सृजनाचा मोहोर....

 



मधुकोश संकुलातील सांस्कृतिक वातावरण आणि पर्यावरण हर्षदायी आहे. दिनभर वृक्ष फुलझाडे दृष्टीस आनंद देतात कधी हवाहवासा वारा तर कधी हलकीशी झुळूक व त्यावर बागडणारे पक्षी आणि खारुताई यांचे मंजुळ आवाज कान तृप्त करतात. दुडूदुडू धावणारी बाल गोपाळ मंडळी, त्यांच्या बुटांचा गमीतीदार आवाज , सायकल शिकणं ,थोड्या मोठ्या मुलां मुलींचे नाविन्यपूर्ण खेळ ,धावा धावी- लपाछपी ,कधी मांजर आणि लाडका कुत्रा या पाळीव प्राण्याशी मुलांचा संवाद. असा आनंदाचा ठेवा आबाल वृद्ध एकंदरीत पहाटे ते सायंकाळ पर्यंत सर्वच रहिवासी येथे लुटत असतात. असं दिवसभर नादमय वातावरण निसर्गाविषयीची कृतज्ञता आपल्या मनात जागी करतात. हे सार वैभव अमूल्य आहे. ऋतू बदल घडत असताना निसर्गातील मनोहरी विभ्रम आपल्याला या परिसरात पहायला मिळतात. सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त याची मजा तर काही औरच. एकंदरीत या सर्वांमुळे तनमन प्रसन्न होते; चित्तवृत्ती फुलून येतात. आणि आता तर ऋतूंचा राजा वसंत याचे राज्य सुरू आहे. मागील आठवड्यात सकाळच्या वेळी फेरफटका मारताना आंब्याच्या झाडांवरील मोहोर दृष्टीस पडला आणि मन मोहरून गेले. मोबाईल मधून पटकन हे दृश्य टिपलं. आणि नंतर काव्य ओळी सुचल्या ते शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न .

सृजनाचा मोहोर


सृष्टी ऋतुचक्र अविरत

अर्थ उलगडून उमजून घ्यावा सतत ...


सृ सृष्टीचा

सृ सृजनाचा

च चैत्राचा चराचरातील चैतन्याचा

पानगळीपासून पालवीच्या प्रवासाचा



ध्यास मनीचा

निसर्गातील संगीत दैनंदिन अनुभवण्याचा

गतीतून प्रगती साधण्याचा

व्यष्टी आणि समष्टी परस्परपूरक होण्याचा

उन्नततेची गुढी उंचच उंच उभारण्याचा

प्रेयसाकडून श्रेयसाकडं जाण्याचा.....

टिप्पण्या

अशोक आफळेO म्हणाले…
कालिदासाचे ऋतुसंहार इरावती ।कर्वे
यांचे ऋतुचक्र मध्ये ऋतू बदलाची लालित्यपूर्ण वर्णने आहेत विशेषतः कालिदासाचे वसंत आणि ग्रीष्म ऋतूचे वर्णन नितांत सुंदर आहे
तुम्ही तोच धागा पकडून एक छान ललीत लेख लिहिला आहे आंब्याचा
मोहर कोकिलेचे कूजन जाई जुई
मोगरा यांचा धुंद करणारा सुवास ही
वसंत ऋतूच्या आगमनाची सूचना देतात
तुमच्या लेखात हे सर्व जुईच्या सुगंधासारखे आले आहे
अशोक आफळे
अशोक आफळेO म्हणाले…
लेलेसाहेब तुमची मुक्तछंदातील कविताही
आशयघन आहे नाद लय आणि ताल सांभाळून आशयघनता जपणे खूप
कठीण असते पण तुम्ही ते सह जपणे
जमविले आहे कारण जागेवर सुचलेले
हे उस्फूर्त काव्य आहे
अशोक आफळे
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार. आपल्या सविस्तर अभिप्राय वाचून खूप आनंदी झालो.आपलं साहित्य मैत्र हे सदैव फुलतचं राहील.
Unknown म्हणाले…
लेलेजी,तुम्ही जे मुक्तछंदात वर्णन केले आहे त्याचा अनुभव मी सहा साडेसहाच्या सुमारास घेतो.कितीतरी प्रकारचे पक्षी सुरेख आवाज काढीत असतात,फुलेही नाना तऱ्हेची दिसतात पण मला आपल्यासारखी लेखनकला अवगत नाही म्हणून शब्दबद्ध करु शकत नाही.आपल्याला कारयबाहुलयातून वेळ मिळाल्यास जरुर अनुभव घेऊन मुक्तछंदात रुपांतर करावे,रसिकांना छान मेजवानी दिल्याचे श्रेय आपणास मिळेल. लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आभार.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आदरणीय श्री मधुसूदन शेम्बेकर काका आपण लगेच वाचून कळवलं खूप आनंद झाला .आपण अभिप्राय देताना मला जे काव्यरचननेतून सांगायचे आहे ते सांगितलं आहे. सृष्टीची रुपं अगाध आहेत आपल्या बरोबर चर्चा करण्यांत मजा असते भेटू शक्यतो सोबतच पहाटे फिरत.
अनिल पाठक म्हणाले…
खूप छान रचना नंदू. निसर्गाचं वर्णन करतानाच शेवटी आधात्मविषयीची तुझी ओढ दिसून येते.
अनिल पाठक
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
अनिल तुझी पाठीवरील थाप उत्साह वाढवते... होय तू आशय योग्य ओळ्खलास.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी