स्वाक्षरीचा चिरंजीव क्षण- रामदास कामत

 






स्वाक्षरीचा चिरंजीव क्षण- रामदास कामत

मराठी संगीत रंगभूमीवरील थोर कलाकार आणि खड्या आवाजाचे गायक श्रीयुत रामदास कामत यांचे वृद्धापकाळाने वयाच्या नव्वदाव्या वर्षी नुकतेच निधन झाले. ही मनाला अतिशय चटका लावणारी घटना आहे. अत्यंत कष्टाळू , रंगभूमीविषयीची पराकोटीची निष्ठा , वागण्यातील प्रामाणिकपणा आणि निगर्वी प्रेमळ स्वभाव अशी गुणवैशिष्ट्ये असलेले आणि देवाघरचे ज्ञात कुणाला , गुंतता हृदय हे ,साद देती हिमशिखरे अशी एकाहून एक उत्तम नाट्यगीते, मयुरा रे फुलवित येरे पिसारा सारखी भावगीते , पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव , हे आदिमा हे अंतिमा अशी प्रार्थना गीते- भक्तीगीते आणि आणि प्रथम तुझं पाहता 'मुंबईचा जावई' हे अजरामर चित्रपट गीत गाऊन रामदास कामत यांनी मराठी रसिक मनावर अधिराज्य केले. सत्तरच्या दशकात मी शाळेत असताना पुणे आकाशवाणी केंद्रावरून सकाळी साडेआठच्या मराठी बातम्या झाल्यानंतर नाट्यसंगीताचा कार्यक्रम लागत असे त्यामध्ये रामदास कामत यांची गाणी ऐकताना खूप आनंद मिळत असे.त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच या सर्वाचा आठव झाला आणि प्रकर्षाने आठवण झाली ती दिवाळी पहाट ऑक्टोबर २००६ मध्ये त्यांच्या झालेल्या प्रत्यक्ष भेटीची .  डोळ्यासमोर सारे चित्र उभे राहिले. निमित्त होते मुंबई आकाशवाणी वरून प्रसारित झालेला "दिवाळी पहाट " हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आमच्या बँकेने प्रायोजित केला होता. मी वाशी- नवी मुंबई येथे २००६ साली IDBI बँकेत नोकरीस होतो . त्या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी आम्ही वाशी आणि मुलुंड शाखेतील बँकेतील माझे सहकारी श्री प्रकाश रसाळ आदल्या दिवशी रात्रीपासूनच ऐरोली नवी मुंबई येथील सभागृहात जिथून पहाटे हा कार्यक्रम प्रसारित होणार होता तिथे उपस्थित होतो . त्या निमित्ताने रात्री साडे अकरा ते दोन वाजेपर्यंत आदरणीय प्रभाकर कारेकर, रामदास कामत, मंजुषा कुलकर्णी आदी दैवी प्रतिभा लाभलेल्या कलाकारांची रंगीत तालीम मला ऐकता आली . रंगीत तालमीच्या निमित्ताने अगदी जवळून अनौपचारिकरीत्या देवाघरचे ज्ञात कुणाला, चिरंजीव राहो अशी गाणी आदरणीय रामदास कामत यांच्याकडून ऐकताना मन मोहरून गेले . दुसरे दिवशी पहाटेचा कार्यक्रम ही अतिशय भारदार झाला . कार्यक्रम संपल्यानंतर चहापानाच्या निमित्ताने श्रीयुत रामदास कामत यांच्याशी पुन्हा अर्धा-एक तास सानिध्य मिळाले. त्यांचा विनयशील स्वभाव आणि अकृत्रिम स्नेहभाव याची प्रचिती आली . मी त्यांची स्वाक्षरी घेतली आणि आमच्या घरात आपल्या गाण्याचे सर्वजण चाहते असून संगीत नाटकातील भूमिका आणि गायकी याविषयीच्या माझ्या वडिलांच्या त्यांच्याविषयीच्या आदर भावना सांगितल्या. माझा लहान भाऊ व्हायोलीन वाजवतो; आपली भेट घालून देण्याची इच्छा आहे . हा संवाद सुरू असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. माझ्या घरी सांताक्रुजला अगदी आवर्जून या असे सांगून त्यांनी फोन नंबर दिला. बँकेच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम सादर करता आला असा कृतज्ञ भाव त्यांनी व्यक्त केला.मला सांताक्रूझला घरी जायचे आहे, बरोबर पेटी आहे त्यासाठी मला टॅक्सी करून द्याल का आणि माझी पेटी तेवढी टॅक्सी मध्ये ठेवायला मदत कराल का अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी विनंती केली . त्यावेळी त्यांचे वय पंच्याहत्तरीच्या आसपास होते. आम्ही त्यांना टॅक्सी करून दिली आणि त्यांना सांभाळून ने असे टॅक्सीवाल्यास सांगितले. टॅक्सीवाला याला आम्ही पैसे देत होतो परंतु त्यांना ते रुचले नाही त्यांनी स्पष्ट नकार दिला. खरंच किती मोठे कलाकार मनाने आणि माणूस म्हणूनही किती मोठे असतात याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. त्यांच्याशी झालेल्या भेटीतील संवादातील स्नेहार्द्रता आणि आवाज आजही स्मरणात आहे. ते सारे क्षण भारावलेले होते. ही मर्मबंधातील ठेव आहे. या महान आणि आपल्या आवडीच्या गायकाची आपली गाठ पडेल असं कधीच वाटलं नव्हतं. पण दैवयोग काही औरच असतात. त्यांनी गायलेल्या गाण्यातूनच याबाबत सांगायचे झाल्यास त्यांची व माझी झालेली भेट म्हणजे' देवाघरचे ज्ञात कुणाला ' असाच तो अपूर्व योग होता आणि मला हेम लाभले. त्यांच्या सहवासातील क्षण त्यांनी गायलेल्या 'चिरंजीव राहो' या गाण्याप्रमाणे चिरंजीव आहेत. एखाद्या उंच डौलदार वृक्षाची उंची तो उन्मळून पडल्यावरच मोजता येते असं म्हणतात. त्यांच्या उत्तुंग कार्य कर्तुत्व याविषयी विविध वृत्तपत्रातून आलेले लेख ,आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमातून त्यांच्या सांगितल्या गेलेल्या प्रकाशित आणि अप्रकाशित आठवणी आणि त्यांची अजरामर गाणी ऐकून त्यांची उंची मोजण्याचा प्रयत्न करणे एवढेच आता आपल्या हाती आहे . त्यांच्या स्मृतींना आदरपूर्वक अभिवादन.



टिप्पण्या

हिमवान म्हणाले…
श्री राम समर्थ
अतिशय ह्रद्य संस्मरण! कै.रामदासजी
संगीतसूर्य होते.भगवंताचे दुर्मिळ सद्गूण
या महामानवात होते. त्याची प्रचीती
लेलेभाऊ तुम्हाला सद्गुरूकृपेने आली हे
अहोभाग्य होय. आपण आपले भाव या
छोट्याशा शब्दचित्रात उत्कटतेने चितारले आहेत. हे वाचून कै. रामदासजींची सात्विकमूर्ती आमच्या
अंतश्चक्षूसमोर उभी राहिली. अत्यंत आभारी आहोत.
रामदासजीना श्रीराम सद् गती देवोत ही
प्रार्थना.
श्रीराम
Jayant Kale म्हणाले…
अत्यंत ह्रद्य अनुभव. खरेच आहे, उरतात त्या फक्त मधुर आठवणी.🙏
Ramakant Kasture म्हणाले…
खूप छान. रामदासजी माझेही अत्यंत आवडते कलाकार होते. त्यांच्या स्वभावाविषयी माहिती तुमच्यामुळे कळाली. धन्यवाद.
Unknown म्हणाले…
माझे अत्यंत आवडते गायक श्री रामदास कामत यांचेवरील आयेख वाचला.'he आदिमा हे अंतिम,पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, अशी अनेक त्यांची गाणी माझी आवडती आहेत.त्यांचा थोडा सहवास तुला लाभला हे भाग्य.नशीबवान आहेस.त्या थोर गायकास विनम्र प्रणाम!!
विजय रणसिंग म्हणाले…
अरे वा लेले साहेब ,या उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीबरोबर तुम्हाला काही वेळ का होईना सहवास लाभला , पंडित रामदास कामत यांच्या उत्तम गायकी बरोबरच त्यांच्या स्वभावातील साधेपणाची सुद्धा ओळख झाली, ती तुम्ही लिहिलेला टॅक्सीचा किस्सा खूप सुंदर 👍.आभारी आहोत.🙏नाट्यसंगितातील रामदास कामत ह्यांचे स्थान अढळ होते आणि राहील. तुम्ही ब्लॉग छान लिहितात
अनिल पाठक म्हणाले…
खूप छान संस्मरणीय प्रसंग
Satish Degaonkar म्हणाले…
खूप छान आठवण आणि सुंदर लेखन
Vishwas Deshpande म्हणाले…
खूप छान आठवणी. त्यांची अनेक गाणी माझी आवडती आहेत. त्यांचा सहवास, त्यांची स्वाक्षरी हा अमूल्य ठेवा आपल्याजवळ आहे.
Manisha Mehendale म्हणाले…
सुंदर आठवणींचा ठेवा अगदी सहजपणे आपल्या विनम्र शब्दांतून व्यतीत केलात....
आणि त्यांच्याविषयीचा नितांत आदर द्विगुणीत झाला....
आपण उल्लेखिलेली सर्व नाट्यगीते भावगीते खूपच आवडतात ...ती चिरस्मरणीय राहतील.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
सर आपला अभिप्राय वाचून खूप समाधान वाटलं. आदरपूर्वक अभिवादन.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
लेख लिहायला मेहनत घेतली आणि ती सार्थकी लागली.खूप जणांना लेख आवडला,आता मनी शल्य बोचतं आहे ते हे की माझेकडून हे लेखन आदरणीय रामदास कामत असताना झालं असतं तर अजून वेगळा आनंद मिळाला असता. त्यांचे चिरंजीव यांचेकडे हा लेख पाठवून देण्यासाठी आता प्रयत्न करत आहे.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
प्रिय अरगडे, तू अभिप्राय दिलास खूप आनंद झाला. आपल्या छोट्या पनवेल मुक्कामात ही आपण गप्पा गाणी करत असू त्याची आठवण झाली.
अशोक आफळेO म्हणाले…
तुमचा लेख वाचला सांडू भाईच्या तारा पाना सारखा तो जमला आहे आपल्या
आवडत्या कलाकारांची भेट होणे आणि त्याने उत्तम प्रतिसाद देणे हा चा हत्याच्या जीवनातील मंतरलेला क्षण असतो तुम्ही या प्रसंगाचे काव्यमय वर्णन केले आहे आणि त्यात लालित्य ओतप्रोत
भरले आहे तुमचा लेख वाचल्यावर मला
माझी व्यंकटेश माडगूळकर आणि कुसुमाग्रजांशी झालेली भेट आठवली
त्यांनीही मला असाच प्रतिसाद दिला होता देसी ताप परी जसा वरीवरी येसीं
नभी भास्करा अत्युचिपदी थोरही
बि घडतो हा बोल आहे खरा या कृष्णशास्त्री चिपळूनकरांच्या अन्योक्तीस
छेद देणारे रामदास कामत कुसुमाग्रज किंवा व्यंकटेश माडगूळकर भेटतात
तेव्हा भारतीय संस्कृतीची पाळे मुळे
किती खोलवर रुजली आहेत याचीच
अनुभूती येते मी कॉलेजमध्ये असताना
रामदास कामत खूप लोकप्रिह गायक नट
होता मत्स्य गन्ध1 ययाती आणि देवयानी मधील त्याच्या नाट्यगीतांनी
लोकप्रियतेचे नवीन मापदंड निर्माण केले होते तुमच्या लेखाने त्या भारावलेल्या
क्षणांची आठवण तर झालीच पण तो
कालखंड नजरेसमोर साकार झाला
मनःपूर्वक धन्यवाद लेले स्त
अशोक आफळे हैद्राबाद



S G Deshpande म्हणाले…
लेले साहेब ,तुम्ही नशीबवान आहात ,अशा उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीबरोबर तुम्हाला काही वेळ का होईना सहवास लाभला ,तसेच आम्ही नशीबवान आहोत कारण तुम्ही लिहिलेल्या लेखामुळे काही क्षण का होईना आम्हालाही अप्रत्यक्ष भेटीचा आनंद मिळाला, पंडित रामदास कामत यांच्या उत्तम गायकी बरोबरच त्यांच्या स्वभावातील साधेपणाची सुद्धा ओळख झाली, ती तुम्ही लिहिलेला टॅक्सीचा किस्सा .आभारी आहोत.🙏
S G Deshpande म्हणाले…
लेले साहेब ,तुम्ही नशीबवान आहात ,अशा उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीबरोबर तुम्हाला काही वेळ का होईना सहवास लाभला ,तसेच आम्ही नशीबवान आहोत कारण तुम्ही लिहिलेल्या लेखामुळे काही क्षण का होईना आम्हालाही अप्रत्यक्ष भेटीचा आनंद मिळाला, पंडित रामदास कामत यांच्या उत्तम गायकी बरोबरच त्यांच्या स्वभावातील साधेपणाची सुद्धा ओळख झाली, ती तुम्ही लिहिलेला टॅक्सीचा किस्सा .आभारी आहोत.🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपला अभिप्राय यायची खूप वाट पहात होतो .तो आता आला वाचून खूप आनंदी झालो कारण आपण दर्दी साहित्यप्रेमी आहात. आपल्यामुळेच जुन्या साहित्यिक मंडळीची लेखन शैली, पुस्तकं यांची अनमोल माहिती मिळते.आपण मोठया काळाचे साक्षीदार आहात आणि मार्गदर्शक आहात. माझं साहित्य लेखन गेली २५ एक वर्षे आपण वाचून मला काय योग्य अयोग्य सांगता. आपले आशीर्वाद असेच मिळोत.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
अनिल धन्यवाद... सौ वहिनींना ही वाचायला दे .
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
प्रिय पद्माकर तुझा अभिप्राय प्रथम आला आणि तो खूपच भावला माझें लेख लिहण्याच सार्थक झालं. आणि आता तुझा रामरुप आशीर्वाद ही मिळाला.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री रमाकांतजी आपण लेख वाचून कळवळतं,आनंद झाला.माझ्या ब्लॉगवरील अन्य लेख,कविता ही आपल्या सवडीनुसार वाचून कळवावे हि विनंती.
Sneha desai म्हणाले…
नमस्कार. मी अभयची बहीण आणि महेशची
बॅचमेट आहे. महेश ने लिंक पाठवली म्हणून हा writeup वाचण्याचे भाग्य लाभले. फारच
सुंदर लिहिलंय्. पं रामदास कामत ह्यांचा निकट सहवास आणि त्यांच्या बरोबरचा संवाद म्हणजे एक प्रकारे परिस स्पर्शच . ही फार मोठी अपूर्वाई वाटावी, अशीच गोष्ट आहे.
भाग्यवान आहात. ह्यात अणुमात्र शंका नाही.
हेच लिहीत राहा. धन्यवाद आणि मन:पुर्वक शुभेच्छा. 🙏🙏😌
Sneha desai म्हणाले…
ब्लॉग वरचे इतरही लेख नक्की वाचेन आणि कळवेन.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण लगेचच वाचून कळवलतं, खूप छान अभिप्राय दिलात .आनंद झाला. या हृदयी चे त्या हृदयीं श्री रामदास कामत भेटीत मिळाले ते लेखातून आपण अनुभवलं ही परमेश्वर कृपा.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
जरूर वाचा.,"It is my pleasure.
Gurunath Deshpande म्हणाले…
श्रीराम 


रामदास कामत यांच्या विषयी लिहिलेला लेख वाचला.  आयुष्यातील काही क्षण कायमचे मनामधे कोरले जातात  जे कितीही काळ लोटला तरी प्रसंगी जसे च्या तसे अगदी बारीक तपशिलासह डोळ्यापुढे उभे राहतात. तुझ्या लेखामुळे त्याची प्रचिती आली. रामदास कामत हे गायक,  विशेषतः नाट्यगीत, म्हणुन सुपरिचित आहेतच. पण त्यांचे स्वभाव वैशिष्टय़, समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव,  प्रेमळ आणि मृदू स्वभाव या बाबत सर्व सामान्य अनभिज्ञ असतात.  तुला त्यांचा अल्पकाळ का असेना सहवास लाभला आणि तुझ्या  नेहमीच्या शोधक वृत्तीमुळे नेमकी गुणवैशिष्ट्ये टिपलीस. ही परमेश्वराची देणगीच आहे.  तसेच असे अविस्मरणीय प्रसंग शब्दांकित करून तू  आम्हा पर्यंत पोहोचवतोस या बद्दल तुझे आभार. 


तुला अशा दिग्गज कलाकार,  लेखक मंडळींचा नेहमीच सहवास लाभतो.  कधी कधी आपसूक संधी मिळते तर  कधी कधी तू संधी मिळवतोस कारण या गोष्टी तुला अधिक प्रिय आहेत.  त्यामुळेच स्वाक्षऱ्या,  त्यांचे लेख,  अशा गोष्टी जमवण्याचा छंद जोपासला आहेस. पण मला कौतुक या गोष्टीचे आहे की तू हे सर्व तुझ्या पुरते मर्यादित न ठेवता आमच्या पर्यंत पोहोचवतोस. त्यासाठी खूप खूप आभार आणि तुझे छंद यापुढेही उत्तम जोपासले जावो यासाठी शुभेच्छा. 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी