क्षण स्वाक्षरीचा -पंडित प्रभाकर कारेकर

क्षण स्वाक्षरीचा - गोवेकरी गानवैभव पंडित प्रभाकर कारेकर पंडित प्रभाकर कारेकर देवाघरी गेल्याची बातमी कळली आणि मन विषण्ण झालं . त्यांच्या सातारा येथील गायनाच्या मैफलीची आणि नवी मुंबई मध्ये नोकरीस असताना झालेली प्रत्यक्ष भेट, मैफिल या साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. त्यांच्या गायकीचा अनुभव सातारा येथे समर्थ सदनामध्ये अनेक वेळा अनुभवता आला. श्रीयुत अरुण गोडबोले हे बहु आयामी व्यक्तिमत्व त्यांना हक्काने पाचारण करत असे आणि सातारा भूषण या पुरस्कार निमित्ताने अथवा काही अन्य निमित्ताने समर्थ सदनात त्यांच्या मैफली होत असत. तसेच यासह अनेक उत्तम कार्यक्रम वक्ता दशसहस्रेषु शिवाजीराव भोसले , राम शेवाळकर यांची भाषणे ही समर्थ सदनात ऐकता आली हे आम्हांस लाभलेले थोर भाग्यच होय. गोव्याच्या मातीमध्ये अलौकिक सुगंध आहे. अनेक उत्तम साहित्यिक, संगीत नाट्य कलाकार मंडळी या भूमीमध्ये जन्मली आणि त्यांनी मराठी जना मनात साहित्य आणि गाण्याचे संस्कार रुजवले,मनाचे समृद्ध उन्नयन केले. प्रभाकर कारेकर हे याच सधन, सजल, सकस पावन भूमीचे गानरत्न.मलमली झब्बा आणि पायजमा, मागे घेतलेले क...