आस...



श्री शारदा देवी प्रसन्न

माणसांला काही गोष्टी निसर्ग साध्य , जन्मतः  प्राप्त होतात आणि थोडे प्रयत्न करून यश लवकर मिळतं मात्र तिथंही अंगी नम्रता, लीनता असेल तरच स्थायी यश मिळत राहतं . तर काही गोष्टी उत्तम संगत , प्रबळ इच्छा शक्ती आणि अपार कष्ट यानं साध्य होतात. प्रयत्नांती परमेश्वर भेटतो,यश मिळतं. मात्र प्रयत्नांशिवाय सहज यश मिळणं हे फारच विरळ असतं आणि असं यश अस्थ्यायी असतं . म्हणून नुसती इच्छा असून चालत नाही , उद्दिष्ट प्राप्तीसाठी सतत प्रयत्न हे हवेतचं . हाच संदेश या कवितेतून प्रगट झाला आहे.

आस...
फुलण्या चांदणं , अवकाशी रात्र पाहिजे
येण्या पौर्णिमा, वाट पाहिली पाहिजे

बरसण्या पाऊस , घन ओथंबले पाहिजे
येण्या पूर, नदी दुथडली  पाहिजे

डवरण्या फांदी,  वाकली पाहिजे
येण्या फळ , झाड मोहरलं पाहिजे

येण्या रंग लाल चुटुक , मेंदी पत्थरावर घाटली पाहिजे
प्रकटण्या चित्र, हाती कुंचला पाहिजे

येण्या देवपण अंगी, पाषाणा घाव सोशीला पाहिजे
डुंबण्या भक्तिरसात, नाम घेतलं पाहिजे

पोहऱ्यात  येण्या, आडात असलं पाहिजे
भेटण्या विठू माऊली, आपण लेकरू झालं पाहिजे !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण