पाऊले चालती पंढरीची वाट...दोन अनुभव






दोन वर्षाच्या अवकाशानंतर पंढरीची वाट आता पुन्हा वैष्णवांच्या पाऊलांनी सजलेली आहे. नुकतेच देहूतून श्री तुकोबारायांच्या आणि आळंदीतून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झालं आहे. एक भक्तीगंगा प्रवाह लोणंद मार्गे तर दुसरा सासवड मार्गे पंढरीच्या कळसदर्शनासाठी मार्गस्थ झाला आहे . महाराष्ट्राच्या विविध भागातून वेगवेगळ्या संतांच्या नावाचा दिंड्या पंढरपुरी जाण्यास निघालेल्या आहेत. सारा आसमंत विठुरायाच्या गजराने भरून गेला आहे. सारं महाराष्ट्र मानस विठ्ठलमय झालं आहे. वर्षानुवर्षे हा पालखी सोहळा सुरू आहे. अशा प्रकारचा सर्व समाज घटक समावेशक सोहळा अभावानेच इतरत्र देशी घडत असेल. भाव भोळी वारकरी मंडळी जात धर्म वंश वर्ण लिंग भेद विसरून ' राम कृष्ण हरि पांडुरंग हरि अवघी दुमदुमली पंढरी ' असा नामघोष करीत इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी वाटचाल करू लागली आहेत. जेथून पालखी जात आहे आणि जिथे जिथे म्हणून पालखी मुक्काम घडत आहे तेथील ग्रामस्थ मंडळी अतिशय आनंदाने त्यांचं सडा रांगोळ्या घालून स्वागत करत आहेत. खाऊ पिऊ घालत आहेत , औषध पाणी विचारत आहेत काही इतर अडचणी असल्यास त्यातही मदतीचा हात देत आहेत. सारे ग्रामस्थ भागवत धर्माची पताका अंगावर घेतलेल्या सगळ्या वारकऱ्यांना विठूमाऊलीच्या स्वरूपातच पाहत आहेत. सामाजिक ऐक्य आणि मानवता धर्म यापेक्षा वेगळा काय असू शकतो याचे दर्शन घडत आहे.


यासंदर्भातील एक आठवण आज मला सांगावीशी वाटते .


अनुभव- १

१९८६ सालचा जून महिना असावा. मी सातारा येथे नोकरीस होतो आणि सुट्टी जोडून आल्याने मी सोलापूरला दुपारी अडीचच्या लाल एसटी गाडीने घरी आई-वडिलांना भेटण्यासाठी निघालो होतो. सातारा सोलापूर या मार्गावर म्हसवडच्या अलीकडे गोंदवले लागते तर म्हसवडच्या पुढे पिलीव आणि नंतर पंढरपूर ,मोहोळ व सोलापूर हे प्रवासाचे प्रमुख टप्पे आहेत. आमची एसटी म्हसवड आणि पिलीव मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली. एसटी वाहकाने प्रवाशांना एसटी दुरुस्त होण्यास खूप वेळ असल्याने पंढरपूर- सोलापूरला जाणाऱ्या एसटी मध्ये हात दाखवून एसटी बस थांबवून जसे जमेल तसे त्या दोन तीन एसटी बसेस मधून पुढे प्रवास करण्याची सोय करून दिली. जवळजवळ वीस एक माणसं अशा पद्धतीने पुढे मार्गस्थ झाली. आम्ही मागे सात आठ जण उरलो होतो आणि पुढील एसटी बस मात्र या मार्गावरून येण्यास अवकाश होता. माझ्या शेजारी एक वारकरी भगवा झेंडा घेऊन आणि एक पिशवी घेऊन उभा होता. राम कृष्ण हरी पांडुरंग हरी असा त्याचा जप सुरू होता. वेळ असल्याने वारीविषयी उत्सुकता असल्याने मी त्याला बोलते केले त्याचा पंढरपुरातील दिनक्रम विचारला आणि अनमोल माहिती मला मिळाली ती खाली देत आहे. वारकरी म्हणाला- ''आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत; पंढरपूरला गाडी पोचल्यानंतर मी मठामध्ये जाईन आणि आमच्या गावाकडील मंडळींनी जिथे मुक्कामाची व्यवस्था केली आहे तिथे नामस्मरण भजन कीर्तन केले जाईल, टाळकरी अभंग म्हणले जातील नंतर भोजन आणि दुसरे दिवशी विठूराया कळस दर्शन आणि नंतर आपल्या गावी रवाना जाणार असा कार्यक्रम आहे " थोड्या वेळातच तो वारकरी एक अभंग जीभ या विषयी म्हणू लागला. त्याचा अर्थ मी त्यास विचारला तो म्हणाला " ईश्वराने आपणास जे तोंड दिले आहे आणि त्यातून सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे त्यामुळे जिभेवर ताबा राहतो. अति खाणे आणि अवाजवी बोलणे आपोआपच टळते. याबाबतचा हा अभंग आहे.आपल्या तोंडात ३२ दात आणि एक वळवळ करणारी जीभ आहे. तिला ताब्यात ठेवणे खूप अवघड काम आहे. ३२ सैनिकांच्या कडेकोट बंदोबस्तातून ती सारखी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. जरुरीपुरते जिभेचं बाहेर पडणे समजू शकतो परंतु वारंवार बाहेर पडणे हे मानवी हिताचे नाही हाच संदेश या अभंगातून दिला आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नामस्मरण सुरू राहिले पाहिजे. नाम उच्चारण करण्यास कोणतेही बंधन अथवा नियम नाहीत आपण कुठेही स्थळ काळ वेळ याचा विचार न करता नामस्मरण करू शकतो आणि केलं पाहिजे असंच संतांनी सांगितले आहे. "
पंढरपूर येण्यास अवकाश होता. त्या वारकरी बुवांनी नंतर टाळकरी यांचे अभंग याबाबत एक छोटीशी कथा सांगितली तीही खूप रंजक होती ती अशी-

संत तुकाराम यांच्या जीवनातील प्रसंग आहे. काही चोर आणि दरोडेखोर मंडळींना रस्त्यात ज्या ज्या वेळी तुकोबाराया दिसत त्यादिवशी त्यांना खूप पैसा अडका चोरी रूपात मिळत असे. त्या मंडळींनी एकदा असा विचार केला की या माणसाला आपल्या टोळीत सामील करून घ्यावे म्हणजे आपला खूप फायदा होईल. म्हणून एके दिवशी त्यांनी तुकोबारायांना काहीतरी थाप मारून त्यांचे बरोबर एका ठिकाणी येण्याची विनंती केली .तुकोबाराय तयार झाले. सारी चोर मंडळी एका गावातील बड्या श्रीमंताच्या वाड्यात रात्री त्यांना घेऊन गेले आणि त्यांनी त्यांचा चोरी आणि दरोडा टाकण्याचा कार्यक्रम पार पडला. चोर मंडळी पोबारा करण्याच्या तयारीत होते आणि तेवढ्यात झोपलेला धनीक जागा झाला . या मंडळींनी तुकोबारायांना त्या धनीका पुढे ढकलले आणि स्वतः धनीकाच्या वाड्यात लपून बसले. धनीकाने त्याच्या पाठीमागेच असलेली फुटलेली तिजोरी पाहिली आणि तुकोबाराय ही. त्याच्या मनात हा माणूस दरोडा कसा टाकेल असा विचार आला परंतु वेश पालटून दरोडेखोर आले असतील म्हणून त्याने तुकोबारायांनी वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो प्रयत्न यशस्वी झाला नाही धनीकाला काहीतरी अघटित घडत आहे याची जाणीव झाली आणि त्यांनी तुकोबारायांचे पाय धरले. आपले दर्शन झाले मला विठुराया भेटला असे उदगार त्यांनी काढले. हा गंभीर प्रकार पाहून चोर मंडळी सुद्धा अचंबित झाली. त्यांनीही मग तुकोबारायांचे पाय धरले व धनीका पुढे लोटांगण घातले आणि झालेला सर्व प्रकार सांगितला. संत संगतीत आल्यानंतर काय घडते याचे हे उत्तम उदाहरण आहे. हेच कुटाळ्या करणारे लोक पुढे कु शब्द जाऊन भजन करताना टाळकरी झाले. शिवी जाऊन ओवी आली अंतरंग पालटले आणि त्यांनीही अभंग रचले तेच टाळकरी अभंग म्हणून ओळखले जातात. या सर्व गप्पांच्या नादात पंढरपूर केव्हा आले कळले नाही. वारकरी बुवाने राम कृष्ण हरि पांडुरंग हरि म्हणून मला वाकून नमस्कार केला. मीही त्यास वाकून नमस्कार केला . एक वेगळीच ऊर्जा घेऊन मी घरी गेलो. माझ्या आईच्या वडिलांची विठ्ठलावर अपार श्रद्धा होती. आई वडिलांना हा अनुभव सांगितला त्यांनाही खूप आनंद झाला.


अनुभव-२

शाळेत असताना माध्यमिक परीक्षा म्हणजेच मॅट्रिक अकरावीची परीक्षा ही महत्त्वाची परीक्षा असे आणि त्यावेळी अभ्यास करताना दिरंगाई झाल्यास टाळाटाळ झाल्यास घरी वडीलधारी माणसे रागावत असत आषाढी कार्तिकी वारी करायची आहे काय? अशा पद्धतीने शालजोडीतून बोलत असत { म्हणजेच अभ्यास नाही केला तर वारंवार परीक्षेस बसावे लागेल}. आज त्याचा वेगळ्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर सत्कर्म करणे हे आपल्या हातात आहे आणि नामस्मरण केले असता षडरिपूशी सामना करायचे बळ मिळते. ग्रंथांच्या सहवासात आणि वारकऱ्यांच्या संगतीत आपल्याला राहता आले तर ते आपले भाग्यच म्हणायचे. उक्ती आणि कृती यामधील फरक वारकऱ्यांच्या सहवासात आल्यावर कळून येतो. प्रसंग आठ ते दहा दिवसापूर्वीचा आहे . मी घराजवळ धायरी फाट्याला भाजी आणायला गेलो होतो एका शेतकऱ्याकडे सायंकाळी उत्तम ताजी भाजी मिळते म्हणून मी  भाजी घेत असतो मी त्यास आठवड्यापूर्वी विचारले होते की उद्या काय भाजी आणणार तो म्हणाला दोन दिवसांनी वांगी आणि भेंडी आणि नंतर मी वारीला जाणार आहे. मी त्यास विचारले वारी किती दिवस करता त्याने सांगितले की आमच्या वाडवडिलांपासून परंपरा आहे. वारी किती दिवस करत आहे हे सांगावयाचे नसते. अहं निर्मा ण होतो असं त्यानं सांगितलं. काही देणगी मी त्यास अगोदर देऊ केली त्यांनी ती देणगी घेण्यास नकार दिला दोन दिवसांनी द्या अजून अवकाश आहे असं सांगितल.वारकऱ्याच्या सहवासाचा १९८६ मध्ये वर उद्धृत केलेला आलेला अनुभव आणि हा ताजा अनुभव दोन्ही मध्ये काही फरक नाही. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात-


बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥

अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥

त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥

तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥


या जन्मी वारी करायला मिळाली तर त्यासारखा आनंद नाही परंतु नेहमी वारकरी सहवास मिळो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना.

बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय !





टिप्पण्या

अशोक परांजपे म्हणाले…
खूपच छान लेलेजी
अनसुनील म्हणाले…
छान अनुभव
आणि छान लेखन
संतोष दोशी म्हणाले…
नंदू,
खूप छान लेख.
संतोष
Ramakant Kasture म्हणाले…
खुप छान. वाचून मन सुखावले.
अनामित म्हणाले…
दोन्ही अनुभव खूप छान आहेत.. अनुभव वाचून नामस्मरणाचे आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे कळले..
संत माणसे आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला भेटत असतात.. माझा अनुभव सांगायचा म्हणजे मला भेटलेले बाळासाहेब निबंदे काका..
निखिल
Unknown म्हणाले…
अतिशय सुंदर छान् वांटल्
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण वाचून अभिप्राय कळवला माझा आनंद द्विगुणित झाला. कृपया आपले नाव कळवले तर बरं होईल इथे नाव दिसत नाही.
Kshama Paranjape Ganu म्हणाले…
खूप सुरेख अनुभव
Unknown म्हणाले…
लेले साहेब दोन्ही लेख खूप छान,वारीच्या निमित्याने तुम्ही योग्य वेळी लेखन केलेत,व आमच्या पर्यंत पोहोचवले,धन्यवाद,
नामस्मरणाचे महत्व श्री महाराजांनी त्यांच्या प्रत्येक प्रवचनात सांगितले आहे,जे आपल्याला कोणतेही कार्य करताना सहज घेणे शक्य आहे,ज्यामुळे आपल्या उत्तम विचारांची बैठक चांगली होते,
राम कृष्ण हरी,
मिनल धायगुडे,
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण माझा लेख लगेच वाचून आपुलकीने अभिप्राय दिलात खूप बरं वाटलं राम कृष्ण हरी ।V
Unknown म्हणाले…
Very good post Nandu. Hats off to you.
Jayant Vaidya म्हणाले…
Very good post Nandu. Hats off to you...... Jayant Vaidya
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
प्रिय मित्रा माझा लेख लगेच वाचून आपुलकीने अभिप्राय दिलास खूप बरं वाटलं तू पंढरपूरचा हे पक्के लक्षात आहे.राम कृष्ण हरी.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्रीयुत अशोक आफळे यांचा अभिप्राय असा आहे.

लेलेसाहेब
तुमचा प्रदीर्घ लेख वाचला मला भावलेली बाब म्हणजे तो लिहिताना तुम्ही लालित्य आणि प्रसादिकता छान जपली आहे पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा अनमोल सांकृतिक ठेवा आहे तहान भूक हरपून लाखो वारकरी मुसळधार पावसातुन काट्याकुट्याच्या खाचखळग्याच्या रस्त्यातून मार्गक्रमण करीत असतात त्यांची ऊर्जा एकच असते राम कृष्ण हरी आणि ही परंपरा जवळ जवळ 800वर्षे सुरू आहे हा एक चमत्कारच आहे याचा अतिशय वस्तुनिष्ठ
परामर्ष आपण प्रस्तुत लेखात घेतला आहे तो ही
अनुसंधानास कुठेही बाधा येऊ न देता तुम्हाला आलेले अनुभवही आपण कुठलाही अतिरंजीपणा येऊ न देता मूळ लेखाशी
नें टके प्रमाणे जोडले आहेत
दि बा मोकांशींचे वारी
वा चलेत का नसल्यास अवश्य वाचा
एकूण काय तुमच्या लेखनातील प्रगल्भता वाढत आहे
मनःपूर्वक धन्यवाद



Satish Degaonkar म्हणाले…
Nandu,खूपच छान अनुभव आहेत.आणि ते शेअर केल्याबद्दल धन्यवाद.१९८६ मधील प्रसंग इतक्या वर्षांनी आठवून लिहिणे खरोखर कौतुकास्पदच. लिहिते रहा.
Shrikant Lele म्हणाले…
खूप छान लिहिलंयस!
Unknown म्हणाले…
अप्रतिम वाचून सोलापूर आठवले !! आपणास खूप धन्यवादा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी