चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें -रसग्रहण

 श्री सरस्वती देवी प्रसन्न





चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें 

तुझे नाम गोड किती घेऊं आम्ही वाचे  

 

अम्हां काय त्याचें चंद्र-सूर्य प्रकाशतां 

होई काया शुद्ध-स्वच्छ तुझे नाम घेतां  

 

कटेवरी घेऊनी कर उभा तोची राहे 

दास ह्मणे जातां शरण हरि वाट पाहे  


गीतरचना- विश्वनाथ जोगळेकर

संगीत- अनिल मोहिले

गायक - शरद जांभेकर


भक्ती संगीत यातून परमेश्वराला एक प्रकारची आळवणी असते; परमेश्वराचे गुणगान असते. आपण करतो ती श्रवण भक्ती असते. गाण्याचे अथवा कवितेचे रचनाकार कवी गीतकार आणि संगीतकार यांची ती किर्तन भक्ती असते. पहाटेच्या वेळेला सारे वातावरण शांत असतं. माणसाला झोप झाल्याने तनमनात उत्साह असतो.मन प्रसन्न असतं; अशा वेळेला भक्ती संगीत आपल्याला ईश्वर शक्तीशी जोडलं जाण्याची संधी देत असते. महाराष्ट्राला संतांची तसेच थोर कवी आणि गीतकार यांची परंपरा आहे.


'श्रवणं किर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।' हा भागवतातील श्लोक उद्‌धृत करून, समर्थांनी नवविधा भक्तीचे विवेचन केले आहे. सगुणातूनच निर्गुणाकडे जायचे आहे. अगदी लहानपणापासून अनेक वर्षे पहाटवेळेला रेडिओवरून भक्ती संगीत आपण ऐकत आहोत. अशाच पहाटेच्या वेळेला लागणारे चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें ,तुझे नाम गोड किती, घेऊं आम्ही वाचे...  हे गीत अनेक वर्षे माझ्या मनात ठसलेलं आहे. त्याचे रसग्रहण करण्याचा हा प्रयत्न आहे.


गीताच्या सुरुवातीचा सतारीचा झंकार आणि तबला वादन आपले सारं लक्ष वेधून घेते. आपल्याला त्वरित एकतानता येते.गीत ऐकताना तन आणि मन हे हे द्वैत संपते... किंबहुना गाणारा, गीत रचयिता, संगीतकार सारे जण एकाच पातळीवर येतात. व्यष्टी आणि समष्टी हा भेद संपतो; आणि गीत आपणास परमेष्टी कडे नेते. हा एक प्रकारचा मोक्ष आहे- बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध या भक्ती मार्गातील भक्त होण्यासाठीच्या म्हणजेच अंतिम ध्येय मोक्ष मिळण्यासाठीच्या अवस्था आहेत. सामान्यपणे भक्त हा शब्द भगवंताची उपासना ,आराधना करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो. अध्यात्म शास्त्रामध्ये वास्तविक भक्त आणि भगवंत वेगळा नसतो. बद्ध म्हणजे लौकिक जीवनात सतत रमणारा. तर मुमुक्षु म्हणजे ज्या माणसास आपल्यात अंतर्बाह्य काही बदल घडवावा असे वाटते; षड्रिपूच्या आहारी जाऊन जे वर्तन घडत आहे त्याबद्दल पश्चाताप होत आहे म्हणजेच अनुताप होत आहे असा माणूस . सद्गुरूंच्या कृपेने मुमुक्षू हा भक्त या पातळीवर पोहचू शकतो .या गीताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास गीतकार हा साधक पातळीवर असून हे गीत रचत असताना परमोच्च आनंद घेत आहे. भले क्षणिक का असेना,   त्याला आत्मीक आनंद मिळालेला आहे आणि तो एक प्रकारचा मोक्ष आहे .तो आनंद काय आहे ते या गीतातून सांगितलेले आहे.हे सर्व त्याला नामस्मरणाने प्राप्त झाले आहे.


अम्हां काय त्याचें चंद्र-सूर्य प्रकाशतां 

होई काया शुद्ध-स्वच्छ तुझे नाम घेतां  


 नामस्मरण आनंदापुढे त्यास चंदनाचा परीमळ, चंद्राची शीतलता, सूर्याची संजीवकता,सूर्याची प्रखरता ही फिकी वाटत आहे. त्यात त्याला स्वारस्य नाही .  नामाने त्याची अंतर्बाह्य शुद्धी झाली आहे . अहंता , वृथा अभिमान, मीपणा गळून पडला आहे. जसे सूर्य आणि चंद्र प्रकाश ही सृष्टीचे जीवत्व याचे साक्षित्व  आहे तसेच चंदन वृक्ष याचा सुगंधही कधी जात नाही. पण हा सर्व भ्रम आहे. हे जड, चंचळ आहे.परब्रम्ह हे निश्चळ आहे हे कवी अनुभवत आहे.


'नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची 'असे तुकोबांनी म्हटले आहे. ज्ञानोबांनी हरिपाठात नामस्मरणाचे सारे महत्त्व विशद केले आहे. सद्गुरु ब्रह्मचैतन्य श्रीयुत गोंदवलेकर महाराज यांनी कलियुगातील नामाचे महत्त्व त्यांच्या दैनंदिन प्रवचनातून सोप्या भाषेत सांगितले आहे. नामास कोणतीही उपाधी नाही. कोणत्याही अवस्थेत कोणत्याही काळात, कुठेही ते नाम घ्यावे आणि नरदेहाचे कल्याण करून घ्यावे असे अत्यंत कळकळीने ते सांगतात. असे सद्गुरु या गीतकारास भेटलेले असून त्यामुळे त्याचा उत्कर्ष झाला आहे. नाम घेतल्याने काय घडले आहे तो विविध प्रकारे सांगत आहे.जळी स्थळी काष्ठी पाषाणी  सर्वत्र हरीच भरून राहिला आहे अशी प्रचिती, असे आत्मभान त्याला आले  आहे. त्यामुळे त्याला लौकिकातील कुठल्याही गोष्टीचे अप्रूप राहिलेले नाही. शेवटच्या कडव्यांमध्ये कवी/ गीतकार आपणास नामस्मरण करून देह अन् चित्त शुद्ध झालेल्या, कर्ता अन् करविता एकमेव परमेश्वर याची पूर्ण जाणीव झालेल्या शरणागत भक्ताची कटेवर हात ठेवून वाट पाहत आहे हे सांगत आहे. कटेवर हात ठेवणे याचा असाही एक अर्थ आहे कि सामान्य जनास  विठू राया सांगत आहे की भवसागरात आपणास बुडलेले आहोत असे तुम्हांस वाटते आहे; परंतु भक्तिमार्ग अनुसरण केल्यास मी तुम्हाला या भवसागरात बुडू देणार नाही. मी तुमची वाट पाहत आहे. 

सत्संग केल्याने माणसाचे मन आणि चित्त शुद्ध होत जाते आणि मुमुक्षू अवस्थेतून भक्त होईपर्यंत सद्गुरु त्याच्या बरोबर असतो. सद्गुरु परमेश्वराची गाठ घडवून आणतो आणि अंतिमतः त्याला तो चारी मुक्ती मिळवून देतो. या गीत रचनेत अशाप्रकारे मुमुक्षू ते भक्त अशी वाटचाल सांगितली असून प्रपंच करतानाच परमार्थ करण्यासाठी नित्य नामस्मरण याचे महत्त्व विशद केले आहे.


पंडित शरद जांभेकर मुंबई आकाशवाणी केंद्रात दीर्घकाळ निर्माते म्हणून कार्यरत होते. शास्त्रीय सुगम आणि नाट्य संगीत या सर्व प्रकारात त्यांची विशेष पकड होती. संगीताचार्य काणेबुवाकडून त्यांनी तालीम घेतली होती. डोळस पद्धतीने गाणे ऐकायला आणि गायला त्यांनी शिकवले होते. तसेच संगीतातील महान व्यक्ती नारायणराव व्यास, द वि पलुस्कर यांच्याकडूनही मार्गदर्शन घेत जांभेकरांनी गायकी कमावली होती. या गीताचे संगीतकार श्री अनिल मोहिले यांनी अनेक संगीतकारांकडे संगीत संयोजक म्हणून काम केलेलं होते. त्यामुळे त्यांना विविध गीत प्रकार आणि संगीत यातील आगळे ज्ञान (कम्बाईनड विस्डम) प्राप्त झाले होते. म्हणूनच या गीताच्या चालीत अत्यंत प्रासादिकता, गोडवा असे भाव चिरंजीवित्व घेऊन आले आहेत. गीतकाराने केलेली सुंदर रचना जणू संतांची अभंग रचना आहे असे वाटते.यमक  आणि विरोधाभास हे अलंकार यात योजिले आहेत. संगीतकाराने अशा रचनेस सुयोग्य चाल आणि अतिशय कमी वाद्य वापरून संगीत दिले असून श्रीयुत शरद जांभेकर यांनी आपल्या खड्या आवाजाने या गीतास संपूर्ण न्याय दिला आहे. म्हणूनच हे गाणे ऐकताना सारेच जण तल्लीन होतात, ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते हेच याचे अंतिम फलित आहे.

गीतरचनाकार- विश्वनाथ जोगळेकर,संगीतकार अनिल मोहिले आणि गायक - शरद जांभेकर विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांना अभिवादन करतो. गीताचे बोल आणि संगीतकार गायक ही माहिती आठवणीतल्या गाणी या संकेतस्थळावरून घेतली आहे. त्यांच्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करतो.






टिप्पण्या

पद्माकर बोंडाळे म्हणाले…
आपलं रसग्रहण पूर्ण वाचलं.आनंद झाला.अध्यात्मिकतेकडे सहज घेऊन
जाणारं हे काव्य आहे.गेयता आणि आशय याची समृध्दी यांत आहे हे आपण चांगल्या पद्धतीने मांडले आहे.आपला पिंड भक्ती रसपूर्ण
आहे.सहज प्रेमभाव आपल्या उक्तीतून,
लिखाणातून,प्रकट होत आहे.आपण
साधक आहात.त्यावृत्तीभावाचे दर्शन
आपल्या शब्दांतून स्पष्टपणे जाणवते.
प्रेमभावाने ,नामरस सर्व देहांतून
वहातो त्यावेळी भक्त आणि भगवंत
"दो तन एक मन " असतात.
छान.अशीच लेखन सेवा घडून
भक्ती प्राप्त होवो ही श्रीरामरायांच्याचरणी प्रार्थना.
धन्यवाद
कल्याणमस्तु
श्रीराम


Thanks and Regards

Padmakar Bondale
अनामित म्हणाले…
जे भंगत नाही ते अभंग...न भंगणारी म्हणजेच भक्ती.....उत्कट प्रेमातून उमलते ती भक्ती...तीच आसमंतात सामावली तर शब्दरूप घेते. शब्दांत दैवी निरवते कडे...छान लिहितोस

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण