'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण



'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा 'हे ज्येष्ठ गायिका माणिकताई वर्मा यांनी गायलेले गीत लहानपणापासून आपण प्रत्येक जण आकाशवाणीवरून पहाटेच्या वेळी भक्ती संगीत या कार्यक्रमात ऐकत आलो आहोत. हे काव्य ' केशव 'नामक रामभक्ताने रचले असून संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केले आहे.गीताचे शब्दच चाल घेऊन येतात असं म्हटलं जातं . प्रतिभावंत संगीतकार यांनी संगीत दिलेली गीते ऐकल्यानंतर याचे आपणास नेहमीच प्रत्यंतर येते . हे गीत 'यमन 'रागामध्ये असून माणिक ताईंनी अतिशय भाव उत्कटतेने सादर केले आहे. या गीताचे सुरुवातीचे संगीत आणि माणिक ताई यांचा त्यानंतर येणारा शब्द उच्चार याने माझ्या मनावर गेली अनेक वर्ष पकड घेतली आहे. या गीताचे रसग्रहण करावे असे गेले वर्षभर माझ्या मनात आहे. आज रामनवमी असल्याने ते कागदावर उतरून पूर्णत्वास जात आहे.

घडी घडी घडी चरण तुझे आठवते रामा

आसनी शयनी भोजनी गमनी छंद तुझा आम्हा

दृषा तीच पूर्णब्रह्म नित्य निर्विकारा

अंबुजदल नयना मुनी मानस विहारा

सर्वसाक्षी सर्वोत्तम सर्व गुरुरूपा

प्रेम चित्ता सौख्य सिंधू दशरथ कुलदीपा

मास दास भ्रात नाथ तूच एक पाही

केशव म्हणे करी कृपा शरण तुझ्या पायी

कवी रामाचा असीम भक्त आहे तो क्षणभरही रामाचे विस्मरण होऊ नये म्हणून रामनामाचा पुनरुच्चार करत आहे. घडी घडी घडी हा अनुप्रास इथे म्हणूनच सहज योजीला गेला आहे. हरघडी, क्षणोक्षणी- बसलं असताना, भोजन करताना ,गमन करताना म्हणजेच फिरताना आणि शयन करताना सतत रामाचे स्मरण करणे हा त्याला एक छंद लागला आहे. जणू त्याची ती प्रतिक्षिप्त क्रिया झाली आहे. अनेक संतांनी सांगितले आहे कि मनुष्यजन्म हा दुर्मिळ आहे. प्रपंचामध्ये सुखदुःखाचा लपंडाव सुरू असतो आणि आणि सुख आले असता हुरळून जाणे आणि दुःख आले असता निराश होणे हे घडत असते. परंतु सहज सोपी नामसाधना केली असता या संसार सागरातून तरता येते. नाम साधनेने वासनेचा क्षय होऊन अंतिमतः त्याला मोक्ष मिळतो असे संतांनी निक्षून सांगितले आहे. म्हणूनच कवी इथे राम नाम अविरतपणे घेत आहे.

भक्तीचे विविध प्रकार नवविधा भक्ती श्लोकात सांगितले आहेत.

, 'श्रवणं किर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।'

सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी नामस्मरण याचे महत्व त्यांच्या दैनंदिन प्रवचनात सोप्या भाषेत सांगितले आहे. नामस्मरण नवविधाभक्तीतील एक भक्ती प्रकार असून ती कोणतीही स्थळ काळ वेळ याचे बंधन नसलेली अशी उपाधी विरहित भक्ती आहे. घडी घडी घडी चरण तुझे आठवते रामा आसनी शयनी भोजनी गमनी छंद तुझा आम्हा असे कवी म्हणूनच म्हणत आहे.

पुढील तीन कडव्यांमधून हा राम कसा आहे याचे वर्णन आले आहे. राम सर्व ठिकाणी सर्वत्र दिसणारा दृषा असा सर्वव्यापी पूर्णब्रह्म आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी कवीस श्रीराम दिसत आहे .पुढे रामास नित्य निर्विकारा हे विशेषण योजिले आहे ; त्याला पाहता त्याचे नित्य स्मरण करता तो आपले मन निर्विकार करतो म्हणजेच वासनारहित करतो. त्याचे नित्य स्मरण ,त्याची आठवण याने माणसाच्या मनावर असलेला षडरिपूचा अंमल दूर होतो व अंतिमतःनष्ट होतो. हे रामनाम मनाला अलौकिक आनंद देते जो शब्दातीत आहे. ती प्रत्येकाने घेण्याची अनुभूती आहे. कवी पुढे म्हणत आहे .अंबुजदल नयना मुनी मानस विहारा म्हणजे या रामाचे डोळे हे अनेक कमलाप्रमाणे आहेत . कवीच्या रामा विषयीच्या उत्कट भावनांमुळे केवळ रामाचे डोळे हे एका कमला सारखे दिसतात असे न म्हणता अनेक कमल पुष्पे म्हणजेच कमलदल याचे प्रतिबिंब डोळ्यात उमटल्यावर जसे वाटेल तसे आहेत. पुढे कवी सांगत आहे हा राम कुठे वसतो, राहतो तर ऋषी मनी जे अनेक स्तोत्रे रचून त्याद्वारे त्याची महती सामान्य जनांपर्यंत पोहोचवतात अशा ऋषीमुनींच्या मनात राम विहार करतो. ज्याप्रमाणे विहंग विशाल गगना मध्ये स्वतःच्या आनंदात सहज भरारी घेत असतो, विहार करत असतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष राम हा ऋषींच्या मनात सदैव वसून जणू विहार करत आहे असे कवी सांगत आहे. अभेद्य भक्ती केली असता भक्ताला काय मिळते हेच यातून दिसून येत आहे. सतशिष्य सदगुरूच्या शोधात असतो तसा सदगुरु ही अनन्य भक्ती करणाऱ्या सतशिष्य भक्ताच्या शोधात असतो आणि एकदा का असा सतशिष्य भेटला की तो त्याचे जवळच राहतो. आणि म्हणूनच ऋषीमुनींच्या मनात चित्तात राम वसलेला आहे. पुढे रामाचे वर्णन सर्वसाक्षी सर्वोत्तम सर्व गुरुरूपा असे आले आहे. भक्ताने रामाला साक्षी ठेवले आहे. हा राम सर्वोत्तम म्हणजेच सर्व सद्गुणांचा समुच्चय असलेला गुरूंचा गुरु आहे. भक्ताकडून जीवनामध्ये घडणारे प्रत्येक कर्म प्रत्यक्ष रामराया साक्षी होऊन पाहत असल्याने ते सत्कर्मच घडावे याची खबरदारी आपोआपच घेतली जात आहे.

प्रेम चित्ता सौख्य सिंधू दशरथ कुलदीपा म्हणजेच राम सतत समोर असल्याने त्याच्या प्रेम कटाक्षाने चित्त स्थिर झाले आहे. भक्ताच्या मनात चित्तात सर्व प्राणीमात्रांविषयी नित्य स्नेह भावाचे रोपण होत आहे. त्याला पुढे सौख्य सिंधू असे म्हटले आहे. वास्तविक सागराचे पाणी हे खारट असते परंतु रामाचे नित्य स्मरण केल्याने तो सतत बरोबर असल्याने जीवनातील सर्व दुःख दारिद्र्यरुपी खारटपणा याचे रूपांतर गोड पाण्यात होत आहे . या कारणे रामास सौख्य सिंधू अशी उपमा दिली आहे. राम हा सर्वसामान्य दशरथ पुत्र नाही तर तो रघु कुलातील दशरथाचा कुलदीपक आहे. रामाने जसा त्याच्या कुळाचा उद्धार केला तसाच कुळाचा उद्धार करून घेण्यासाठी राम नामाचे महत्व पदोपदी कवी सांगत आहे. शेवटच्या कडव्यात मास दास भ्रात नाथ तूच एक पाही म्हणजेच राम हाच भक्ताचा माता पिता बंधू-भगिनी सखा सर्व काही असा नाथ आहे. जीवनातील सर्व भ्रांती त्याच्या नामस्मरणाने लोप पावते .रामाच्या विषयी असणारे अतुच्य भाव वेगवेगळ्या उपमा देऊन विशेषणे देऊन राम भक्त केशव कवी याने या गीतात प्रगट केले आहेत. आणि हे वर्णन करताना नित्य निर्विकारा ,मुनी मानस विहारा सर्व गुरुरूपा दशरथ कुलदीपा अशाप्रकारे यमक अलंकार आपोआपच योजिला गेला आहे. मोक्ष म्हणजे बंधनातून मुक्त होणे. समर्थ रामदासांनी दासबोधात मुक्तीचे चार प्रकार सांगितले आहेत- सलोकता, समीपता स्वरूपता आणि सायुज्यता. त्यातील सायुज्यता ही मुक्ती शाश्वत व कायम टिकणारी असल्याने श्रेष्ठ आहे . अशी मुक्ती कवीला हवी आहे यासाठी रामकृपा सदैव राहावी म्हणून तो रामाच्या चरणी लीन झाला आहे.

गीतकार आणि अथवा कवीने कितीही उत्तम शब्द लिहिले आणि संगीतकाराने त्याला उत्तम चाल लावली तरी ती प्रत्यक्षात संगीतकाराच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या गळ्यातून उतरवण्याचेसाठी गायक अथवा गायिका यांचीही परीक्षा असते . गायनाचा नित्य रियाज करून ,शब्दांचे तोल मोल जाणून ते समर्थपणे गायले जातात आणि म्हणूनच ते श्रोत्याच्या हृदयी भिडतात. आदरणीय माणिक वर्मा यांनी या गाण्याचे सोने केले आहे. त्यांच्या गानतपस्या गानकौशल्य याबाबत प्रसिद्ध संगीत समीक्षक श्री रामकृष्ण बाक्रे यांनी ' सुरीले' या पुस्तकात प्रदीर्घ लेख लिहिला आहे. त्यात असे म्हटले आहे कि माणिक वर्मा यांनी तत्त्वज्ञान या विषयात एस पी कॉलेज पुणे मध्ये बी ए चा अभ्यास करताना त्यांना आदरणीय परमपूज्य सोनोपंत दांडेकर यांच्यासारखे प्राध्यापक लाभलेले होते."सोनोपंत दांडेकर यांच्यासारखा अधिकारी गुरु आणि स्वतःच्या चित्तवृत्तीत भक्तीरसाचं अभिसरण यामुळे माणिक ताईंनी तत्त्वज्ञानाची निवड का केली असेल हे सहज समजू शकते आणि म्हणूनच माणिक ताईंची भक्ती गीते थेट श्रोत्यांच्या हृदयाच्या कब्जा घेत असावीत" अभेद भक्ती सांगणारे कवी केशव यांना त्रिवार वंदन करतो आणि

संगीतकार आदरणीय राम फाटक आणि माणिकताईं यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून ही लेखनसेवा श्रीरामचरणी अर्पण करतो.

श्रीराम जय राम जय जय राम.

टिप्पण्या

Shrikant Lele म्हणाले…
खूप सुंदर झालंय!
अनामित म्हणाले…
Sir, your explanation of the devotional song is very elaborate and deep. Your views have have reached the depth of the poet's feelings. Your indepth study reg versatile and eloquent singer Maniktai Veema is also shows your interest in music. Very good article
अनामित म्हणाले…
वा वा खूपच छान रसग्रहण केले आहे, त्या सोबतच
प्रत्येक कडव्याचा आशय आणि संगीतकार यांचे बाबत छान नमूद केली आहे एकंदरीतच खूप खोलवर विचार करून लिखाण केले आहेस
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण त्वरित वाचून कळले आनंद झाला आपले नाव कृपया सांगावे ही विनंती.

Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
Sir thanks for your immediate response.Please inform your name
S G Deshpande म्हणाले…
खूपच छान रसग्रहण,प्रत्येक कडव्याच वर्णन तुम्ही अतिशय ओघवत्या शैलीत भक्तीपूर्ण असे केले आहे.
कवी पेक्षाही काकणभर जास्त तुम्ही भक्तीरसात चिंब भिजलेले जाणवले, आणि माणिक ताईंनी ते म्हटलं म्हणजे ब्रम्हानंदी टाळी लागते.👌🙏
अनिल पानसे म्हणाले…
वा ! नंदूजी, अप्रतिम ! सुलभ तात्विक विवेचनासह माणिकताईंचा तत्वज्ञान विषय,पू.मामांचं मार्गदर्शन ही सगळी पार्श्वभूमी सांगून या गीताने एवढी उंची का गाठली ते सहज मनावर ठसवलेत. 🙏🌷🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपल्या आगळ्या अभिप्रायाने आनंदून गेलो. असंच प्रेम राहू दे.
अशोक आफळेO म्हणाले…
लेले साहेब खूप अभ्यास तसेच मनन चिंतन करुन आपण हे रसग्रहण शब्दांकीत
केले आहे. प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वाचे अंतरंग खुले
करतांना आपण वापरलेली शब्दकळा अतिशय लोभस आहे.
राम भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.एका गीतांवर
एवढे विस्तृत रसग्रहण करणे सहजसाध्य नाही.तुम्हाला ते जमले आहे.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण रसग्रहण लगेचच वाचून सविस्तर अभिप्राय दिला. खूप आनंद झाला आपण नेहमीच मला प्रोत्साहन देता म्हणूनच नव प्रेरणा मिळते.
श्रीराम
मधूकोष अविनाश पंडित. म्हणाले…
गीत लेखन, संगीत बंध, गायन जितकं उत्कट तितकंच, रसग्रहण समर्पक आणि वाचनीय झालंय ! 🤓👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
डॉक्टर सौ प्रतिमा जगताप म्हणाले…
अगदी रसाळ विवेचन..रामभक्तीने ओतप्रोत!जय श्रीराम!!🙏🏻🌷
श्रीराम टिळक Uwb म्हणाले…
आताच तुमचे या गाण्याचे रसग्रहण वाचले आणि खूप आनंद झाला ..अतिशय भाव रसपूर्ण ....शब्दातील आणि शब्दामागाचा अर्थ छान उलगडून दाखविला आहे....खूप जुनं गाणं माणिक ताईंचा मधाळ आवाज, सोपी चाल....कवी केशव म्हणजे कोण....त्यांचे पूर्ण नाव काय....आणि तुमच्यातला हा गुण माहीत नव्हता...आणखी काही तुमचे लेखन असेल तर शेअर कराल का......तुम्ही पुण्यात राहता ना.....मी पण आता पुण्यात आलो हे....आपण एकदा भेटू या.......
अनामित म्हणाले…
नंदू तुझे रसग्रहण म्हणजे एक वेगळीच अनुभूती देऊन जाते.एवढे सुंदर आणि प्रतिभावंत रसग्रहण फारच कमी वेळा सध्याच्या काळात वाचण्यात आले.तुझी वैचारिक आणि अध्यात्मिक पातळी फारच उच्च कोटीतील आहे यात शंकाच नाही.अशा प्रकारचे रसग्रहण शाळा सोडल्या नंतर मी तरी नाही वाचले.मी ११ व्हायला असताना स्वातंत्रवीर सावरकर यांनी लिहिलेले " स्वतंत्रते भगवती" या गीताच्या रसग्रहण शिकल्याची आठवण येते. फारच उत्कृष्ट दर्जाचे रसग्रहण झाले आहे.
अनामित म्हणाले…
शिरीष सुमंत: वरील अभिप्राय
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
तू अत्यंत आत्मीयतेने तुझा अभिप्राय दिला . खूप आनंद झाला. आपलं मैत्र विविध अंगानेअसंच फुलू दे.
रवि परळे म्हणाले…
अतिशय सुंदर मार्मिक रसाळ भाव रसग्रहणात दिसला.. भक्ती म्हणजे विरक्ती नव्हे तर विलिन होणे असते. शब्दांच्या मार्गाने शब्दांच्या पलिकडे जायचे म्हणजे नाम . हळूहळू नाम घेता घेता ते नाम सहज स्मरण भावात जाणे ही त्या भावावस्थेची पायरी रसग्रहणात उमजते. संगीतकाराच्या नावातच राम असल्याने केशवाचे अध्यात्म गाण्यात उमटणे हा माणिकयोग आपल्यासाठी आहेस याचे भान याची आठवण लेले नकळतपणे रसग्रहणात करून देतात. किती करांनी ते दान घ्यावे असा आपल्याला प्रश्न पडेल तरी त्यांचे *ले - ले * भरभरून असे ज्ञान देणे घेणे या पलीकडे नेतेच. गाणे ऐकतानांच्या तृप्तीला सार्थकपणाकडही नेते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण