दीपज्योती नमोस्तुते !

 //श्री सरस्वती प्रसन्न//


दीपज्योती नमोस्तुते !


आज दिव्याची अमावस्या आहे. घरोघरी दीपाचे पूजन केले जाते. ज्या दीपाने परमेश्वरास ओवाळले जाते त्याचीच आज पूजा. हाच आपल्या संस्कृतीचा महिमा आहे. प्रत्येक प्राणीमात्रातील व वस्तूतील प्राणशक्ती तत्व एकच आहे ;फक्त आविष्करण वेगळं. जे तत्त्व लहानशा पणतीच्या ज्योतीत आहे तेच तत्व विविध प्रकारच्या दिव्यांमध्ये प्रगट होतं. आधुनिक वाल्मिकी गदिमांनी त्यालाच ज्योतीने तेजाची आरती असं म्हणलं आहे. गंमत अशी की सगुणातील पूजा दृश्य स्वरूपातील आहे आणि मिळणारं समाधान मात्र अदृश्य तरी जाणवणारे आहे. गेले चार-पाच दिवस माझी ती.आई दीप पूजनाच्या तयारीत गुंग होती. तिच्यातील आर्तभाव माझ्यात परावर्तित झाला होता. पूजा उत्तम पणे पार पडली. तिला आणि मला खूप समाधान लाभलं ते तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं . यातूनच पूजा झाल्यावर खालील काव्य स्फुरले ते सादर करत आहे.


दीपज्योती नमोस्तुते !

  प्रार्थना               


 नित्य उजळू दे अंतरीचा दीप...

ओतूनीया तयात सत्कर्माचे धृत। 

बळ दे दीपज्योती

अडवण्या षड्ररिपुंचा वारा               

 राहण्या सावध चित्त       

 करण्या आनंदे विहित कर्म   

 जपण्या कृतज्ञताभाव  दयाभाव सर्वं प्राणिमात्रांप्रती     

मिळो सदा सर्वा शांती समाधान

जोडूनिया कर म्हणतो   

दीपज्योती नमोस्तुते!


नंदकिशोर लेले

टिप्पण्या

Kshama Paranjape Ganu म्हणाले…
श्री. नंदकिशोर लेले काका,
कवितेच्या सुरुवातीला लिहिलेली प्रस्तावना मनाला खूप भावली.....कवितेतील प्रत्येक शब्दात एक प्रामाणिकपणा आणि श्री. सरस्वतीच्या चरणी निस्सीम भक्ती आणि निरागस प्रार्थना आणि समर्पणाची भावना खूप सुंदर आणि निर्मळ शब्दांत व्यक्ती झाली आहे....

खूपच सुंदर....
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
थँक्स क्षमा.
Raja म्हणाले…
कविता वाचून बुद्धांच्या ' अत्त दीप भव ' या वचनाची आठवण झाली......अंतरीचा दीप ही संकल्पना जास्त भावली......ज्ञानोबा माऊली नी तरी दुसरे काय मागितले आहे.....? दुरितांचे तिमिर जाओ.....तोच धागा इथे जाणवतो आहे.......🙏🙏🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
तुझ्याकडून एक श्लोक मला कळाला म्हणजे पुन्हा ज्योतीने ज्योत लागल्यासारखे आहे. धन्यवाद
Manisha Mehendale म्हणाले…
🙏आपले जवळपास सगळे सण कोणाची ना कोणाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजन करून साजरे केले जातात....

दीपाविषयी कृतज्ञता त्याची पूजा करून...🙏

अज्ञानरूपी अंध:कार नाहिसा करून आत्मानुभवाची अनुभूती देण्यासाठी सदैव आपल्याला प्रकाशाकडे नेणारा तो दीप त्याच्याविषयी कृतज्ञता तुम्ही कवितेत छान व्यक्त केली आहे...

आणि तीही सर्वात श्रेष्ठ आणि पुज्य व्यक्तीच्या सोबत दीपपुजन केल्यानंतर...अत्यंत नम्रतेने

खूपच छान...🙏
अनामित म्हणाले…
काका.,खूप छान प्रार्थना केलीये.🙏🏻👏🏻👌🏻
सत्कर्माचे तूप, सर्वांप्रति कृतज्ञताभाव. हे छान लिहिल आहे. ✨🌹🤗

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण