आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने










गीतगंगा लिहिणारे अत्रे कोठे आहेत ?त्यांना सांगा, त्यांनी हरवता कामा नये. स्थूल रूपाने ,सूक्ष्म रूपाने पण त्यांनी असायला हवे. आपल्या एकाच व्यक्तित्वात बारा अत्रे आहेत ही माहिती स्वतःअत्र्यांनी सांगितली होती त्यापैकी११ अत्र्यांना बाराव्या अत्र्यांची -केशवकुमार यांची सोबत असली पाहिजे.

अत्रे कुठे कोठेही गेले,कोणत्याही स्थानी पोहचले...गीत गंगेचा कलश घेतलेल्या केशव कुमार यांची छाया त्यांच्या बरोबर आहे तोवर सारी गंमत आहे. ती हरवली मग उरले काय ? गृहकर्मी की राजकारणी, सुखशयनी बाजारी.. भ्रमणी ... हरि भजनी की भयानक रणी ही छाया गुप्तरूपाने वावरत आहे तोवर अत्र्यांचे अत्रे पण सदाविकासी राहील." 


कविवर्य वसंत बापट


आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस आदरपूर्वक वंदन करून "फत्तर आणि फुले " ही त्यांची कविता व त्याचे मला सुचलेले रसग्रहण सादर करीत आहे.आपण वाचून आनंद घ्यावा ही विनंती.


फत्तर आणि फुले

कविता-आचार्य अत्रे काव्यसंग्रह "निवडक केशवकुमार "


होता डोंगरपायथ्यास पडला धोंडा भला थोरला

वर्षें कैकहि तरी न तो हाले मुळीं आपुला

आनंदी फुलवेल एक जवळी होती सुखें राहत

बाळे सांजसकाळ हासत तीचीं तैशीच कोमेजत



थट्टेखोर फुलें हंसूनि ती वदलीं धोंड्यास त्या एकदा

"धोंडा केवळ तू ! अरे, न जगती काही तुझा फायदा !"

संतापून तयांस फत्तर म्हणे " कां हीं वॄथा बोलणी

सारी सुंदरता इथेंच तुमची जाईल रे वाळुनी !"



धोंडयाच्या परि काळजास भिडले ते शब्द जाऊनिया

काळाठिक्कर यामुळें हळुहळू तो लागला व्हावया

पुष्पांच्या कवळ्या मनांतहि सले ते फत्तराचें वच

गेली तोंडकळा सुकून, पडली तीं पांढरी फारच !



कोणी त्या स्थलि शिल्पकार मग तो ये हिंडता हिंडता

त्याच्या स्फुर्तिस फत्तरांत दिसली काहीतरी दिव्यता

त्याची दिव्यकलाकरांगुलि न जों त्या फत्तरा लागली

श्रीसौंदर्यमनोरमा प्रगटुनी साक्षात् उभी राहिली



वेडा पीर असाच गुंगत कुणी एकाकी ये त्या स्थळा

ती मूर्ती बघतांच तो तर खुळा नाचावया लागला

त्यानें ती खुडुनी फुलें भरभरा पायीं तिच्या वाहिली

तों, त्यांची फुलुनी कळी खद्खदा सारीं हसूं लागली

लावण्यकॄति ती वनांत अजुनी आहे उभी हांसत

पुष्पेंही बसलींत तीं बिलगुनी पायी तिच्या खेळत





उपरोक्त कविता साधी सोपी सोपी काव्य काव्यरचना आहे. कविता हा वांग्मय प्रकार नेहमीच वाचकांना आनंद देतो कारण या वांग्मय प्रकाराचे वैशिष्ट्य असे कि एकाच कवितेचे भिन्न भिन्न अर्थ निघू शकतात . मला भावलेला अर्थ सांगून या कवितेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

एकमेकास दोष देणे दुसऱ्यास कमी लेखणे या मानवी प्रवृत्तीवर सहज प्रकाश टाकणारी आणि वाचकांना अंतर्मुख व्हायला लावणारी ही एक कविता आहे. एका डोंगर पायथ्याशी उभा असलेल्या एका धोंड्याचे (दगडाचे) आणि तिथेच जवळपास असणाऱ्या वेलीचा एक खट्याळ संवाद या कवितेत रंगवलेला आहे.


त्या डोंगर माथ्यावर तशी फारशी वर्दळ नाही गर्भित अर्थ असा आहे की एखाद्या छोट्या गावात काय किंवा मोठ्या शहरात काय एकमेकांशी क्षुल्लक कारणावरून किंवा रिकाम टेकडे असल्याने वेळ भरपूर असल्याने

काही मंडळी भांडणे करून वेळ दवडण्यात धन्यता मानतात.

या कवितेतील एक फुलवेल जी त्या धोंड्याच्या शेजारीच उगवलेली आहे त्यास वाकुल्या दाखवीत आहे आणि म्हणत आहे तू तर धोंडा आहेस काय फायदा या जगात?

यावर धोंड्याला ही राग येतो आणि मग तो ही गप्प बसत नाही त्या फुलवेलीस तो म्हणतो...

तुझा तरी काय उपयोग आहे अखेर तू अंगावर मिरवणारी फुले दिवसअखेर कोमेजूनच जातात ना ?

असे भांडण नित्य होऊन दोघांमधील  वितंडवाद वाढत चालला आहे.

वास्तविक एकमेकांचे शेजारी असूनही एकमेकास उपयोगी न पडता एकमेकाचे उणे दुणे काढणाऱ्या

मनुष्य वृत्तीचे हे रूपकात्मक वर्णन ही कविता करते. कविता ११ कडव्यांची असून पहिल्या ६ कडव्यांमध्ये विसंवाद भरलेला आहे तर सातव्या कडव्यात एक कलाटणी पाहायला मिळते ती अशी...


वेडा पीर असाच गुंगत कुणी एकाकी ये त्या स्थळा

ती मूर्ती बघतांच तो तर खुळा नाचावया लागला

त्यानें ती खुडुनी फुलें भरभरा पायीं तिच्या वाहिली

तों, त्यांची फुलुनी कळी खद्खदा सारीं हसूं लागली

लावण्यकॄति ती वनांत अजुनी आहे उभी हांसत

पुष्पेंही बसलींत तीं बिलगुनी पायी तिच्या खेळत


या डोंगर माथ्यावर एकदा एक शिल्पकार हिंडायला येतो व त्यास त्या फुलावर रागावलेल्या काळ्या ठिक्कर पडलेल्या धोंड्यात मूर्ती दिसायला लागते. धोंड्यास फोडून आकार देत तो त्यातून एक सुंदर सौंदर्यवती मनोरमा मूर्ती घडवतो. कवितेत पुढे तर आणखीनच गंमत घडते एक वेडा पीर असाच फिरत डोंगर माथ्यावर येतो व त्याला ही मनोरमा मूर्ती आकर्षित करून घेते व तो हर्षभराने नाचू लागतो तर त्याला फुल वेलीवर वरील फुले पाहून एकच हर्ष होतो .त्यानंतर ती कळ्या आणि फुले खुडून तो मूर्तीच्या पायी वाहतो हे सर्व घडत असताना त्या कळ्यांची फुले होतात त्यांना या त्या ठिकाणी राहण्यात आनंद मिळतो . 

या कवितेमध्ये रूपक आणि यमक अलंकार याची योजना आहेच परंतु या कवितेतील आणखीन एक ठळक आगळे वैशिष्ट्य असे की..'त्यांची फुलुनी कळी खद्खदा सारीं हसूं लागली' या ओळीत आचार्य अत्रे यांची उत्तुंग प्रतिभा प्रकर्षाने जाणवते. सामान्यतः 'एखाद्याची कळी खुलणे' म्हणजे ती व्यक्ती अधिक खुश होणे असा वाक्यप्रचाराचा उपयोग होतो येथे त्या फुलवेली वरील कळ्या यांना हर्ष झाला आहे आणि त्या फुलून आल्या आहेत हा अप्रतिम श्लेष इथे सहज साधला गेला आहे. मूर्तिकार, मूर्ती, धोंडा आणि फुलवेल आणि वेडा पीर या साऱ्यांना आनंद झाला आहे त्यांची कळी खुलून आली आहे.

एकमेकांचे उणे दुणे काढून काहीही मिळत नाही वेळ व्यर्थ जातो. माणसांनी एकमेकातील असलेल्या दोषांकडे दुर्लक्ष करून गुणांकडे लक्ष दिले पाहिजे व चांगल्या गोष्टींचा आदर करून स्वतःच्या जीवनात व समाज जीवनात सकारात्मक बदल घडवावेत हाच संदेश ही कविता देत आहे.

शिल्पकार हा ती उभी आडवी शिळा तो त्यास त्यात मनोरमा मूर्ती दिसते तो दगडातील अनावश्यक भाग फोडून काढून बाजूला करतो व मूर्ती मनोरमा जी त्याच्या मनात प्रकटलेली असते ती तो साकारतो. सामान्यपणे बहुतांशी माणसं एखाद्या माणसाशी ओळख होण्याअगोदर त्याच्यावर वरच्या रूपाकडे पाहून तो कसा असेल असा अंदाज करतात तोही नकारात्मक बाजूने तर काही सकारात्मक प्रवृत्तीची उदार मनाची समंजस माणसं त्यांच्याशी बोलून वार्तालाप करून काही काळ संबंध ठेवून कडे काय चांगले गुण आहेत ते पाहतात .या सद्गुणांचा उपयोग करून त्यातून अखंड मानवजातीस उपयोग होईल असे कार्य करता येते हे अनेक प्रभुतींनी आपणांस दाखविले आहे.


संत चोखोबा महाराजांचा एक अभंग येथे उद्धृत करावासा वाटतो .


ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा | काय भुललासी वरलि या रंगा ||

कमान डोंगी परी तीर नोव्हे डोंगा | काय भुललासी वरलि या रंगा ||

नदी डोंगी परी जल नोव्हे डोंगे | काय भुललासी वरलि या रंगा ||

चोखा डोंगा परी भाव नोव्हे डोंगा | काय भुललासी वरलि या रंगा ||


बाह्य सौंदर्य या पेक्षा आंतरिक सौंदर्याला अधिक महत्त्व आहे हेच कवी या कवितेतून सांगत आहे.

जाता जाता एक सांगावेसे वाटते आचार्य अत्रे हे एक अफाट व्यक्तिमत्व होते' प्रीतीसंगम' या नाटकात त्यांनी 'देह देवाचे मंदिर' हे गाणे लिहिले आहे .गाणे अतिशय अर्थपूर्ण आहे आणि गाण्याच्या शेवटी तुका सांगे मूढ जना असे म्हटले आहे वास्तविक इतके सुंदर गाणे भक्ती गीत आचार्य अत्रे यांचे असले तर कदाचित लोकांना आवडणार नाही रुचणार नाही म्हणून ते तुकारामांचे आहे असे म्हटले तर ते आवडेल अशी गंमत आचार्य अत्रे यांनी केली आहे. आचार्य अत्रे यांच्या अष्टपैलू विविध अंगी अफाट व्यक्तिमत्त्वास शतशः नमन.






देह देवाचे मंदिर | Preeti Sangam-Drama | Udayraj Godbole | Vasant Desai | Atre" on YouTube

Inbox


youtu.be/b9JdmNc8nrQ

टिप्पण्या

Jayant Kale म्हणाले…
ही कविता मला माहित नव्हती. नंदू, अत्यंत समर्पक असे रसग्रहण केले आहेस. मस्तच. कवितेचा शेवट व रसग्रहणाचा, दोन्हीही खूपच सुंदर.अभिनंदन.🙏
जयंत कुलकर्णी म्हणाले…
आचार्य अत्रे यांची फत्तर आणि फुल ही कविता व त्या
कवितेचे रसग्रहण वाचले व ते आवडले ज्या प्रमाणे वरून ओबडधोबड दिसणाऱ्या दगडात एक सुंदर मूर्ती लपलेली असते अगदी त्याच प्रमाणे मनुष्याचे अंतरंग निर्मळ असते. हा संदेश कवितेतून मिळाला. धन्यवाद. आचार्य अत्रे यांना विनम्र अभिवादन!
S G Deshpande म्हणाले…
नंदकिशोरजी, खूप छान ब्लॉग. आचार्य अत्रे यांच्या कवितेचे रसग्रहण करताना तुम्ही तुमचा विचार मांडला, आजच्या समाजात या भावनेची खूपच गरज आहे.
आपल्याला दुसऱ्यासाठी काही चांगले उपयोगी जर करता नाही आले, तर कमीत कमी दुसऱ्याला दोष देणे अपमान करणे हे तरी करू नये, हा विचार प्रकर्षाने जाणवला.
चित्र आणि त्यांनीच लिहिलेले गीत अप्रतिम.👌👌🙏🙏
Dilip Dhotre म्हणाले…
व्वा:!! छान.बरीच नवी माहिती मिळाली.
🙏🙏
Rajesh म्हणाले…
Wah...chhan lihile ahat ..kaka
अनिल पाठक म्हणाले…
खूप छान👍👍
रसग्रहण करून कवितेचा गर्भितार्थ छान खुलवला आहे. परमेश्वराची प्रत्येक निर्मिती काही एक उद्देशाने झालेली असते- ती फूल असो की दगड.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी