अक्षयपात्र शारदेचे...

अक्षयपात्र शारदेचे..



शारदा माते  वसंत पंचमी जन्मदिन  
वाहतो म्हणूनी
तवचरणी हे काव्यसुमन
ऋषि मुनि संत महंत आचार्य अन् कवीगण 
सांगती तव महिमा  रूप वर्णन

नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तक धारिणी 
आद्य शंकराचार्य म्हणती तू काश्मीरपुर निवासिनी, ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी 

ज्ञानदेव म्हणती तू अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कलाकामिनी, शारदा विश्वमोहिनी,

नामदेव म्हणती सारजा, 
चतुराननाची आत्मजा,

एकनाथ म्हणती सारासार विवेकमूर्ती,
 स्फूर्तीची स्फूर्ती ,अमूर्ताची मूर्ति

तुकाराम म्हणती माउली सारजा

रामदास म्हणती शारदा मूळ चत्वार वाचा, 
वेदमाता, शब्दमूळ वाग्देवता

शब्दसंपदा पडे अपुरी 
किती वर्णू तुझी रूपे भारी
तारसी तू आम्हां संसारी   

तू मूळमाया
वसशी ओंकारी चंद्रबिंदूत 
मानवात परा,पश्यंती,मध्यमा, वैखरी
चार वाणीत  
५२ मुळाक्षरे यांत 
१६ स्वर,३६ व्यंजन योजसी
 देण्या ज्ञान 
लेखणीतून मग प्रकट होई 
महान ग्रंथसंपदा चार वेद उपनिषदे 
भागवत आदी अठरा पुराणे व 
गीता अन् संत वांग्मय
गद्य-पद्य -कथा, काव्य ,कादंबरी, 
निबंध, लघुनिबंध, व्यक्तिचित्रण,चरित्र, 
ललितलेख, बखर ,नाट्य 
विविध साहित्य आविष्कार 
अगणित पुस्तकें नवरसातून 
तुझा प्रतिभा वाग:विलास 

प्रसन्न होता उपासकावरी
भरशी मळवट 
दाविसी अक्षर वाटा 
पाठविशी त्यासीं रसिक दरबारी  
मग नेशी लौकिकातूनी अलौकिकात ,   

नमन करतो जो तुला प्रभाती 
पातो आशिर्वच अक्षयपात्र अक्षयदान 

हर्षे गातो गुणगान 
पुनः पुनः नमितो नंदकिशोर
तवकृपे रचितो हे स्तवन !

- नंदकिशोर लेले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण