स्वरमयी प्रभा-

 // श्री सरस्वती माता प्रसन्न //


स्वरमयी प्रभा-



किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना २६ जानेवारी २०२२ च्या पूर्वसंध्येस "पद्मविभूषण " पुरस्कार जाहीर झाला. एक महान गायिका, अतिशय समर्थ शिक्षिका, संगीताच्या अभ्यासक, लेखिका व कवयित्रीही असं दिव्य प्रतिभेचं लेणं ल्यायलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विदुषी स्वरयोगिनी प्रभा अत्रे . सामान्य माणूस ज्याला शास्त्रीय संगीतातले काहीही कळत नाही तो ही त्यांच्या मारुबिहाग ,कलावती व मिश्र खमाज मधील कौन गली मोरा श्याम ही ठुमरी असलेल्या प्रसिद्ध ध्वनिमुद्रिकेतील स्वर कानावर पडताच अंतर्मुख होतो . या ध्वनिमुद्रिकेस अमाप लोकप्रियता लाभली  आणि आजही जवळजवळ पन्नास वर्षे ती तशीच टिकून आहे.जेव्हा जेव्हा रागांवर आधारित गाण्यांचा विषय निघतो त्यावेळी कलावती आणि मारुबिहाग हे नाव निघताच डॉक्टर प्रभा  अत्रे हे नाव ओठावर लगेच येते. 'प्रथम तुझं पाहता' हे मुंबईचा जावई या चित्रपटातील गीत अथवा' दे मला दे चंद्रिके प्रीती तुझी' अशी गाणी ऐकली की ती कलावती या रागावर आधारित गाणी आहेत असं  शास्त्रीय संगीताविषयी फारशी माहीत नसणाऱ्या सामान्य माणसालाही कळायला लागते .  हे सारे श्रेय त्यांनाच जाते . आम्ही शाळा कॉलेजला सुट्टी लागल्यावर किंवा लग्नकार्याच्या निमित्ताने पुण्याला माझ्या काकांकडे जात असू. त्यांच्याकडे रेकॉर्ड प्लेअर होता.त्यांच्याकडे गेल्यानंतर विविध संगीत आम्हाला ऐकायला मिळत असे- शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वगैरे. खूप ध्वनिमुद्रिका त्यांच्याकडे होत्या. परंतु सर्वात मोहिनी घातली ती आदरणीय प्रभा अत्रे यांच्या वर उल्लेखलेल्या लोकप्रिय ध्वनिमुद्रिकेने. लोकसत्ताला नोव्हेंबर २०१८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत आदरणीय प्रभाताईंनी स्वतःच एक अनुभव सांगितला आहे- " एकदा पंढरपूरला एका परिचितांच्या शेतावर गेलो होतो. तिथे काम करणारा माणूस माझ्याकडे आला नि मला म्हणाला, ‘ताई, तुमची ‘कौन गली श्याम’ ही ठुमरी मला फार आवडते हो! त्यामध्ये ‘श्याम’ हा शब्द तुम्ही प्रत्येक वेळी किती वेगवेगळ्या पद्धतीने आणि किती छान म्हटलाय!’ त्याचं बोलणं ऐकून मी अवाक् झाले. हा किती बारकाईने ऐकतोय आपलं गाणं, असं वाटलं. आणि त्याच वेळी असा श्रोता मिळाल्याचा आनंदही झाला." आपले आई-वडील गुरुजन आणि श्रोते यांचे विषयी त्या नेहमीच कृतज्ञताभाव व्यक्त करतात . त्यांच्याच 'जाग' या काव्यात रसिकाप्रती आदर व्यक्त करताना त्या म्हणतात-

सूर जेव्हा जागे होतात

कळीसारखे उमलू लागतात

लयीबरोबर डोलू लागतात

भावगंध उधळू लागतात

येतो मग एखादा

रसिक ,सुरांचा बादशाह

जपून ठेवतो

तो रंग, गंध

श्रद्धेच्या ओलाव्यात

असे हे सूर मग

कधी सूकत नाहीत

गळत नाहीत

अमर होतात

मनाच्या गाभार्‍यात

 ['अंतःस्वर ' या प्रभा अत्रे यांच्या कविता संग्रहातून]

सुरेल स्वरांबरोबरच त्यांची स्वरमयी प्रसन्न भावमुद्रा सामान्य माणसालाही प्रभावित करते. असे प्रतिभावंत कलावंत सामान्य माणसांला लौकिकातून अलौकिकाकडे घेऊन जातात. २०११ पर्यंत प्रभा अत्रे यांचा 'अंतःस्वर ' हा कविता संग्रह आहे हे मला माहीत नव्हते .एकदा मुंबईत दादरला आयडियल दुकानात कवितांची पुस्तकं घेताना पुस्तकांच्या रॅकमध्ये  छोटेसे पुस्तक अगदी कोपर्‍यात लपून बसलेलं मी पाहिलं ,कुतूहलाने तेेे हातात घेतले आणि पाहतो तर ते पुस्तक म्हणजे होते प्रभा अत्रे यांचा 'अंतःस्वर ' हा कविता संग्रह. आनंदित झालो.पुस्तक चाळलं. मैफिल काव्यरचना वाचली आणि पुस्तक लगेच विकत घेतले आणि मित्रमंडळींना ही सांगितले. पुस्तकातील कवितांचा आस्वाद त्या आठवड्यात घेतला . आवडलेल्या कविता डायरीत लिहून ठेवल्या. कविता संग्रहातील सर्वच कविता आणि रेखाटने दोन्हीही अप्रतिम आहेत. त्यातील मैफिल ,जाग, स्वरपाकोळी आणि  साधना या कविता मला फार आवडतात . त्यांनी शास्त्रीय संगीत या विषया वरील एकूण अकरा पुस्तके लिहिली असून ती एकाच वेळी प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रमही केला आहे . डॉक्टर प्रभा अत्रे यांनी त्या ९० व्या वर्षात पदार्पण करताना "माझं चिंतन माझा कलाविष्कार "या मथळ्याखाली सप्टेंबर २०२१ या महिन्यात महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात 'मैफिल 'या कवितेविषयी सविस्तर दोन लेख लिहिलेले आहेत .लेख मननीय आहेत. लेखातील काही भाग मला कळला नाही. सांगीतिक ज्ञान असलेल्या माणसाकडूनच ते समजावून घ्यावे लागेल. वेळोवेळी त्यांच्याविषयी आलेले लेख वाचले, व्हिडीओ पाहिले की मन उल्हसित होतं.आणि कधी मन अशांत असता वर उल्लेखलेली ध्वनिमुद्रिका ऐकली की मनाला शांती समाधान आणि चैतन्य मिळतं. 

असं म्हणतात की 'ज्या झाडास परिपक्व फळे लगडलेली असतात ती सदैव वाकलेली असतात' . ही उक्ती प्रभाताई यांना तंतोतंत लागू पडते. त्याचं गाणं अजून प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला नाही ही खंत आहे. पद्मविभूषण मिळाल्यानंतर त्यांच्याविषयीच्या आदरभावना खूपच दाटून आल्या आणि त्यातूनच हे काव्य फुल उमलले.


स्वरमयी प्रभा


उत्तुंग आपुली सर्वंकष प्रतिभा 

संगीत साधना अपार

तपस्या तेज ओसंडते मुखकमलावरी

कानी पडता आपुले चिरमधुर स्वर

श्रोते स्वरतल्लीन

मिळे चैतन्य विपुल

घडे सरस्वती साक्षात्कार 


माता पिता गुरु श्रोते यांचे जाणुनी मोल 

सदैव ऋणभाव ठेवता आपले मनी

कलावती मारुबिहाग अन कौन गली मोरा श्याम ने घातली आम्हावर मोहिनी  


साठवितो अंतरीं  आपुले अंतःस्वर

विनितो शारदामाते   

लाभो या स्वरशारदेस उदंड आयु

 नाहू दे आम्हास प्रतिभेच्या चांदण्यात....


चारुता लीनता मूर्तिमंत प्रतीक

मिळता पद्मविभूषण, पुरस्काराचं होतो थोर

आता एक आस माझे उरी

प्रत्यक्ष दर्शन घडो सत्वरी 

होउनी अती लीन 

पुन्हा पुन्हा करितो वंदन   

नंदकिशोर अर्पितो तवचरणी हे काव्यस्तवन.


टिप्पण्या

अशोक आफळेO म्हणाले…
लेलेसाहेब तुमचा लेख वाचलस जितके
तुमचे साहित्यावर प्रेम आहे तितकेच
सगीतावरही आहे या लेखात ते प्रकर्षांने
जाणवते प्रभाताई किराणा घराण्याच्या
ज्येष्ठ गायिका अपार मेहनत घेऊन त्यांनी संगीत क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर
उ मटविली त्यांच्या बहुआयामी व्यक्तित्वाचा आपण वस्तुनिष्ठ परामर्ष
घेतला आहे पण तो कसा भक्ताने देवाने
देवाचा घ्यावा तसा तुमची कविता तर सुंदरच आहे त्यांचे बंधू दत्तात्रय पिलाजी
अत्रे हे रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कुलचे प्राचार्य होते तुमच्या लिखाणात लालित्य आहे ते
प्रवाही आहे
अशोक आफळे
हैद्राबाद
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार,आपला अभिप्राय वाचून लेख लिहला याचे सार्थक झालं. आतून आलंले सारं सच्चे भाव हे सारं घडूवुन घेतात.प्रथम लेख लिहणार होतो पण भाव दाटून काव्य आधी अवतरलं... आपण मला साहेब म्हणू नये ही नम्र विनंती. आपला स्नेह मला नेहमीच स्फुर्ती देतो .
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
Subodh Pathak commented on "स्वरमयी प्रभा"
13 Feb 2022
एका रसिकाच्या भूमिकेतून लिहिलेला उत्तम लेख 👌👌

Ramakant Kasture commented on "स्वरमयी प्रभा"
12 Feb 2022
खूप छान लेख.

Unknown commented on "स्वरमयी प्रभा"
12 Feb 2022
खूप छान लेख आणि काव्य दोन्ही
Manisha Mehendale म्हणाले…
नंदूदादा,

तुमचे लिखाण नेहमीच छान असते....
त्यात डॉ.प्रभाताई अत्रें विषयी नितांत आदर आणि श्रद्धा असल्यामुळे काव्य आणि लेखाचा सुंदर अविष्कार आपल्या हातून
लिहीला गेलाय..फार छान....

त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि गुणवर्णन तुमच्या सशक्त लेखणीतून उलगडले गेले आहे....लिहीते रहा...

मनिषा मेहेंदळे...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण