आठवणीतले आपटे काका

 आठवणीतले आपटे काका





सूर आणि शब्द संगीत आणि साहित्य याचा सुयोग्य मेळ साधणारे ,भूगोलाचे प्राध्यापक असलेले ,योग अभ्यासी आणि साऱ्या मधुकोशी मंडळींना त्यांच्या कलाकृती लेखन नाट्य अभिनय कलाविष्कार विविध माध्यमातून सादरीकरण यांना दिलखुलास दाद देणारे सदा प्रफुल्लित ,उत्साहीत असणारे आणि ठेवणारे काका देवाघरी गेली ही बातमी कानावर पडताच  चर्र झाले. काका हे अष्टावधानी होते.काका अधून मधून त्यांच्या गॅलरीतून चंद्र आणि सूर्य उदय अस्त, पावसाळ्यातील निसर्ग विभ्रम टिपत असत. पाठीमागच्या देशमुख यांच्या शेतातील चाललेल्या हालचाली ही ते टिपत असत. असे अतिशय प्रसन्न मनाचे आणि जीवन रसरसून जगणारे आपले आपटे काका आता हयात नाहीत.


 गेले दीड दोन महिने मधुरंजन या व्हाट्सअप कट्ट्यावर तसेच इतरत्रही काका दिसले नाहीत. काकांची तब्येत बरी नव्हती परंतु त्यांना भेटता येणे खूप अवघड होते. त्यामुळे मधुरंजन किंबहुना मधुकोष हा सुना झाला होता.  जे जात्याच मोठे असतात त्यांना सामान्यजन्य अधिक मोठे करतात कारण त्यांचे कर्तृत्व आणि दातृत्व हे तितकंच मोठं असतं. आपटे काका असेच होते. चार-पाच महिन्यापूर्वीच त्यांनी अभिवाचन याबाबत एक छोटीशी स्पर्धा घेतली होती. त्यांच्या अनेक आठवणी आहेत .उर दाटूनआलं आहे.

त्यांची पहिल्यांदा गाठ पडली ती साहित्यिक गप्पा या व्हाट्सअप कट्ट्याच्या सुरुवातीस *पाऊस* या विषयांवरील कवितांच्या कार्यक्रमात. त्यामध्ये त्यांनी संवादिनी आणून स्वतःच्या कविता अतिशय प्रभावीपणे सादर केल्या. कालांतराने मधुरंजन हा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला आणि मधुकोष मधील मंडळी कोरोना असल्याने त्यावर आपल्या विविध कलाकृती सादर करू लागले.पुढे हा ग्रुप तसाच चालू राहिला कारण त्यामुळे मधुकोशी मंडळींना आपली कला सादर करण्याचा एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळाला अर्थात कोणतीही कला सादर केल्यानंतर त्याचे उचित मूल्यमापन हे व्हायलाच हवे आणि ते उत्तम दाद देऊन होत असते. दाद कशी द्यावी आणि किती द्यावी याचे मोल मोज माप आपटे काकांकडे होते. त्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जणांना आपल्या अभिप्रायातून वेळोवेळी उत्तेजन दिले आहे तसेच काही वेळा सूचनाही केल्या आहेत.  त्यांनी  माझ्या लिखाण यांवर दिलेले अभिप्राय मी जपून ठेवले आहेत. ती मर्मबंधातील ठेव आहे. माझ्या बंधूंचे व्हायोलिन आणि मेंडोलीन वादन ऐकल्यावर त्यांनी त्यांच्या भावाचा मेंडोलीन लवर्स क्लब असल्याचे सांगून त्यांच्याशी संपर्क साधून दिला; त्यामुळे माझ्या लहान भावाला जो अनेक दिवस फक्त व्हायोलिन वाजवत होता त्याच्या मेंडोलीन वादनास एक दिशा मिळाली. काकांच्या संवादिनीतील सूर विसावले ,त्यांच्या संवादिनी वरील सहज सुंदर हाताची फिरत थांबली.  ....संवादिनी यात  काळया आणि पांढऱ्या पट्ट्या असतात  जसे जीवनातही सुख आणि दुःख असते. या सुखदुःखातही नेहमी कसे आनंदी राहायचे त्यात सूर आणि रंग कसे भरायचे हेच त्यांची संवादिनी वादन दाखवत असे. आकाशवाणी वरील बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले होते. त्यांची मातोश्री आकाशवाणीवर कला सादर करत असे. आपल्या मातोश्रीचा आगळा स्मृती जागर ते करीत असत. कधी स्वतःच्या खुशीने तर कधी मधुकोशी मंडळींच्या आग्रहास्तव ते संवादिनी वादन आणि गायन करत असत. ते विलक्षण आनंद देत असे. ते अनवट गाणी सादर करत असत ही त्यांची विशेषता होती.तीन-चार वर्षांपूर्वी *आठवणी* या विषयावर मधुकोशी मंडळींनी विविध लेखन वाचन,वादन सादर केले होते. त्यावेळी त्यांनी पेटीवर " *याद न जाये बीते दिनों की..."* हे अतिशय भावपूर्ण गीत प्रभावीरीत्या सादर केले होते.त्यानंतर माझ्याकरता त्यांनी ते पुन्हा वाजून ते पाठवले होते; त्यांना विसरणे कसे शक्य आहे?  त्यांच्या घरामध्ये कला संस्कृती याचे संस्कार पुरेपूर भरलेले आहेत. म्हणूनच त्यांच्या कुटुंबीयांनी यूट्यूब चैनल तयार करून हा ठेवा चिरंतन केला आहे. 

मधुकोष हा विशाल परिवार आहे .आपटे काका कुणाचे आजोबा होते ,कुणाचे ते काका होते ,कुणाचे ते भाऊ होते, कुणाचे ते उत्तम मित्र होते ....ते कोणाचे तरी कोणी होते यातच त्यांचे साधेपण आणि मोठेपण दडले आहे. सारा मधुकोष आता शोकाकुल आहे त्यांच्याशी बऱ्याच वेळा मधुकोशी अंगणात गप्पा मारण्याचा योग आला. मधुकोशी हा शब्दही त्यांनीच तयार केला आहे.

 एकदा त्यांच्या घरी तीन-चार महिन्यापूर्वी दोन अडीच तास गप्पा मारण्याचा योग आला हे मी माझे भाग्य समजतो. आदरणीय अनुराधा वहिनी ह्या योगशिक्षिका म्हणून त्यांनीही स्वतः योग अभ्यास शिकला आणि तेही योगशिक्षक झाले. आपटे काका खरंच रसिक  प्रेमळ होते. संगीत आणि साहित्य याविषयी त्यांच्याशी बोलताना खूप मौलिक माहिती मिळत असे. काका आणि काकू दोघेही मनमाड येथे असताना त्यांचा विवाह झाला. नाशिक मनमाड येथे अनेक साहित्यिक यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आला.  आदरणीय कुसुमाग्रज, थोर नाटककार वसंत कानेटकर, साहित्यिक समीक्षक म सु पाटील , कवयित्री निरजा यांच्याशी त्यांची सलगी होती. ते  कुटुंबवत्सल होते. नाशिकच्या घराच्या लोकेशन बाबत त्यांनी एकदा मला गंमत सांगितली होती. त्यांच्या गॅलरीतून ट्रॅफिक सिग्नल दिसत असे. शाळेतून कॉलेजतून अनुराधा काकू येत असल्याचे पाहून ते चहा टाकत असत आणि त्या घरी येताच चहापुढ्यात ठेवत असत ही आठवण त्यांनी आवर्जून सांगितली.... कारण मी गेलो असताना त्या दिवशी त्यांनी चहा केला. चहाचे डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे असे काकू म्हणाल्या. त्यादिवशी त्यांना मी कुसुमाग्रजांचे माधव गडकरी  यांनी प्रसिद्ध केलेले पुस्तक आणि बा भ बोरकर विशेष अंक भेट दिले. या भेटीचे अंतरी आगळे समाधान आहे. आपल्या सर्वांचे लाडके आणि सर्वांवर निर्व्याज प्रेम केलेले असे आपले संगीत साहित्य प्रेमी मर्मज्ञ अविनाशी आपटे काका. समर्थ रामदासांच्या उक्ती नुसार 

 *देह  त्यागितां कीर्ती मागे उरावी* असेच त्यांचे  प्रेरणादायी कार्य आहे.


मधुकोष ही कला संस्कृती याचं आगर आहे. एक सव्वा वर्षापूर्वीच आदरणीय संस्कृत शिक्षिका आणि आपल्या सांस्कृतिक कार्याने वेगळी ओळख असलेल्या गोखले काकू गेल्या. आता आपटे काका गेले. *जगावेगळे व्हायचं असेल तर जगा वेगळं* हेच या मंडळींनी आपल्याला स्वतः जगून दाखवलं आहे. या दोघांनी आपल्याला खूप सांस्कृतिक संचित दिले आहे.त्याचे जतन आणि संवर्धन करणे हीच त्यांना उचित श्रद्धांजली ठरणार आहे.काकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.  कविता हा आपटे काका यांचा आवडता प्रांत होता कवी बा भ बोरकर यांची कविता यातील ओळी आज प्रकर्षाने आठवण होते. कारण ते तसेच जीवन जगले.


तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे

स्वप्‍न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे

जाग आहे तोंवरी रे दीप हा लावून घे. 


नंदकिशोर लेले

टिप्पण्या

Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री अशोक आफळे यांचा अभिप्राय
लेले साहेब लेख मधई पानासारखा ऊत्तम जमलाय. ज्यात लालित्य आणि प्रासादिकता याचा सुरेख समन्वय आहे.जो वाचल्यावर मला
आपट्यांसारख्या रसिकाग्रणीशी भेट झाली नाही याची खंत वाटली. .
तुम्ही खरोखरच भाग्यवान अशा
अवलियाचा सहवास लाभला
शुभ रजनी.b
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री देशमाने काका मधुकोश अभिप्राय...व्यक्तिचित्रणाचा उत्कृष्ट नमुना फार सुंदर व्यक्तिचित्र आपटे काकांच्या रूपाने तू व्यक्त केले आहेस. आपटे काका कोणाचे कोणी जरी कोणीतरी होते यातच त्यांचे महत्त्व आणि मोठेपण सामावले आहे नंदू आठवणीतले आपटे काका हा फार सुंदर लेख तुझ्या लेखणीतून निर्माण झाला आहे तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप कौतुक. असेच सुंदर सुंदर लेख तुझ्याकडून भविष्यकाळात अपेक्षित आहे. देशमाने काका.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री नितीन दीक्षित मधुकोश..एखाद्या रसिक कलाकाराने मोठ्या कलाकाराच्या सानिध्यात आल्यानंतर त्याच्या व्यक्ती स्वभावाचं चित्रण करणे म्हणजे काय असतं हे नंदकुमार लेले यांच्या वरील कैलासवासी आपटे काकांच्या लेखात कळते.... बहुआयामी व्यक्तीचा अंत ही एक दुःखद घटना पचवणे कठीण जाते...
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
सौ ज्योती परांजपे मधुकोष अभिप्राय..अतिशय सुंदर व समर्पक लिहिल आहे.अगदी आपटे काका डोळ्यासमोर उभे राहिले. रसिक व्यक्ती मत्व हरपल.पण कलेने अजरामर झाल त्यांना विनम्र अभिवादन🙏🏻🌹
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री नवसुपे अभिप्राय...लेले साहेब तुम्ही आपटे काकांबद्दल जे काही लिहिले आहे ते क्षणार्धात डोळ्यासमोर उभे राहिले.आपटे काका साहित्यिक तसेच शीघ्र कवी होते तसेच ते अप्रतिम गायक पण होते.त्यांना त्यांनी गायलेली अवीट भावगीते जर कोणी सेव्ह केली असतील तर ती त्यांनी ग्रुपवर टाकावी असे मला वाटते.काकांबद्दल लिहावे तेव्हढे कमी आहे.काकांना विनम्र अभिवादन.👏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री श्रीकृष्ण देशपांडे मधुकोश अभिप्राय...आठवणीतले आपटे काका, खूपच छान लेख.त्यांचं जसं व्यक्तिमत्व होतं अगदी तसेच वर्णन आपल्या लेखात आहे. माझाही असाच अनुभव आहे, गणरंग शॉर्ट फिल्म साठी एक गाणं नवीन कंपोज केलं होतं, त्यावेळेस अति उत्तम पेटी त्यांनी वाजवली होती,दिवसभर त्यांचा सहवास मिळाला.
धन्यवाद🙏मागच्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
साहित्य कट्टा आंनदी देशपांडे अभिप्राय.. ओघवत्या भाषाशैलीतील शब्दचित्रण त्या व्यक्ती ला इतके मूर्तरूप देते की ते वाचणार्‍यांचेही परिचित होउन जातात. आणि नकळत अभिवादन केले जाते अशा व्यक्तीला 🙏🌹
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री रवी परळे साहित्य चर्चा कट्टा अभिप्राय...छान समर्पक लेख.👌👍 आपटे काकांना पण
🙏🙏खरे तर या लेखात आपटे काका तर समोर आलेच पण आणखी समोर आले ते तुमचे आपुलकीचे तरल नितळ असे अकृत्रिम संवेदनशील मन. तुमच्यातून उमटलेले सहर्ष सहज प्रतिसाद अगदी नैसर्गिक सरळ असे असतातच. त्यात कधी कुठलाही आडपडदा किंवा संकोच भावना इत्यादींनी कधी थारा पण नसतोच.
तसे भाव या लेखात ठळकपणे जाणवले 👌👍👏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
डॉक्टर सुषमा खानापूरकर भुसावळ अभिप्राय.नंदू , आपटे काकांचे व्यक्तिचित्रण अगदी छान साध्या सोप्या शब्दांत पण समर्पकपणे उभे केले आहेस.
वयाच्या मानाने उत्साही आणि कार्यरत रहाणारे वडिलधारे माणूस, खूप छान वाटले रे वाचायला.
सगळ्यात हृद्य गोष्ट काय असेल तर दोन पिढ्यांमधलं अंतर नाहीसं करून त्यांनी तुला आणि तू त्यांना जो स्वतःचा वेळ दिला, संवाद साधत राहिलात ते आहे! आणि हे आता फार दुर्मिळ होत चालले आहे. मस्त लिहितोस, लिहीत रहा
निनावी म्हणाले…
नितीन बागवडकर मधुकोष अभिप्राय.आपण
साहित्याची आवड असणारे, उत्तम लेखक आणि कवी आहेत. त्यांच्या लेखणीतून उतरलेले आपटे सरांचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते.
*नंदकिशोर* . उत्तम भाषेत लिहिलेला तुमचा लेख खूप आवडला. आपटे सरांचे प्रत्यक्ष व्यक्ती चित्रण तुम्ही केले आहे.

*मधुरंजन* चे कार्यक्रम जेंव्हा पार्किंग मधे होत, तेंव्हा आपटे सरांची खुर्ची समोरच असायची. कार्यक्रम संपल्यावर प्रत्यक्ष भेटून हात मिळवून त्या कार्यक्रमावर त्यांनी चर्चा केली व दाद दिली आहे.
*मधुरंजन* वर त्यांना एडमिन करून घेतल्यावर कोणतीही मधुरंजनशी व मनोरंजनाशी संबंधित नसलेली, कुठलीही उलटी सुलटी पोस्ट आली की, ते लगेच सूचना द्यायचे आणि
ती पोस्ट डिलीट करायचे.
त्यांच्या इतके स्पष्ट, धाडस माझ्यात नव्हते. त्यांच्याकडून जुनी गाणी ऐकताना खूप आनंद व्हायचा. त्यांनी निवडलेली गाणी, जुन्या काळात घेऊन जायची.
धन्यवाद *नंदकिशोर लेले* तुमच्या लेखामुळे एका उत्तम, साहित्याची, संगीताची जाण असलेल्या *प्रा. अविनाश आपटे* यांची व्यक्तिरेखा पुन्हा एकदा डोळ्यासमोर आली. 🙏🌷🌷
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
सौ क्षमा गानू आठवणीतले आपटे काका, खूपच सुंदर लेख लिहिला आहे.
त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व या लेखातून उभे राहिले. त्यांच्या स्मृतींना खूप सुंदर उजाळा दिला आहे लेले काका तुम्ही 🙏🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री राजाभाऊ मोघे मधुकोष अभिप्राय...स्मृती शलाका अप्रतिम शब्द बद्ध केल्या आहेत. मनःपूर्वक अभिनंदन. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री
पद्माकर बोंडाळे यांचा अभिप्रायश्री राम समर्थ
"आठवणीतले आपटेकाका"
सुंदर लेख आवडला.आपण रेखांकिलेले काकांचं
शब्दचित्र मनोवेधक आहे.मर्मस्पर्शी आहे.विकसित व्यक्तित्व हा
काकांचा अविस्मरणीय आणि संस्मरणीय जतनीय
ठेवा आहे.शिक्षण,संस्कार, संस्कृती, संवाद,सद्भाव,सदाचार,
मनस्वीता,मानवता, लोकसंग्रहक्षमता,ज्ञानी असून निरहंकारिता, सर्वांभूती प्रेमभाव या दैवी
गुणांनी कै.आपटेकाका पूर्ण होते हे सत्य आपण पूर्ण ताकदीने मांडलं आहे.
तुमची मानवी स्वभावाची उत्तम पारख आणि साहित्यिक परिभाषेत व्यक्त होण्याची शैली प्रशंसनीय आहे.हळवेपणाबरोबरच
निश्चित मत प्रकटन हे वैशिष्ट्य जाणवलं.आपले आपटेकाकांबद्दलचे भाव
खालील काव्यपंक्तींतून बोलके होतील असं वाटतं...
" संपले गाणं आता
अन् सूर मागे राहिले
गायिली तू भैरवी
मी राग कैसा आळवू?
मुक्त तू झालास ,पण मी
सांग कैसा सावरू?"
कै.आपटेकाकांना श्री राम
सद् गती देवो हीच प्रार्थना.
कल्याणमस्तु
श्री राम

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण

बिंब प्रतिबिंब.....

रघुपती राघव गजरी गजरी रसग्रहण