सुहास्य तुझे मनास मोही- रसग्रहण
सुहास्य तुझे मनास मोही- रसग्रहण
जसे फुल फुलताना दिसत नाही तसच प्रेम हे कसं फुलतं हे कळत नाही .पहिली दृष्टादुष्ष्ट- नजरा नजर हीच सुरुवात शुभंकर गाठ बांधते.जसे झाडांवर पहिल्यांदा कोवळी पालवी येते नंतर त्यातून फांदी दिसायला लागते त्याला पाने लागतात नंतर कळी येते फुल येते फळं येतात. प्रेमिकांच्या कधी सारख्या गाठीभेटी होतात तर कधी क्वचित परंतु या प्रत्येक भेटीतला आनंद प्रिया व प्रियकर साठवत जातात. अशाच एका क्षणीक भेटीतील प्रेमभाव या गीतातून प्रियकर व्यक्त करीत आहे. म्हणत आहे की तुझे हास्य किती लोभस आहे सुरा अर्थात मद्य जरी जवळ असले तरी त्याला दूर करून मी तुलाच जवळ करीन .वास्तविक इथे तिच्या सौंदर्यावर तो लुब्ध झाला असून ते सौंदर्य हसताना अधिक खुलते आणि मद्यपान केल्यावर जसा माणूस हळूहळू धुंद होतो तशी धुंदी या प्रेमिकाला चढली आहे.
गीताच्या दुसऱ्या कडव्यात तुझे लोचन -नयन हे मोहक आहेत आणि तू हसताना ते अधिक मोहक दिसतात जणू चंद्राचा प्रकाश त्यात विलसत आहे असाच भास होतो. आणि त्यामुळेच चंद्रिका म्हणजेच चांदण्या ही तुझ्या नयनावर लुब्ध झालेल्या आहेत. वास्तविक चंद्रिका ही चंद्रावरच खुश असते. असे म्हणतात 'चांदनी चांद से होती है सितारो से नही 'परंतु इथे मात्र तिच्या डोळ्यातल्या जादुने चंद्रिकेला ही क्षणभर चंद्राचा विसर पडला आहे. प्रियकर पुढे म्हणत आहे काय सांगू प्रिय तुझे हास्य तुझे लोचन सारं सारं तुझं रूप इतकं लोभस आहे की तुझं सारं यौवन म्हणजे फुललेला वसंत ऋतू आहे ; यौवनाचा वसंत आहे म्हणजे यौवनातील परमोत्कर्ष असं म्हणत कवी यौवनाचं उदात्तीकरण करत आहे . आणि या वसंतरुपी यौवनावर कोकीळ भुलला आहे. कोकीळ कूजन हे फक्त वसंतात ऐकू येते. इथे तिचे मनोहरी रूप सौंदर्य कोकीळ पक्षाला आकर्षित करीत आहे आणि कोकीळ पक्षीकूजन तिच्याकडे बघूनच करत आहे . हा कोकीळ दुसरा तिसरा कोणी नसून प्रियकरच आहे. कोकिळ पक्षी गातो कोकिळा नाही या सत्याचा कवीने खुबीने वापर केला आहे. जसे वसंत व कोकीळकुजन हे अभेद्य नाते आहे तसेच प्रियकर व प्रेयसीचे चिरंतन नाते प्रेम आहे.
प्रियेचे युवतीचे सुहास्य लोभस नयन सौंदर्य यौवन रूप याला भुलून मद्य प्याला ही गौण ठरतो, चंद्र विसरून चंद्रिका मोहित होते, कोकिळ पक्षी ही तिचे सौंदर्य बघून वसंत ऋतू सुरू आहे असे वाटून तो ही लुब्ध अशा विविध प्रकारे विरोधाभास अलंकार योजून कवीने प्रियकर प्रियेचा कसा अनुराग व्यक्त करत आहे हे नाट्यमयरित्या वर्णिले आहे.
पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले हे गीत अनेक वर्षापासून आपण ऐकत आहोत. गाण्याची आलापी ही आपल्याला मोहित करते आणि आणि एक एक अंतरा आपल्याला एक वेगळाच आनंद देतो. धुतल्या तांदळा प्रमाणे गीतातील शब्दांचे स्पष्ट उच्चार ही अभिषेकबुवा यांची खासियत इथेही अनुभवास येते . जणू शरद ऋतूतील चांदणे बरसत आहे असेच वाटत राहते. पंडितजी गेल्यावर दैनिक सकाळमध्ये 'स्वराभिषेक थांबला' अशा मथळा असलेला श्रद्धांजली पर लेख आला होता त्याची सत्यता पटते.
टिप्पण्या
तुम्ही सांगितल्याच्या विपरीत,मी आधी रसग्रहण वाचले आणि नंतर गाणे ऐकले.
प्रत्येक सूरा बरोबर अर्थ समोर येत होता आणि गाणं अधिक सुरेल वाटतं होतं.
खूप छान वाटलं..
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात,ही किंवा माधव ज्युलियन यांची शामलेस चे स्मरण व्हावे
अशा उंचीचे हे गीत आहे.
असचं लिहीत जा.. खुप शुभेच्छा 🤝