कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू ....रसग्रहण

१९ एप्रिल १९३० श्रेष्ठ गायिका मालती पांडे यांची जयंती. मालतीताईंनी खेड्यामधले घर कौलारू, या कातरवेळी पाहिजेस तू जवळी, लपविलास तू हिरवा चाफा, त्या तिथे पलीकडे अशी एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत.



कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू हे एक मातेची ममता महती सांगणार गीत आहे. घरात तान्हं बाळ झोपलेलं असलं की की आपण पाय नका वाजवू असे म्हणतो परंतु या गीतामध्ये निसर्गातील इतर घटकांनाही असे आवाहन केले आहे. गीताचे शब्द मातेच्या हृदयागत कोमल हळुवार आहेत. मालतीताईंनी ते अतिशय लडिवाळपणे गायलं आहे. अंदाजे चार एक वर्षांपूर्वी मालती पांडे यांच्या स्मृतिदिनी पुणे आकाशवाणीवर "आमच्या संग्रहातून "या सदरात त्यांची मुलाखत ऐकली आणि या गाण्याने माझ्या मनात घर केलं.आज मालती ताईंच्या जयंतीच्या निमित्ताने ते रेडिओवर पुन्हा ऐकायला मिळाले.खूप दिवसापासून या गाण्याचे रसग्रहण करण्याचे योजले होते ते आज फलद्रूप होत आहे.


कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू

चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू


नकोस चंद्रा येऊ पुढती

थांब जरासा क्षितिजावरती

चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू


पुष्करिणीतून गडे हळुहळु

जललहरी तू नको झुळुझुळु


नकोस वाऱ्या, फुलवेलींना फुंकरीने डोलवू

नकोस मैने तोल सावरू


नकोस कपिले अशी हंबरू

यक्ष-पऱ्यांनो स्वप्नी नाचुन नीज नका चाळवू


जगावेगळा छंद ग याचा

पाळण्यातही खेळायाचा

राजी नसता अखेर थकुनी पंख मिटे पाखरू


लहान बाळाची आई, आजी किती काळजी घेते , किती जिव्हाळा त्या बाळाविषयी असतो याची परिसीमा या गाण्यात कवी श्रीनिवास खारकर यांनी हळुवार शब्दात वर्णिली आहे. मातृ हृदयातील कोमल भाव कवीने व्यक्त केले आहेत ते भाव एका आईचे नसून आजीचे आहेत असेच वाटते कारण नातवंड म्हणजे दुधावरची साय. कदाचित खूप वर्षाने घरात पाळणा हलला आहे .... तान्हुल्या सानुल्या अशा या गोड गोजिऱ्या गोंडस बाळाला नुकतीच झोप लागली आहे: कुणी आवाज करून त्याला उठवू नका त्याला जाग येईल असं ती सांगत आहे... आळवत आहे; कळकळीने सांगत आहे. आणि हे सांगणं सुद्धा घरात येणाऱ्या सर्वांना आणि निसर्गातील बाळाच्या सवंगड्यांना.... .


इथे गाण्यातील शेवटचं कडवे असे आहे....

जगावेगळा छंद ग याचा

पाळण्यातही

राजी नसता अखेर थकुनी पंख मिटे पाखरू


म्हणजे इतका वेळ हे तान्हुलं पाळण्यातला पाळण्यात आपले आपणच खेळत होते....आनंद घेत होते .... त्याला खरं झोपायचं नव्हतं त्याच्या पायातील वाळा छान वाजत होता ,पुष्करणीतील पाणी झुळझुळ वाहत होतं, वारा मंद वाहत होता आणि त्या नादात ते मग्न होत, खुष होतं. आणि राजी नसताना त्याला दमल्याने झोप लागलेली आहे.... तेव्हा त्याला आता कुठलाही छोटासा जरी आवाज आला तरी जाग येईल असं ती माय सांगत आहे. .....हा माझा चिमणा नुकताच झोपला आहे.... संध्याकाळ जवळजवळ संपली आहे आणि रात्र सुरू होत आहे.ती चंद्राला सांगते आहे ही तू क्षितिजावरती आत्ताच उगवू नकोस रे.... तू जरी शितल असलास तरी माझ्या बाळावर तुझं चांदणं पडलं तरी त्याला जाग येईल... पुष्करणीतील जळाला ती सांगते आहे की तुझं झुळझुळ वाहणें जरी कितीही मंजुळ असलं तरी तुझं तुझी झुळझुळ कमी कर झुळझुळ नकोस , वाऱ्याला ही ती सांगते आहे तू वाहू नकोस रे ती तुझी एखादी फुंकर सुद्धा फुलवेलींना हलवेल आणि मग आवाज येईल आणि त्या आवाजाने माझं बाळ जागं होईल....पुढे ती मैनेस सांगते आहे तू ज्या झाडावर आता बसली आहेस ना ..तिथे शांत रहा कदाचित फांदी हालेल तरी तू तोल सावरू नकोस तोल सावरतानाही आवाज होईल.... घरातच कपिला गाय आहे तिलाही ती सांगत आहे ... तू सारखं हंबरू नकोस... कारण माझं बाळ जागं होईल..... पुढे ती माऊली सांगत आहे की ते बाळ इतकं गोंडस आहे की स्वर्गातल्या यक्ष पऱ्या तुम्ही जरी त्याच्या स्वप्नात आलात ना ....तरी आनंदाने तुम्ही नाचू नका बरं का... कारण ते नाचणं माझ्या बाळाला जागं करेल त्याची झोप चाळवेल असं काही काही करू नका.


आता थोडं गाण्यातील शब्दलाघव बघू या....


वाजवू, नादवू, डोलवू , हंबरू ,चाळवू असे नादमय शब्द...चमचमणारे ते चंदेरी चाळ असा अनुप्रास आणि सहज सुंदर यमक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशयोक्ती अलंकार - (चांदणं हे शीतल असतं, पुष्करणीतून वाहणारा जलप्रवाह झुळझुळ झुळझुळ , वाऱ्याची झुळूक, फुलवेलींचं डोळण, हे सार खरं तर आनंददायी असते हळुवार असते पण त्याचाही इथे त्रास होईल असं गीतातील आईला वाटत आहे.) या गीत रचनेमध्ये योजलेले आहेत. कवीचे हृदय मातृ हृदय झाले आहे. कवी कल्पना किती उदात्त आणि रम्य असू शकते याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. बाळाची आई, बाळाच्या आईची आई म्हणजे आजी, तीच जणू हे गीत गात आहे असा भास होत राहतो. जसजशी आई मोठी होत जाते तसं तसं तिचं प्रेम मातृत्व अधिक स्निग्ध अधिक गहीरं होत जातं. अशा सुंदरगीत बांधणीला भावगीतविश्वात आगळं स्थान असलेले श्री गजाननराव वाटवे यांनी संगीत दिलं आहे आणि आदरणीय मालती पांडे यांनी ते तितक्याच ओतप्रत मातृ भावनेने गायलं आहे. गाणं ऐकताना सारं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. यापेक्षा आणखीन काय हवं असतं श्रोत्यांना रसिकांना. आदरणीय मालतीताई, गीतकार श्रीनिवास खारकर आणि गजाननराव वाटवे यांना अभिवादन करून हा लेख पूर्ण करतो.🙏🙏🙏


https://www.aathavanitli-gani.com/Song/Kunihi_Paay_Naka_Vajavu


टिप्पण्या

Shrikant Lele म्हणाले…
भावपूर्ण व तरल गीत! रसग्रहणही उत्तम!
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
दादा तू लगेचच आस्वाद घेतला, खूप आनंद वाटला.
सौ मंजिरी श्रीकृष्ण देशपांडे म्हणाले…
खूपच सुंदर गाणं आणि तुम्ही केलेलं रसग्रहण सुद्धा आणि खरं आहे इतक्याच हळुवारपणे आम्ही जपतो त्या लहान बाळांना खूप सुंदर आणि आनंददायी असतं लहानपण बाळांचं👌👌😊🙏
बाबासाहेब नवसुपे मधुकोश म्हणाले…
लेले साहेब तुम्ही एका मातेच्या किंवा आजीच्या हृदयातील बाळा प्रती असलेला कळवळा उत्तम प्रकारे दर्शविला आहे. बाळाची झोपमोड होऊ नये म्हणून माता विविध प्रकार चे प्रयत्न करत आहे.तुम्ही मातेच्या मनातील भावना खूप छान प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक माता होऊन त्या मातेच्या मनातील भीती की कुठल्याही प्रकारे बाळ झोपेतून उठू नये म्हणून माता चंद्र, पुष्करिणी, वारा, कपिला गाय, यक्ष आणि पऱ्या यांना विनवणी करते की तुम्ही कुठल्याही प्रकारचे आवाज करू नका नाही तर बाळाला जाग येईल कारण बाळाला झोपेचे खूप गरज आहे. बाळ खेळता खेळता झोपले पाहिजे असे त्या मातेला वाटते.
कवी श्री श्रीनिवास खारकर यांनी एक माता होऊन, एका मातेच्या हृदयातील बाळाप्रती असलेला कळवळा कवितेच्या रूपातून मांडण्याचा खूप छान प्रयत्न केला आहे.
S G Deshpande म्हणाले…
किती तरल मुलायम भावना लेखकाने शब्दातून आणि या गीतातून व्यक्त केली आहे.
तुम्ही रसग्रहण करताना गीतकाराच्याच हृदयाला आणि भावनेला हात घातला आहे. बाळ झोपे आधी आणि झोपेत असताना त्याचं भाव विश्व त्याच्या मनातले विचार हेच असावे जसे की चंद्र,पुष्करणी झुळझुळ वारा,कपिला गाय, आणि तेच भाव विश्व रसग्रहण करताना तुम्ही उलगडवून दाखवले आहे. तसेच समस्त आई आजी मंडळींना रसग्रहण समर्पित केले आहे. खूपच छान👌🙏
अनामित म्हणाले…
वा खूप छान रस ग्रहण
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
वा नंदू, जितके सुंदर गाणे, तितकेच सुंदर रसग्रहण!लेखातील शब्द ही अतिशय सुलभ,सहज! जितके गाणे हळूवार आहे, तसेच रसग्रहण ही रसिक वाचकांना हलकेच मनाला भावून जाते!!
वा!सुंदर!! श्री वाडीकर माऊली तळजाई कट्टा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण