क्षण स्वाक्षरीचा -पंडित प्रभाकर कारेकर

 

क्षण स्वाक्षरीचा - गोवेकरी गानवैभव पंडित प्रभाकर कारेकर

पंडित प्रभाकर कारेकर देवाघरी गेल्याची बातमी कळली आणि मन विषण्ण झालं . त्यांच्या सातारा येथील गायनाच्या मैफलीची आणि नवी मुंबई मध्ये  नोकरीस असताना झालेली प्रत्यक्ष भेट, मैफिल या साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. 

त्यांच्या गायकीचा अनुभव सातारा येथे समर्थ सदनामध्ये अनेक वेळा अनुभवता आला. श्रीयुत अरुण गोडबोले हे बहु आयामी व्यक्तिमत्व त्यांना हक्काने पाचारण करत असे आणि सातारा भूषण या पुरस्कार निमित्ताने अथवा काही अन्य निमित्ताने समर्थ सदनात त्यांच्या मैफली होत असत. तसेच यासह अनेक  उत्तम कार्यक्रम वक्ता दशसहस्रेषु  शिवाजीराव भोसले , राम शेवाळकर यांची भाषणे ही समर्थ सदनात ऐकता आली हे आम्हांस लाभलेले थोर भाग्यच होय.

गोव्याच्या मातीमध्ये अलौकिक सुगंध आहे. अनेक उत्तम साहित्यिक, संगीत नाट्य कलाकार मंडळी या भूमीमध्ये जन्मली आणि त्यांनी  मराठी जना मनात साहित्य आणि गाण्याचे संस्कार रुजवले,मनाचे समृद्ध उन्नयन केले. प्रभाकर कारेकर हे याच सधन, सजल, सकस पावन भूमीचे गानरत्न.मलमली झब्बा आणि पायजमा, मागे घेतलेले कुरळे केस, चेहऱ्यावर मंद हास्य,नाकाची विशिष्ट ठेवण आणि अनुनासिक आवाज हे यातून गोवेकरी आहेत हे चटकन ध्यानी येत असे . प्रत्येक वेळी मैफिलीत काहीतरी वेगळं देत असतानाही त्याविषयीची कमालीची अलिप्तता , विनयशीलता ही त्यांची काही गुणवैशिष्ट्ये. सरस्वती उगाच नाही नांदत अशा महान व्यक्ती असल्याशिवाय हेच खरं.

मर्मबंधातली ठेव  ही, हा नाद  सोड  सोड, प्रिये पहा, धन्य आनंद दिन पूर्ण मम, जैसी गंगा वाहे तैसे अशी अनेक अजरामर गाणी कारेकरांचे नाव घेतल्यावर ओठी येतात. ते त्याचे खरे धनी आहेत. अशा महान व्यक्तीची गाठ ऑक्टोबर २००६ च्या दिवाळीत आमच्या IDBI बँकेने प्रायोजित केलेल्या आकाशवाणीवरील दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे निमित्ताने खूप वेळ पडली .त्याचवेळी आदरणीय रामदास कामत, मंजुषा कुलकर्णी ही मंडळी सहभागी उपस्थित होती. सारी मंडळी ऐरोली नवी मुंबई येथील सभागृहात दिवाळी पहाट असलेने आदल्या दिवशीच  रात्रीच तेथे आलेली होती आणि  अतिशय साध्या पद्धतीने केलेल्या जेवणाच्या आणि राहण्याच्या व्यवस्थेत राहिली होती. माझे बँकेतील मित्र आणि संगीताचे चाहते श्री प्रकाश रसाळ हे सोबत होतेच. आम्हा  दोहोंना पंडित प्रभाकर कारेकर यांच्याशी वार्तालाप  करण्याचा एक उत्तम योग सहज चालून आला होता.  दुसरे दिवशी दिवाळी पहाटेचा त्यांचा परफॉर्मन्स उत्तमच झाला आणि त्यानंतर कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरता त्यांची गाठ घेतली . त्यांच्यापुढे सही करता छोटी डायरी पुढे केली आणि मंद हास्य करत त्यांनी आपली स्वाक्षरी उमटवली. तो क्षण म्हणजे त्यांच्या दिव्य आनंद दिन  गाण्यातून कानी मनी ठसलेला माझ्याकरता खरोखरीच दिव्य आनंद दिन ठरला. 


१२ फेब्रुवारीस मात्र त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीत नाट्य संगीत आवड असणारे मराठी जन मन  दीन झाले.

त्यांची स्वाक्षरी ज्यातून आगळा साधेपणा प्रतीत होतो ती माझ्याकरता मर्मबंधातील ठेव  आहे. जन्म या शब्दातच जगणे आणि मरणे हे आलेले आहे . परंतु या मधल्या कालावधीत माणूस काय करू शकतो ही अशी महान मंडळी देवाघरी गेली म्हणजे कळते नव्हे आकळते . 

'मरावे परी कीर्ती रुपे उरावे 'असे समर्थ रामदास स्वामी वचन  आहे. असंच वैभवशाली गानवैभव कीर्ती ठेवून श्री.कारेकर देवाघरी गेले आहेत. आपल्या प्रदीर्घ गान सेवेने भारतातील आणि परदेशी श्रोत्यांना ज्यांनी दिव्य आनंद दिला ,तृप्ती दिली , शिष्य तयार केले अशा दिग्गज प्रभाकर कारेकर या  सरस्वती पूजकास भावपूर्ण आदरांजली. 

ओंजळीत आले ते पाथेय

 हेच असे मम भाग्य 

 कृतार्थ करण्या जीवन

 ठेऊ आपणासारखे

 उदात्त ध्येय 

 करितो निश्चय 

 वाहतो हे स्मरण अर्घ्य  

आदरभावे लिन होऊन .🙏

टिप्पण्या

Shrikant Lele म्हणाले…
अतिशय सुंदर. सोनेरी क्षण !
अनामित म्हणाले…
भावविवश करणाऱ्या अनुभवाचे उत्तम शब्दांकन.त्यांच्या चिरविरहाचे दुःख
सुध्दा आपण कमीत कमी शब्दात पण प्रत्य्यकरिरित्या व्यक्त केले आहे.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार. आपण लेख लगेच वाचून आत्मीयतेने अभिप्राय दिला खूप खूप बरं वाटलं. आपलं नाव कृपया सांगाल का ब्लॉगमध्ये दिसत नाहीये.
Narayan Burte म्हणाले…
खूप छान मित्रा, खूपखूप छान
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार नारायणराव तू लगेचच माझा लेख वाचून आपुलकीचा अभिप्राय दिलास .खूप खूप बरे वाटले. मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
Vijay Ransing म्हणाले…
श्री नंदकिशोर जीं अतिशय भावपुर्ण अनुभव पंडित प्रभाकर कारेकर यांच्या प्रत्यक्ष भेटीची आणि दुर्मिळ अशी स्वाक्षरी आपण त्यांची मिळवली आयुष्यभरासाठी या आठवणी तुमच्या हृदयातील कप्प्यात राहतील. आयुष्यातील असे दुर्मिळ उत्कट प्रसंग कायमच मनाला उभारी देतात. आणि तुमच्याकडे असे खूप छान प्रसंग अनुभव आणि गोष्टी आहेत त्या ब्लॉग मधून आमच्यापर्यंत पोहचवतात त्याचा मनस्वी आनंद वाटतो. लिहीत जा. धन्यवाद 🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री विजयजी सस्नेह नमस्कार. आपण साहित्य ,संगीत जाणणारे गुण ग्राहक रसिक आणि श्रोते आहात. आपणही लेखन पूर्वी करत होता .आता आपण लेखन पुन्हा सुरू करावे म्हणजे आम्हाला त्याचा आस्वाद घेता येईल.आपला आपुलकीचा अभिप्राय मनाला खूप आनंद देऊन गेला. आपण मधुकोशी मंडळी खरंच भाग्यवान आहोत कारण समान विचारी समान धर्मी असे अनेक जण आपण इथे एकत्र आलो आहोत आणि एकमेकांचा आनंद वाटून घेतो. अवघे धरू सुपंथ असच हे सर्व आहे. मनःपूर्वक धन्यवाद. 🙏
अनामित म्हणाले…
वा..खूप भाग्यवान... छान लिहिले आहेस ,
प्रत्यक्ष मैफिलीचा आनंद घेऊन त्यांची स्वाक्षरी....
महान गायक श्री प्रभाकर कारेकर यांचे स्मृतीस विनम्र अभिवादन...
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार आपण छान अभिप्राय दिलात... मनःपूर्वक धन्यवाद. आपले नाव प्लीज सांगाल का.
श्री पद्माकर बोंडाळे म्हणाले…
श्रीराम समर्थ
"क्षण स्वाक्षरी चा" हृदगत
छान लिहिले आहे. "स्वाक्षरीचा क्षण ,"खरंच संस्मरणीय आहे.
कै.पंडित प्रभाकरजी आमचेही आवडते गायक आहेत. त्यांची आजवरची गायन सेवा त्यांना कीर्तीरुपाने अमर करीत आहे.आपल्या हळुवार भावनांशी आम्ही सहमत आहोत.त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची लक्षणीय हानी झाली आहे.रसिकही
पोरके झाले आहेत.
आपण उचित शब्दांत भावांजली वाहिली आहे.
"गायीली तू भैरवी,मी
राग कैसा आळवू ?
मुक्त तू ,पण मी मनाला
आज कैसा सावरू?"
हेच भाव आमच्या हृदयी
आहेत.
श्री राम
श्री अविनाश आपटे मधुकोश म्हणाले…
गोव्यातून महाराष्ट्राला मिळालेला हा गानसूर्य. निमित्ताने लिहिलेले पं.प्रभाकरजी साक्षात समोर उभे केलेत.कोकणचो झील अनुनासिक बोलणार नाही तो काय? उत्तमगुरुंचा उत्तम चेला,
त्यांना तुम्ही काव्यातूनही व्यक्त केला.
त्यांची स्वाक्षरी जणु कार्डिओग्राम.तीही एक मर्मबंधातली ठेव.
क्षण स्वाक्षरीचा ,हे शीर्षक त्यामुळे शोभून दिसतं.
अभिनंदनीय लेख.⚘️
अनामित म्हणाले…
श्रीराम समर्थ
नमस्कार, नंदू.
प्रभाकर कारेकर यांच्या बद्दल असलेली श्रद्धा व उत्कट प्रेम तुझ्या लेखनातून प्रकट झाले आहे. अश्या उत्तुंग व्यक्तिमत्त्व असणार्‍या व्यक्तींची स्वाक्षरी घेण्याचा तुझा छंद वाखाण्यासारखा आहे. माझी सुद्धा या अजोड गायकांप्रती विनम्र श्रद्धांजली.
श्रीराम
श्री प्रकाश रसाळ आपुलकी परिवार म्हणाले…
नंदू,
पंडित प्रभाकर कारेकर यांच्या वरील ब्लॉग कालही वाचला होता आणि आता सकाळी पुन्हा वाचला. एकदम छान लिहिले आहेस.
या ब्लॉगमुळे १८ वर्षापूर्वीची आठवण जागी झाली.
पंडितजी, रामदास कामतजी आणि मंजुषा पाटील यांची दिवाळी पहाटे ची मैफिल खूपच छान रंगली होती.
संगीत क्षेत्रातील एवढे दिग्गज कलाकार किती साधेपणाने रहात होते. याचे मला खूपच आश्चर्य वाटले होते. हे कलाकार खरेच महान होते. त्यांच्या स्मृतींना माझी आदरांजली🙏🙏🙏🌹🌹🌹
तसेच या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल तुलाही मनापासून धन्यवाद🙏🌹
अनामित म्हणाले…
प्रिय बाळासाहेब आपला स्नेहार्द्र अभिप्राय मिळाला. खूप आनंद झाला. पाठीवर उबदार प्रेमळ हात ठेवून खूप उत्तेजन देत असतोस नेहमी .🙏🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
प्रकाश मित्रा आपण दोघेही या क्षणाचे भोक्ते आहोत. अभिप्राय वाचून माझा आनंद परीघ वाढला. तुझी प्रकृती कशी आहे.
अनिल पाठक म्हणाले…
भावना छान व्यक्त झाल्या आहेत. भावस्पर्शी लेखन, खूप छान

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण