थोडंसं हलकं होऊया...हलकं फुलकं या सदरातील लेख क्रमांक १
नववर्षात
' हलकंफूलकं' या सदरातून आपल्याशी संवाद
साधणार आहे.
लेख - थोडंसं हलकं होऊया...
मार्च
महिना अखेर होता, मी मुंबईहून पुण्यास काही ऑफिस कामानिमित्त दुपारी निघालो होतो.
बस प्रवासं खंडाळा घाटातून सुरु होता. खिडकीतून निसर्ग न्याहळत होतो, सृष्टी दिव्य रूप धारण करत
होती.
मनात विचार आला अशा उष्ण हवेत शुष्क झाडांना हिरवी पालवी कशी येते ? हा काय चमत्कार आहे ?
विचार
चक्र सुरु झालं-वसंत ऋतूचे आगमन झाले की पानगळ होऊन झाडांना पालवी फुटते. पानगळ
म्हणजे काय तर ज्याची आवश्यकता नाही ते निसर्ग टाकून देतो व झाडे हलकी होतात
पुन्हा पालवी फुटते, ती ताजीतवानी
होतात. माझं कविमन जाग झालं- इथं हलक होणं म्हणजेच एक वेगळी आनंददायी अनुभूती घेणं
- वर्षा ऋतूत जेव्हा पाऊस बरसतो त्यावेळी आकाश हलकं होत असतं, खरंच किती काळ ते ढगांना
धरूनबसलेलं असतं ना,
शिल्पकार ज्यावेळी दगडातून मूर्ती घडवतो तो जडत्वाला हलकं करत
असतो ,
वडील ज्यावेळी लहानग्या मुलाला
खांद्यावर घेऊन, डोक्यावर
बसवून जग दाखवित
असतात त्यावेळी ते स्वतः हलके होत असतात, आपली अपत्ये यशस्वी विद्याअभ्यास करून उत्तम अर्थार्जन करू लागतात
त्यावेळी आई वडील कृतार्थ होतात, हायसे होतात. आपल्या लाडक्या मुलीचं लग्न ठरत आणि
आई वडील आपली जबाबदारी संपणार म्हणून हलक होण्याचा अनुभव घेऊ पहातात. प्रत्यक्ष मुलीला
सासरी धाडण्याचा क्षण येतो आणि आई वडील आणि
मुलीस गहिवरून येत. आसू आणि हासू अशी ही जड अंतकरणाने निरोप घेण्याची वेळ आणि
एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त होत हलक होणं असा हा सीमारेषेवरील क्षण, एखाद्या
भाजीवाल्याला त्याच्या भाजीची टोपलीला हात घेऊन उचलायला ज्यावेळी आपण मदत करता
तेव्हा पाटीचे ओझे तर कमी होतेच व आपणही हलके होत असतो, एखाद्या
अंध माणसास, वृद्ध
माणसासं, हात
पायास प्लास्टर असलेल्या माणसास रस्ता क्रॉस करुन द्यायला आपण
मदत करतो त्यावेळी तुमचा आयुष्यरूप रस्त्यावरील प्रवासही सुकर होत असतो. हॉस्पीटलमध्ये वृद्ध माणसं यांना व्हीलचेअर घेऊन चढण चढायला ज्यावेळी तुम्ही मदत करता, रिक्षात बसायला त्यांना सहाय्य करता त्यावेळी त्या माणसाच्या आणि आपल्या अंतरी एक आनंद होतो. जीवनात असे
प्रसंग हर घडी येत असतात. सजग,निर्मळ मानाने असे क्षण टिपणं, आपलेसं करून घेण हिच हलके
होण्याची साधना आहे,सहज योग आहे. जमेल तेव्हा श्रमदान,अन्नदान आणि आनंदवन सारख्या संस्थाना
देणगी देवून आपली पुंजी हलकी करून आनंदमयी होऊन जायचं.
आपण माणूस असल्याने जीवन
वाटेवर चालताना चुका होणारच, अपराध घडणारच परंतु त्यांची आठवण विसरून, मैत्री आणि
नात्यातील गैरसमज झाल्यास लगेच मरगळ झटकून हलक व्हायचं त्यांना Luggage नाही बनू द्याचं. अश्रूंना वाट करून हास्याच्या
कारंज्यात नहायचं.
लहान मूल सकाळी झोपेतून उठतं तेव्हा त्या गादीला खड्डा पडतो सार कालच विसरून मूल
हलक झालेलं असत तशी आपली नवीन दिवसाची सुरुवात व्हायला हवी. प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाण्याची
ही वाटचाल आहे हे मनास पटवून द्यायचे. सण साजरे करण्यामागील मूळ हेतू हाच आहे.
सन्मार्गाची आठवण आणि सत्प्रवृत्तीची वाढ होण्यासाठीच वेगवेगळ्या सणांची योजना
आहे. आपण दररोज शौच मुखमार्जन स्नान करतो म्हणजे शरीरातले जडता टाकून, हलके होतो ताजेतवाने होतो. पूजा करण्यास कधी कंटाळ केला अगर उशीर झाला की ती. आई सांगायची अरे तू रोज स्नान करतोस ना मग देवपूजेतील स्नानाने, अभिषेकाने
त्या मूर्ती ही हलक्या होतात. अभिषेक, गंधलेपन, पुष्पार्पण आणि आरती यातून मनातील जडत्व जाऊन मन
आणि चित्त शुद्धी घडते. मन एकाग्र होते. दिवसारंभ चांगला झाला की
सारा दिवस सावधपणे जगता येतो. काया वाचा आणि मन यांची शुद्धी ही सतत करावी लागते. जे
त्याज्य आहे ते टाकून द्यायचं आणि जे श्रेयस आहे त्याचा अंगीकार करावयाचा.
सायंकाले पठे नित्यं प्रातः काले विशेषतः तसं विष भयं नस्ती सर्वत्र विजयी भवेत.... अशाप्रकारे विविध स्तोत्राच्या शेवटी
फलश्रुती सांगितलेली असते.
आयुष्यातील काना,मात्रा, वेलांट्या अकार, ऊकार म्हणजेच आळस, अहंगंड
अहंकार मत्सर इत्यादी दुर्गुण होत. हे जडत्वाचे अलंकार दररोज प्रयत्नपूर्वक स्वतः मधून काढून ठेवायचा
प्रयत्न करायला हवा म्हणजे मग आपण हलके बनू आणि जीवन संगीताचा आनंद घेऊ शकू. हलकं होण्याच्या अशा
ह्या विविध रंगछटा मनात रंगविताना “‘चला लोणावळा आला गाडी १५ मिनिटे थांबेल" असा बस वाहकाने आवाज दिला; गाडी थांबली आणि माझं विचार चक्रही. चहा घेण्यास बस मधून उतरलो,पाय मोकळे झाले आणि हलकं वाटलं.
टिप्पण्या