क्षण स्वाक्षरीचा....व्यंगचित्रकार श्री मंगेश तेंडूलकर
श्रीयुत मंगेश तेंडुलकर प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते.वैद्यकीय उपचारांसाठी तसेच रुग्णालयांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे बनविणे हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. ते वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या विषयावर व्यंगचित्रे सादर करीत असत. सामान्य माणसांच्या दैनंदिन अडचणींसाठी ते प्रसंगी रस्त्यावर आंदोलन करीत असत . साल २००१ सातारा येथे युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरीत असताना तेथील स्थानिक वृत्तपत्र दैनिक ऐक्य यामध्ये त्यांची व्यंगचित्रे येत असत. व्यंगचित्रे खूपच आनंद देत असत .छोटासा प्रसंग पण त्यातील विसंगती शोधून ते व्यंगचित्र काढत असत आणि छोटासा मजकूर ही लिहिलेला असे. सातारा हे महाबळेश्वर पासून जवळ असून इथे थंडी भरपूर असते. एका थंडीमध्ये सातारा पुणे या मार्गावर शिरवळ येथे लाल परी म्हणजेच सर्वसामान्यांची एसटी पहाटेच्या वेळी चहासाठी थांबली होती. दोन माणसांमधील संवाद व्यंगचित्रांमध्ये तेंडुलकरांनी लिहिला होता आणि यथायोग्य चित्र काढले होते.... एक प्रवासी दुसऱ्या प्रवासास विचारत आहे, शिरवळ थांबा आला आहे तर उतरा चहा पिऊया.... तर त्याचा मित्र त्याला म्हणतोय 'आरं ....एवढी थंडी हाय निसतं नाव काढलं तरी घाम फुटतिया कशाला खाली उतरू...'
तर अशी वेळोवेळी त्यांची चित्रे पाहून त्यांना भेटायची इच्छा मनात होती. एके दिवशी आमच्या बँकेत ते मुख्य कार्यालय असल्याने काही कामानिमित्त आले होते. त्यांनी आमच्या प्लॅनिंग आणि मार्केटिंग या डिपार्टमेंटलाही भेट दिली. त्यावेळी त्यांच्याशी वार्तालाप केला आणि स्वाक्षरी देण्याची विनंती केली. मी डायरी पुढे केली आणि क्षणार्धात त्यांनी खालील चित्र काढले.
चित्रमय स्वाक्षरी मंगेश तेंडूलकर यांची असंच त्याच संक्षिप्त वर्णन होईल .
कोणताही कलाकार मग तो गायक असो चित्रकार असो संगीतकार असो किंवा नावाजलेला राजकारणीही असो त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे समाजामध्ये सहज फिरता येत नाही का तर त्यांच्या पाठीवर नावाचे ओझे असते हेच हे चित्र सांगत आहे. अटल बिहारी बाजपेयी पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांना आपण सामान्यांप्रमाणे आता मोकळेपणाने कुठे फिरू शकत नाही.... अशी खंत आणि व्यथा एका कवितेतून व्यक्त केली होती . त्यातील दोन ओळी मला फार भावल्या.
मेरे प्रभु!
मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना
गैरों को गले न लगा सकूँ
इतनी रुखाई कभी मत देना।
प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर या भावना वरील चित्रात व्यक्त केल्या आहेत असेच मला वाटते. या ठिकाणी महाराष्ट्राच्या लाडक्या साहित्यिक कवियत्री गीतकार शान्ता शेळके यांची एक आठवण सांगावीशी वाटते. प्रसिद्ध लेखक आणि शिक्षक श्री. श्री म माटे यांना शांताबाई गुरुस्थानी मानत. त्यांनी शांताबाईंना सांगितले होते की "काही अनुभव हे बेचकेने उचलायचे असतात तर काही चिमटीने...." तर असा हा चिमटीने उचललेला माझा अनुभव मला खूप समृद्ध करून गेला.
स्वाक्षरी घेण्याने आपण त्या कलाकाराच्या जवळ जातो आणि दोन मिनिटं का होईना आपला आणि त्याचा संवाद किंवा हसणं बोलणं होतं आणि मग तो क्षण आपल्याला आगळी ऊर्जा देतो. ती भेट मर्मबंधातील ठेव होते.
टिप्पण्या
अर्धा पाऊण तास बोलण्याची संधीही मला
मिळाली होती.विषय होता अर्थातच विजय
तेंडुलकर.
खरंच, मान्यवर लोकांची प्रत्यक्ष भेट, त्यांच्याशी संवाद आणि त्यांची स्वाक्षरी मिळवणे - जपणे या गोष्टी म्हणजे मोठा ठेवाच आहे. नेहमीप्रमाणे लेख सुंदरच. यापूर्वीही तू श्री. पंडित प्रभाकर कारेकर, श्री. शंकर वैद्य यांच्या स्वाक्षऱ्या मिळविल्यास आणि ते प्रसंगही उत्तमरित्या मांडलेस. या शृंखलेतील पुढील व्यक्तीचा परिचय लवकरच घडून येवो.