झुळूक


काल व्हाट्सॲप वर फुलांवरील उत्तम ललित लेख वाचनात आला आणि आणि फुलांच्या आठवणींचा दरवळ
मनामध्ये साठवूनच झोपी गेलो. पहाटे अजून त्या झुडुपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते हे गाणं ओठांवर आलं . ही पाच कडव्याची कविता असून  या कवितेचे उठावदार वैशिष्ट्य म्हणजे  सदाफुली, शेवंती,चंपक आणि मोगरा या सर्व फुलांचा कविता कडवं गुंफताना उत्तम वापर केलेला आहे. आदरणीय वसंत बापट यांची सेतू या काव्यसंग्रहातील ही नितांत सुंदर कविता आहे. विफल प्रीतीची चित्रं या संग्रहात रंगवली आहेत. या संग्रहातील कवितांचा आस्वाद घेत असताना खालील कविता मनात उमलून आली. प्रेमात विरह झाला की माणसं विरहावरच प्रेम करतात हेच खरं.
झुळूक

काल तू ओझरती दिसलीस... मंडईत गं...
आणि आठवणींच्या झाडाला मोहोर आला गं...

कितीक वर्षांनी तुषार्त धरतीवर वळीव बरसला गं...
अन मृद्गंध आसमंती दरवळला गं...

मोगऱ्याचा घमघमाट म्हणलं अडवू तरी अडेल का गं...
कुंपणाच्या भिंतीवरून जाई जुईची फुलं बाहेर डोकावतात ना अगदी
तसं झालं गं .... ,

मिटलेल्या वहीतील पानं उगाचच फडफडू लागली गं...
तृणपात्यांवर दवबिंदू अवतरले गं.....

सहजच गच्चीत यावं , अन निरभ्र आकाशी पक्षांची माळ दिसावी असं झालं गं
बगळ्या बगळ्या कवडी दे असंच झालं गं......

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
वा, वा ! खूपच छान! ओघवत्या भाषेमध्यें आजी, आजोबा आणि नातवंडांचा संवाद लघुकथेच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे सादर केलाआहे. खरचं, एक मोरानं मूक घर बोलतं केले. प्रसंग साधाच पण मांडणी करण्याच्या कौशल्याने कथेला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे., खूपच सुंदर ! असच यापुढे वाचायला मिळो हीच अपेक्षा .

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी