वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी

 




 वारी वारी पंढरी....कसा असतो वारकरी


वार्ता आली कानी
तुकोबा ज्ञानोबा दिंडी प्रस्थानाची
आस लागली सर्वां विठुरायाच्या भेटीची 

वारी वारी पंढरी  
कसा असतो वारकरी

नामघोष चाले सदा वाचे उच्चारी
जय जय राम कृष्ण हरि
टिळा बुक्का भाळी 
तुळशी माळ  गळी
 फेटा मुंडासे टोपी डोईवरी 

 परंपरा जपत भगिनी धरी
 तुळशी वृंदावन शिरीं 
 पोरा बाळा सोपवून ताई माई अक्का घरी  शेजार दारी
 ती  होते अन्नपूर्णा वारकरी

  एकतारी टाळ मृदुंग पखवाज करि
   हरि गजर नाद उमटे अंबरी अंतरी
भागवत धर्म पताका खांद्यावरी
 उंचावती वारंवारी  
भेटता एकमेका माऊली माऊली म्हणूनी वाकुनी नमस्कार करी
 तो वारकरी

हाती काम मुखी नाम प्रपंच परमार्थ याची घालतो सांगड
षड्रिपू वरती 'वार 'करण्या भक्तीतूनी
 शक्ती मिळवितो तो 'वार'करी

 करून प्रतिसाल वारी
सदभावना, परोपकार ,सर्व प्राणीमात्रा प्रति प्रेम दया आदर भाव, सदैव समाधान भरून घेई ही शिदोरी 
 तो वारकरी

संतचरित्रा ऐकून वाचून जाणी नरजन्म दुर्मिळ
संसारसिंधू तरण्या नामी उपाय नामसाधना भारी 
संतोषती नयन होते जरी कळस  दर्शन
 पतितपावन म्हणे भेटीस येईन पुन्हा  
करण्या कृतार्थ हे जीवन 
मोक्षप्राप्तीसाठी 
एकेक जन्म पायरी पक्की करी
 तो वारकरी

विनितो नंदकिशोर विठुराया 
एकदा तरी सामील करून घे दिंडीत
 जरी मी नसलो वारकरी
घेई ओठी नाम संजीवन
जय जय राम कृष्ण हरी 
धन्य होऊदे श्रुती 
ऐकून नाम संकीर्तन 
मिळो वारकरी संगत अन अंगत पंगत 
जय जय राम कृष्ण हरी.

नंदकिशोर लेले

टिप्पण्या

Jayant Kale म्हणाले…
वारकरी म्हणजे काय, हे अत्यंत समर्पक शब्दात व्यक्त केले आहे. अतिशय छान. वारीचा आनंद लाभला.
राजा मोघे म्हणाले…
समर्पक शब्दात वारीचा आनंद. रामकृष्ण हरी
जयंत कुलकर्णी म्हणाले…
वारीचे सुंदर विवेचन आपण केले आहे. भक्तिमार्ग आणि प्रपंच यांची सांगड छान वर्णिली आहे. वारकरी परंपरेचे माहात्म्य आणि विठ्लाच्या भेटीची आस याहून आणखीन काय हवे! जय हरी विठ्ठल!! पांडुरंग!!
मदन करजगी म्हणाले…
सर, खूप छान कविता. वारकरी विठ्ठल मंदिराचा कळस दर्शनाने भारावून जातो हीच ती वारकऱ्यांची वारी. 🙏🙏
विजय रणसिंग म्हणाले…
वारी आणि वारकरी भक्तिमार्ग आणि आपले जीवन प्रपंच यांचे सुरेख नाते कसे असते असावे हे अतिशय तरल शब्दात नंदकिशोर लेले आपण व्यक्त केले आहे. खूपच छान. 👌🏻
विजय रणसिंग
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण अभिप्राय दिलात आनंद परीघ वाढला

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने