते तीन दगड म्हणजे सत्व रज तम असे कर्माचे घडा भरणे आता संपले आहे हेच यातून सूचित करायचे असावे. जे मनात आलं ते घडाघडा सांगितलं एवढेच.
                                               ............................................

काट्याच्या अणीवर वसली तीन गावें ।
दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥

वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।
दोन थोटे एका घडेचिना ॥२॥

घडेचिना त्याने घडली तीन मोघे ।
दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥

भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग ।
दोन हिरवे एक शिजेचिना ॥४॥

शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।
दोन रुसले एक जेवेचिना ॥५॥

जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी ।
दोन वांझ्या एक फळेचिना ॥६॥

फळेचिना तिला झाले तीन टोणगे ।
दोन मेले एक जगेचिना ॥७॥

जगेचिना त्याचे आले तीन रुपये ।
दोन खोटे एक चालेचिना ॥८॥

चालेचिना तिथे आले तीन पारखी ।
दोन आंधळे एका दिसेचिना ॥९॥

दिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या ।
दोन हुकल्या एक लागेचिना ॥१०॥

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ॥११॥



टिप्पण्या

मुकुंद इंगळे म्हणाले…
नितांत सुंदर लेखन. मातीच्या घड्याकडे जीवनाचे प्रतीक म्हणून पाहण्याची आपली परंपरा.. त्यामुळेच पाण्याला जीवन म्हणत असावेत. अशा या घड्याकडे इतक्या विविध दृष्टीने पाहता येते हे तुझें लेखन सिद्ध करते.बाल्यावस्था ते मधुबाल्यावस्था इतका मोठा काळाचा परीघ कवेत घेतला आहेस.माणसाचं नाही पण मातीचं "खुजे"पण देखील मनाला ओलावा देतं हे मात्र खरं. त्यात गदिमा म्हणजे माठातल्या पाण्यात वाळाच जणू. खूप सुंदर..आ"नंदूलेल्या" मनाने भरून पावलो.
Subodh Pathak म्हणाले…
खूपच छान , नुसत्या आठवणीच नाही तर सांस्कृतिक संदर्भ आणि त्या अनुषंगाने येणारी इतर माहिती सुद्धा .खासम खास.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
सुबोध मित्रा तू लगेचच वाचून कळवलं आनंद द्विगुणीत झाला.
अशोक परांजपे म्हणाले…
नंदकिशोरजी उत्तम लेखन. शब्दगंधवर याचे जरूर वाचन करा.
Kshama Paranjape Ganu म्हणाले…
खूपच सुरेख लिहिले आहे लेले काका तुम्ही....खूप नवीन माहिती मिळाली....याचे शब्दागंधवर जरूर वाचन करा म्हणजे ऐकायलाही छान वाटेल.... आणि त्यावर चर्चा सुद्धा होईल....
क्षमा गानू
Manisha Mehendale म्हणाले…
तुमच्या लिखाणाची शैली अतिशय भावदग्ध असते...
अंतरंगाला भिडते....
चपखल शब्दांची गुंफण लेखाचे सौंदर्यच नाही तर
त्यातील आशयाची उंची वाढवते....
अनेक मराठी गाणी डोळ्यासमोर येऊन गेली...
१ घट डोईवर घट कमरेवर ....
२ ते दूध तुझ्या या घटातले का अधिक गोड लागे न कळे
३ मधु मागसी माझ्या सख्यापरी मधु घटची रिकामे
ही आणि अशी बरीच...
तशीच हिंदीतलीही सुरेख गीते आठवली....

आपणास अभिप्रेत असलेले भावनिक घटांचे हिंदोळे ह्या सर्व गाण्यांतून ध्वनित होतात...
आणि मनामधे बराचवेळ रेंगाळतात...
*काट्याच्या अणीवर*....तर
अहाहा क्या बात है|.......
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री अशोकजी आपलं वाचन खूप आहे म्हणून आपला अभिप्राय वाचून अधिक आनंद झाला. धन्यवाद.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
धन्यवाद क्षमा.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण एवढ्या धडपडीत लेख वाचून खूपच भावगर्भ अभिप्राय दिलात भरून पावलो

Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण एवढ्या धावपळीत लेख वाचून खूपच भावगर्भ अभिप्राय दिलात भरून पावलो.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी