मातृदिन- मातृवंदना






मातृदिन- मातृवंदना

जननी जन्मभूमुश्च स्वर्गादपि गरीयसी ।

जननी व जन्मभूमि स्वर्गाहुन श्रेष्ठ आहे. अशा मातृत्व शक्तीस वंदन करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज मदर्स डे साजारा केला जातो. मदर्स डे जास्त करून मे च्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो.
आई हा एक महान शब्द आहे ज्यात सारं काही जग सामावलेलं आहे. आई शब्द उच्चारणं हे
अगदी सहजच घडतं. आई शब्द उच्चारताना आपले दोन ठ ही मिटावे लागत नाहीत. आई हा शब्द उच्चारताच तो हुंकार अथवा तीची आठवण येताच आईच्या हृदयाला तो लगेचच जाऊन भिडतो. प्रकाश वेगापेक्षाही अतिजलद असा हा वेग नसून आवेग आहे. आईच्या प्रेमाची शक्ति अगाध असून त्याचे प्रत्यंतर हे लगेचच येते . ज्याप्रमाणे झाडावर फुल फुलताना कोणी पाहू शकते का? त्याची एक वेगळी गती असते तद्वतच आईचे प्रेम ही नित्य फुलतच असते . आईचे वात्सल्य कधीही कोमेजत अथवा आटत नाही. म्हणूनच आपल्या संस्कृतीत
मातेस सर्वाधिक महत्त्व आहे .पृथ्वी वर आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपला सांभाळ करत असते म्हणूनच सकाळी उठल्यावर ज्या भूमीवर आपण पाऊल ठेवतो तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा श्लोक समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले । विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥ म्हंटला जातो . मातेची महती सांगणारी मंगलमूर्ती गणेशाची गोष्ट तर आपणा सर्वास माहीत आहेच. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ' असंही म्हटलं आहे. जगात सर्वच प्राणीमात्रांना वनस्पतींना स्थिती उत्पत्ती आणि लय या अवस्थांमधूनजावे लागते. मनुष्यजन्म व इतर प्राणिमात्र यातील आईपण आपणास सहज दृष्टीस पडते परंतु वनस्पती जीवनातील आईपण हे वेलीला उमलेल्या फुलावरून आपणास समजून घ्यावे लागते. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर आई होण्यापर्यंतचा प्रवास हा अत्यंत खडतर तरीही आत्मानंद देणार असतो. आणि म्हणूनच आईपण होण्याची आस प्रत्येक स्त्रीस असते. बहुतांशी स्त्री वर्गास हा सन्मान मिळतो परंतु ज्यांना तो मिळत नाही त्यांनाही आता वैद्यकीय शास्त्रातील प्रगत तंत्रज्ञानाने तो मिळवून देणे आता शक्य झाले आहे. तान्हुल्यासाठी पान्हा फुटल्यावर मिळणारा आनंद हा जीवाशिवाची गाठ पडण्याचा आनंद असतो. वर्तमानपत्रात अथवा टीव्हीवर काही वेळा आपणास मातृप्रेमाचा वात्सल्यचा दाखला देणारी बातमी वाचावयास अथवा पाहायला मिळते. वाघाच्या नवजात बछड्यांना ,मांजरीच्या कोवळ्या पिलांना जन्म होताच काही कारणाने मातृ वियोग होतो अशावेळी अन्य प्राणी त्यांना दूध पाजून जीवदान देतात. आईची महती सांगणाऱ्या अनेक कविता गाणी आपणास माहित आहेत . वानगीदाखल..' प्रेमस्वरूप आई प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई! बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी? ' कवी माधव ज्युलियन , 'आई एक नाव असतं ,घरातल्या घरात गजबजलेल गाव असत' कवी फ मु शिंदे. परंतु नारायण सुर्वे सारख्या एका कविचा जन्म हा एका वेगळ्याच वातावरणात झाला जन्मताच कुणीतरी त्यांना रस्त्यावर सोडून दिल होतं परंतु मुंबईसारख्या गिरणगावातील मातृपितृ हृदयाला या घटनेने त्वरित साद घातली व त्या अनाथ बालकास त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे माया दिली धन्य ती माता आणि धन्य ते बालक. नारायण सुर्वे यांना मोठं करण्यात असा अमोल वाटा ज्या मातेने दिला थोर ती माता , जिजामाता शिवबाची जिजाऊ हिची महती तर काय वर्णावी.. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मातृभूमीवर असलेली जाज्वल्य निष्ठा व प्रेम 'ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ' या महान काव्यातून उमटली आहे . गुरुमाऊली ही सुद्धा श्रेष्ठ माऊली आहे. लौकिकार्थाने ज्ञानोबा आणि त्यांची भावंडं ही पोरकी झाली परंतु निवृत्तीनाथ यांनी पित्यासम  सर्वांना छत्र दिले तर मुक्ताई ही आई झाली आणि" ताटी उघडा ज्ञानेश्वरा" हा अभंग आळवून ज्ञानोबाचा राग निववीला . बळीराजा आणि काळी माती हे अतूट नातं आहे म्हणून तो तिला काळी आई म्हणतो तर नदीस ही माता असे संबोधले जाते. अशी ही मातृप्रेमाची उब आणि डूब.. माझ्याबाबतीत बोलायचे झाले तर आज आई माझ्यासमवेत आहे मी खूप भाग्यवान आहे. अजून नदीचा काठ ओला आहे असेच म्हणेन.
मातृशक्तीस त्रिवार वंदन करून हा लेख पूर्ण करतो.












टिप्पण्या

अनामित म्हणाले…
सुंदर भावले
अशोक आफळेO म्हणाले…

लेलेसाहेब लेख छान जमलंय साधी
सोपी उदाहरणे देऊन आपण आईची
महती अधोरेखीत केली आहे सर तुम्हि
आधी बघ पाठविलेला लेख डाऊन लोड होत नाही
अशोक आफळे पामर


Shrikant Lele म्हणाले…
आईविषयी उत्कट प्रेम, वात्सल्य छान उदाहरणांसह व्यक्त केलं आहेस
अनामित म्हणाले…
संजय वळसंगकर
नंदू तुझ्या जवळ आई आहे आणि तिची तू निरंतर सेवा करीत आहेस या. सारखे भाग्य ते कोणते? आई वरचा तुझा हा लेख नाही तो एक अनुभव आहे जो सहज सुंदर तुझ्या लेखणीतून उतरत गेला आहे . मातृ देवो भव !
अनामित म्हणाले…
नंदू, आईविषयी प्रकट केलेल्या भावना व एकूणच लेख खूपच छान, आईची महतीच तशी आहे।मातृदिना निमित्त सर्व मातांना शतशः प्रणाम ,
S G Deshpande म्हणाले…
जन्मदात्या आई बरोबरच, आईची वेगवेगळी रूपे,खूप छान लेख केलेले साहेब.
विजय रणसिंग म्हणाले…
श्री लेले साहेब आईबद्दलच्या उत्कट भावना अगदी सुंदर पणे व्यक्त केल्या आहेत. खूप छान आणि मनस्वी लिहिलंय.आई मुलांचे/मुलीच नाते हे नेहमीच अव्यक्त पण अतिशय घट्ट असत.
त्यात काय नसत.. काळजी प्रेम वात्सल रागावणे
हुरहूर अभिमान सर्व भावनांचा अविष्कार आई मुलाच्या नात्यात दिसतो.
विजय रणसिंग म्हणाले…
श्री लेले साहेब आईबद्दलच्या उत्कट भावना अगदी सुंदर पणे व्यक्त केल्या आहेत. खूप छान आणि मनस्वी लिहिलंय.आई मुलांचे/मुलीच नाते हे नेहमीच अव्यक्त पण अतिशय घट्ट असत.
त्यात काय नसत.. काळजी प्रेम वात्सल रागावणे
हुरहूर अभिमान सर्व भावनांचा अविष्कार आईच्या नात्यात दिसतो.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार आपण लगेचच वाचून सविस्तर सविस्तर अभिप्राय दिलात आनंद वाटला कृपया आपले नाव कळवाल का ते इथे आले नाही.
जयंत कुलकर्णी म्हणाले…
लेले साहेब आईची महती विषद करणारा सुंदर लेख अनेक उदाहरणानी तो सजलेला आहे. आजही तुम्ही आईची सेवा करत आहात हे आम्ही पाहतो आहोत. माझ्याकडे आई राहते या पेक्षा मी आईकडे राहतो हे तुमचे सांगणे कौतुकास्पद आहे. लेख आवडला.
अनिल पानसे म्हणाले…
नंदूजी,सुंदर!फार जड अवघड शब्द न वापरता,सहज साध्या सोप्या शब्दांत मांडलेली आईची महती थेट अंतःकरणापर्यंत पोचतेय. असेच लिहीत रहा. 👍👍🌷🌷
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री अनिल पानसे साहेब आपण लगेचच लेख वाचून आपला सविस्तर अभिप्राय दिलात त्यामुळे खूप आनंद झाला. नव ऊर्जा मिळाली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी