रम्य ते बालपण.....


आज बालदिन आई लहानपणी पेरू, लहान आंबट गोड बोरं, काशी बोरं कवठ फळ , आंब्याच्या दिवसात रायवळ आंबे, भुईमूग शेंगा ऋतुनुसार अशी फळे आपणा सर्वांना खायला देत असे. ही फळे देताना विशेषतः जी फळे मर्यादित असत त्यांच्या बाबतीत वाटा करून दिला जाई आणि त्यामध्ये मग भावंडांमध्ये थोडीफार कुरबुर होत असे त्यात एक वेगळीच मजा असे. विशेषतः कवठ आणि गुळ एकत्र असा खाऊ याचा वाटा आपल्याला आहे तो खाऊन झाल्यावर भावंडांच्या वाट्यात लक्ष घालून मला थोडेसे दे अशी लाडीगोडी लावली जात असे आणि मग भाऊही थोडासा त्यातला आपल्याला देत असे. अशा या लहानपणीच्या गमती जमती काही मधुर तर काही आंबट गोड बाळ जीभ जागवणाऱ्या आणि स्मृती पटलावर उमटलेल्या. त्याची आठवण प्रकर्षाने झाली आणि मग एक काव्य उमलले ते असे.

🎶🎶

बाल दिनानिमित्त बालपणात घेऊन जाणारी आत्ताच सुचलेली कविता..

 *रम्य ते बालपण* 

कधीच संपू नये असे.. 

स्मृती त्या आईने विळीवर चिरून दिलेल्या  पेरूच्या, कवठ गुळाच्या, राय अवळे,गावठी आवळे, आंबट गोड बोरं,  काशीबोरे , कैरी चिंच मिटक्या मारत खायच्या ,

चोखून खायच्या रायवळ आंब्याच्या....  पापड लाट्या गट्टम् करण्याच्या, गव्हाचा चीक हातावरून खाण्याच्या कुरवड्या पापड्याच्या उन्हात बसून घरातील अंगणात अथवा गच्चीत त्या वाळवणं याच्या, माठातील वाळ्याच्या पाण्याची गंमत चाखण्याच्या ,बाम गोळा खाण्याच्या कुल्फी खाण्याच्या.... दिवाळीत वसुबारसेला गोग्रास देण्याच्या. .. फटाके फुलबाज्या उडवताना जपून उडव म्हणून प्रात्यक्षिक दाखविण्याच्या, शेजारपाजारी कुठे दिवाळी नसल्यास तिथे फराळ अगोदर देण्याच्या... , फराळाचे जिन्नस झाल्यानंतर लक्ष्मीपूजनासाठी म्हणून स्वतंत्र एका डब्यात ते काढून ठेवण्याच्या .. शेजारी एकमेकांच्या घरी तुळशी विवाहास जाण्याच्या,

किती सांगितल्या तरी कमी कारण ....

श्यामची आईच असते प्रत्येकाची आई 

संस्कार शिदोरी देते ती भारी जगण्या, तरण्या या संसार सागरी.

नंदकिशोर लेले..

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
खूप सुंदर आठवणी. नकळत किती सकस अन्न खात होतो आपण.किती आनंद होता त्या एका फोडीचे चिमण्या दातांनी तुकडे करण्यात.खरेच रम्य
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार आपण वाचून लगेच कळवले आनंद झाला आपले नाव कृपया सांगाल का म्हणजे मी ते ब्लॉग् वर लिहीन.
Kiran P. Joshi म्हणाले…
छान आठवणी! सुंदर शब्द!!
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
वसुबारस ते तुलसी विवाह या दीपोत्सवाचा मुक्त छंदातील सुरेख आकृतीबंध.त्यात बालपणीच्या आठवणी गुंफल्यामुळे तो अधिकच
रंजक झाला आहे.
पापड्या कुरड्या च्या उल्लेखामुळे मलाही माझे बालपण आठवले. या साठी आम्ही वडाची पाने आणत असू.
सुप्रभात. अशोकजी आफळे कोल्हापूर
अविनाश आपटे मधुकोश म्हणाले…
नंदकिशोरजी,
मी विचार केला की हे काव्य मोठ्याने वाचावे,पण एक एक पदार्थाचे उच्चारण झाले की तोंडाला पाणी सुटले नि शब्द घरंगळले. नेहमीची यमकबद्ध कविता न होता,गमकबद्ध कविता झाली ,याबद्दल अभिनंदन! ⚘️
प्रसंगोचित सहज स्फुरणा-या कवितेची मजाच वेगळी असते.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
किरण तू वाचलं लगेच खूप आनंद झाला मला.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपला आस्वाद युक्त अभिप्राय मिळाला पोट भरलं. 😛🫡काव्य हे असंच असतं आलं की लिहावं त्यानंतर मग काही वाटलं तर आपण पुढे त्यात बदल करू शकतो. आता ब्लॉग सुविधा झाल्यामुळे हे अधिक सुकर झाले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण