पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण

 


श्री सरस्वती देवी प्रसन्न

पहाटेच्या या प्रहरी

म्हणा हरि हरि हरि

रात्र शेवटाला गेली

उखा आभाळी उदेली

फुलारली झाडे -वेली

जाग वारियासी आली

वेळ शीतळ साजिरी

पक्षी गाती नाना परी


गेला दिस नाही येत

काही करावे संचित

साधा आपुलाले हित

नाम वाचे उच्चारित

नाम घेता घरी दारी

उभा विठ्ठल कैवारी


सरे अंधाराचा पाश

झरे मोकळा प्रकाश

मुखे करा नामघोष

जाती जळूनिया दोष

तुका म्हणे जन्मा वरी

ठेवा तुळस- मंजिरी

गीत- ग दि माडगूळकर

संगीत आणि स्वर- स्नेहल भाटकर

चित्रपट तुका झालासे कळस

राग भूप आणि नट


महाराष्ट्रामध्ये उज्वल आणि महान संत परंपरा आहे - संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,संत एकनाथ समर्थ रामदास संत नामदेव बहिणाबाई आदि अनेक संत होऊन गेले. या संतांनी नरदेह दुर्मिळ असून या जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर ऐहिकात जगताना पारलौकिक कल्याण साधणे ही महत्त्वाचे आहे असे अभंग ओवी वांग्मय यातून नाना प्रकारे सांगितले आहे. प्रपंच जगत असतानाच परमार्थ करावयाचा आहे. कलियुगात संत सज्जन संगती, आणि नामस्मरण याचे अनन्य महत्व त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे. कोणतेही उपास तपास, कठीण योगसाधना यापेक्षाही कोणतेही उपाधी नसलेले परमेश्वराचे नाव सतत उच्चारित राहावे हे त्यांचे कळकळीचे सांगणे आहे. तुका झालासे कळस या चित्रपटातील "पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरि हरि हरि" यामध्येही नामस्मरणाचे महत्व आणि ते सतत घेण्याची आठवण दिली आहे.


दैनंदिन जीवन क्रम सुरू असताना नाम मुखी घेत राहावे आणि याकरता अगदी तरुण वयातच सुरुवात करावी हे सांगण्यासाठी पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी हरी असे म्हटले आहे. बाल्यावस्थेत खेळणे बागडणे सुरू असते परंतु जीवनाची पहाट ही तरुणपणी होत असते. . काहीतरी उत्कट उद्दात ध्येय घेऊन जीवनात जे काही कल्याण साधायचे आहे ते साधण्यासाठी नामस्मरणाची कास ही जितक्या लवकर धरता येईल ती धरावी. रात्र शेवटाला गेली उखा आभाळी उदेली , या कडव्यामध्ये पहाटेच्या वेळेचे वर्णन कवीने केले आहे. पहाटेचे वैभव अनुभवायचे असेल जाणून घ्यायचे असेल तर पहाटे उठायला हवे. उगाच फालतू कामात वेळ दवडू नये ( सध्या सोशल मीडिया आणि स्मार्टफोन यामुळे रात्री बारा पर्यंत अनेक जण जागे असतात आणि मग झोप नीट होत नाही आणि गडबडीत कसंतरी आटपून काहीतरी खाऊन कामावर जाणे असा जीवन क्रम सुरू होऊन शांतता स्थैर्य मिळत नाही अस्वस्थता वाढते आणि अनारोग्य निर्माण होते. त्यातून चिडचिड राग द्वेष भावना निर्माण होते आणि माणसाचे विचार वर्तन बिघडत जाते). गेलेली वेळ परत येत नाही, जीवनात सार काय आहे आणि असार काय आहे हे जाणून वेळेचा सदुपयोग करावा. विवेक आणि वैराग्य याचा तोल सांभाळायचा प्रयत्न सातत्याने करायला पाहिजे.


काही करावे संचित

साधा आपुलाले हित

नाम वाचे उच्चारित

नाम घेता घरी दारी

उभा विठ्ठल कैवारी


आपल्याकडे अध्यात्मात कर्मविपाक सिद्धांत सांगितला आहे. आपण जसे कर्म करतो त्याप्रमाणे फळ मिळते. आपल्या वाट्याला जे जीवन येते ते प्रारब्धानुसार, आपण आज जे कर्म करतो ते क्रियामण असते. त्याचे संचिता मध्ये रूपांतर होते. आणि हे संचित पुढे प्रारब्ध बनते. सत्कर्म यातून चांगले क्रियामाण आणि पर्यायाने उत्तम संचित साठा होतो आणि तसेच उत्तम प्रारब्ध तयार होते. गीतकार या ठिकाणी सामान्य माणसास आपले संचित चांगले निर्माण होण्यासाठी जीवनास योग्य शिस्त नियमितता लावण्याची गरज प्रतिपादित असून त्याकरता दैनंदिन उपासना नामस्मरण करावयास सांगत आहे .सर्व कुटुंबांमध्ये आणि समाजामध्ये ही हे संस्कार रुजले पाहिजेत. 'जे जे आपणासी ठावे, ते इतरांस सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन ' ज्यामुळे वैयक्तिक हिता बरोबरच सामाजिक हित आणि ऐक्य साधले जाते. सद्विचार ,सद्वर्तन, सत्संगती आणि नामस्मरण उपासना यातून जीवनातील अमंगलता जाते म्हणजेच अंधाराचा पाश पुन्हा पुन्हा जन्म घेणे , मनुष्य यातना भोगणे हे टळू शकते. नामस्मरणाने प्रारब्ध भोग भोगण्यास शक्ती मिळते. सारे दोष हळूहळू कमी होतात जळून जातात. लौकिकातले जीवन हा सारा भास असून ती मूळ मायेची किमया आहे. म्हणून पुन्हा पुन्हा जन्म टाळण्यासाठी नामस्मरण करत जावे जेणेकरून देहावर, देहबुद्धी वर तुळस मंजिरी ठेवली जाईल आणि पाप-पुण्याच्या फेऱ्यातून कायमची सुटका होईल असे गीतकार सांगत आहे.

समर्थ रामदास यांनी दासबोधामध्ये काळरूपनिरुपण समास दशक बारावा समास आठवा यामध्ये काळाची सत्ता ही खूप असून त्याचे विविध टप्पे सांगितले आहेत आणि जाणत्या कडून मार्गदर्शन घेऊन काळाची पावले ओळखून विवेकाने सर्व गोष्टी कराव्यात, हित साधावे असे सांगितले आहे.


अशी ही पहाटेची वेळ सर्वांना साधता यावी; सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडावा अशा प्रकारची शिकवण देणारे हे गीत आहे. आधुनिक वाल्मिकी ग दि माडगूळकर यांनी अनेक भक्ती गीते लिहिली असून त्यामागे त्यांचे संस्कार, ग्रंथ वाचन ,उपासना ही पूर्णपणे सार्थकी लागली आहे.संगीतकार आणि गायक स्नेहल भाटकर यांना भजन अत्यंत आवडीचे होते.त्यांना भजनी बुवा म्हणत असत ;कालांतराने ते संगीतकार झाले.म्हणूनच अशा व्यक्तींकडून गाण्याचा अर्थ भाव उत्कटता प्रगटते;आपल्या प्रत्ययास येते आणि मग ते गाणे मनावर ठसते. या गाण्यामध्ये पहाट समय जागवण्यासाठी एक पावा, एकतारी आणि तबला अशी मोजकी वाद्य यांचा वापर केला आहे. श्रीयुत स्नेहल भाटकर यांचा प्रासादिक स्वर खूप भावतो. श्रीयुत गदिमा आणि स्नेहलजी भाटकर यांचे विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांना आदरपूर्वक वंदन करतो. राम कृष्ण हरी.

राम कृष्ण हरि... राम कृष्ण हरि... राम कृष्ण हरि


https://www.aathavanitli-gani.com/Song/Pahatechya_Ya_Prahari


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
अरे वा खूपच छान रसग्रहण केले आहे
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्रीराम समर्थ. 🙏 आपले नाव कृपया सांगावे.
श्रीकृष्ण देशपांडे मधुकोष म्हणाले…
खूप छान रसग्रहण त्यात शिकवण पण आहे. ते वाचल्यावर असे वाटते अगदी पहाटेन नाही तरी सहा वाजता कमीत कमी उठायला हवे आणि रात्रीचा मोबाईल बंद करावा😃👌🙏
अनिल पानसे म्हणाले…
नंदूजी, सुंदर ! काव्यात अध्यात्माचं सार सुंदर मांडलंय आणि आपण ते अगदी सहज साध्या सोप्या, कुणालाही समजेल अशा भाषेत समोर ठेवलंय. 👍👍🌷🌷
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार अनिल जी आपण लगेचच रसग्रहण वाचून आपुलकीचा अभिप्राय कळवलात खूप आनंद झाला आपण अध्यात्माचे मोठे अभ्यासक आहात त्यामुळे आपला अभिप्राय हा आशीर्वाद आहे. राम कृष्ण हरी.
Jayant Kale म्हणाले…
नंदू, कर्मविपाक सिद्धांत आणि जन्ममरण चक्र यावर खूपच छान लिहिले आहेस. अतिशय सुंदर असे चिंतन आहे. मस्तच.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार जयंतातुझा अभिप्राय वाचून समाधान लाभलं कारण तु ग्रंथराज दासबोध याचा सखोल अभ्यासक आहेस. श्रीराम समर्थ सुप्रभात 🙏
In response to a comment by Jayant Kale
अनामित म्हणाले…
अरे वा !! खूपच छान रसग्रहण केले आहेस नंदू.....

रवी, अहिल्यानगर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण