गाई घरा आल्या ...रसग्रहण



गाई घरा आल्या 

 घणघण घंटानाद 

कुणीकडे घालूं 

साद गोविंदा रे ?


 

‘ गाई घरा आल्या ’ ही  कवी वा गो मायदेव यांची  एक अर्थवाही करूण भाव व्यक्त करणारी कविता आहे. शेतीवाडी, घरदार गाई गोठा ही खेडेगावातील समृद्धी .गाई म्हशी हे दूधदुभतं देणार पशुधन. अशाच एका समृद्ध घरात संध्याकाळ झालेली आहे. गाईगुरांच्या परतीची वेळ झाली आहे. घर मालकीण माऊली त्यांची वाट पाहत आहे.गुराख्याच्या संगीतीने चरावयास गेलेल्या सर्व गाई हळूहळू परत येत आहेत ,गाईच्या गळ्यातील घंटेचा नाद अंगणात, गोठ्यात घुमत आहे. आता सर्व गायी परतल्या, मात्र गोविंदा(गुराखी )परत आलेला नाही. त्याची वाट पाहत ती आता काळजीग्रस्त झाली आहे. त्या माऊलीच्या जिवाची घालमेल सुरु आहे -का आला नाही गोविंदा? केव्हा येईल ?या विचारात ती पडली आहे. या परिस्थितीचे वर्णन करणारी ही कविता आहे. त्या माऊलीची जितकी माया गाई गुरांवर आहे तितकीच माया त्या गुराख्यावरही आहे. हा कान्हा गुराखीच त्या गुरांना सांभाळत आहे .त्या गुरांना त्या मुक्या जनावरांना त्याने माया लावलेली आहे .त्याच्या बासरीतील मंजुळ ध्वनीच्या लयीत ती निवांत चरत असतात आणि तो आहे साथीला एक संरक्षक म्हणून निर्धास्तपणे रानात फिरत असतात .त्याच्या एका हाळीवर ती एकत्र येतात.त्याच्या स्पर्शानं मोहरून जातात . असा हा गाई गुरांचा सखा आहे. गाई घरी आल्या आहेत वासरांना त्यामुळे खूप आनंद झाला आहे. वासरं टणाटणा उड्या मारत आहेत . गाई वासरांना हुंगत आहेत आणि ती पायात घोटाळत आहेत . गाईंना आता वात्सल्याने पान्हा फुटला आहे, वासरांचे पोट भरल्यानंतर धारा काढणे झुरूझुरू सुरू आहे परंतु घर मालकिणीच्या जीवाला गोविंदा न आल्यानं हुरहुर लागली आहे . दुधाच्या कासंड्या भरल्यानंतर गोविंदाला ही वाटीभर दूध ती देत असे ते दूध तिने काढून ठेवले आहे त्या वाटीकडे बघून गोविंदा परतलेला नाही म्हणून तिचा जीव आता कळवळत आहे. या कातरवेळी या घननिळाला वनमालाला कुणी गुंतवून ठेवलं आहे या विचारात ती पडली आहे. घरात दिवेलागण झाली आहे आता रात्र होत आहे गोविंदा परत आला नाही. 

गाई घरा आल्या 

 पाल चुक चुक करी

 राख आंबे माझा हरी

 असे तेथे!

तिच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकली आहे. त्याला काही दगाफटका तर झाला नसेल ना ? या विचारानं ती आता अंबा मातेला या गोविंदाचं रक्षण कर, जिथे असेल तिथे त्याला सुरक्षित ठेव अशी आर्त प्रार्थना करत आहे. या ठिकाणी कविता जरी संपलेली असली तरी ती आपल्या मनामध्ये घर करून बसते. त्या गोविंदाचं काय झालं असेल हा विचार वाचकांना अस्वस्थ करतो. कदाचित अनाथ असल्याने हा गोविंदा बालपणापासून या घरात वाढला आहे आणि घरातील सर्वचजण त्याच्यावर प्रेम करत आहेत; गाईवरील प्रेम आणि त्याच्यावरील प्रेम हे एकमेकांत मिसळून जणू एकच झाले आहेत जसं दुधात नवनीत असतचं . आणि त्याचं घरी न परतणं न येणं न दिसणं यामुळे त्या संपूर्ण घराला घोर लागला आहे.

 कवीने त्या गुराख्यावर असलेले माऊलीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी- गोविंदा, घनश्याम, बालमूर्ती, कान्हा, ऋषिकेश ,यदुनाथ, वासुदेव, मुकुंदा, वनमाली, घननीळ आणि दामोदर अशा सर्व कृष्णांच्या नावाचा रूपक म्हणून उपयोग केला आहे. संपूर्ण कविता ओवी वृत्तात बांधलेली आहे. या वृत्ताचे वैशिष्ट्य असे ओवीला चार चरण(ओळी)असतात. पहिल्या तीन चरणांच्या शेवटी यमक असते. ओवीच्या पहिल्या तीन चरणातील प्रत्येकात पाच पासून पंधरा पर्यंत अक्षरे असतात व चौथ्या चरणात पहिल्या तीन चरणातील अक्षरांपेक्षा अधिक अक्षरे नसतात. संपूर्ण कविता खाली उद्धृत केली आहे. आपण ती जरूर नीट वाचावी. रस गंध स्पर्श आणि नाद अशी तांबे यांच्या कवितेत आढळणारी वैशिष्ट्ये याही कवितेत जाणवतात. कवीचे कसब शब्दांवरील प्रभुत्व आणि काव्यप्रतिभा याचे कौतुक वाटते. ओवी आणि अभंग मराठीतील सर्वात जुने व परंपरेने चालत आलेले असे लोकप्रिय अक्षरछंद आहेत. मराठी भाषेचा अभ्यास ,व्याकरण आणि प्रतिभा यांचे मिश्रणातून छंदोबद्ध कविता लिहिल्या जातात.कवी वा गो मायदेव (जन्म २६ जुलै १८९४ निधन ३० मार्च १९६९) यांचा कार्यकाळ जरी रविकिरण मंडळ अस्तित्वात असतानाचा असला तरी त्यात सामील न होता ते स्वतंत्रपणे काव्यलेखन करीत असत. कविकुलगुरू केशवसुत वर आणि रेव्हरंड टिळक यांच्या प्रभावाखाली त्यांनी काव्यलेखन केले. भा रा तांबे यांच्या कविता श्रीयुत मायदेव यांनीच एकत्रित करून प्रसिद्ध केल्या .या कार्याने त्यांनी मराठी साहित्य विश्वावर थोर उपकारच केले आहेत. कवींच्या जन्मदिनी प्रहार दैनिकातील श्रीयुत माधव विद्वांस यांच्या छोट्याशा लेखातून कवितेतील मध्यवर्ती विचार मला कळला आणि मग मला या कवितेचे रसग्रहण करावेसे वाटले .

 






संदर्भ ग्रंथ-१.आधुनिक मराठी काव्यसंपदा संपादक मधु मंगेश कर्णिक( कोकण मराठी साहित्य परिषद केशवसुत जयंती प्रसिद्ध झालेले पुस्तक )आणि २. सुगम मराठी व्याकरण व लेखन श्रीयुत मो रा वाळंबे.

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
फारच सुंदर रसग्रहण मला न सापडलेली सौंदर्य स्थळे दाखविल्याने फार आनंद दिलास असच अधुन मधुन दिसत रहाव सुंदर
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
धन्यवाद ...आपले नावं इथे आले नाही please सांगावे.
अशोक आफळेO म्हणाले…
लेले साहेब मायदेव हे एक
महान प्रतिभावंत होते पण त्यांच्या कवितेत नाद साद आणि लय तर आहेच पण
याला छेद देणारी एक प्रा सादिकताही आहे अस्सल
बेळगावी रवाळ तुपासारखी
मो खेड्यात बरीच वर्षे
राहिलो आहे त्यामुळे गायी
गुरे घरी येणे हा सोहळा मी
बरीच वर्षे अनुभवला आहे घर जवळ आली की गाईचे
हंबरणे त्याला वासराची आर्त
साद हे अनुपमेय असते
हाच क्षण कवी मायदेव यांनी
अचूक टी पला आहे
तुमचे रसग्रहण ही तितकेच
लालित्यपूर्ण आहे त्यात आलेले संदर्भ तुमच्या चौफर
वाचनाची साक्ष देतात असो
अशोक आफळे कोल्हापूर
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपला अभिप्राय आला की माझी लेखन यात्रा योग्य वाटचाल करत आहे हे कळतं आणि आणखीन उत्साह वाढतो .आपलं साहित्य मैत्र असंच वर्धिष्णू होत राहू दे.
जयंत कुलकर्णी म्हणाले…
सुंदर कविता आणि भावपूर्ण रसग्रहण
Satish Kulkarni म्हणाले…
खूप सुंदर रसग्रहण
कवितेतील सौन्दर्य स्थळे उलगडून दाखवल्याने ती अधिक भावली.
कविता नुसती आवडून चालत नाही तिचे भावाणे तितकेच महत्वाचे

Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
सतीश तू लगेच वाचून कळवला आनंद वाटला. खूप संवेदनशील कविता आहे.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
जयंतराव धन्यवाद.
राजन उमर्जीकर बाल विकास शाळा पहिला मित्र म्हणाले…
कवितेचे रसग्रहण फार सुंदर करतोस रे
खूप छान
आवडले.
शाळेत असे रसग्रहण लिहिले असतेस तर दहा पैकी दहा मार्क.
आत्ता पण
अविनाशजी पंडित मधुकोष म्हणाले…
आज वाचायला मुहूर्त मिळाला.
जाहली सांजवेळ,
किणकिण चाहूल
गोधनाची.
आतुरली वासरे
हंबरतां धेनु
दावणीस तृषा पान्ह्याची.
एक दिवा देव्हाऱ्यात
एक वृंदावनि
घरास गाज शुभंकरोतिची !
".... बहुत काय लिहावे नंदकिशोर जी. आपल्या सालंकृत रसग्रहणांस हा अल्प प्रतिसाद."
अनामित म्हणाले…
अविनाशजी
आपला गोरस युक्त काव्यमय अभिप्राय मिळाला बहुत संतोष जाहला.... या अधिक काय हवे ते या पामराला. आपला अभिप्राय ब्लॉगवर डकवत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण