रघुपती राघव गजरी गजरी रसग्रहण

                       श्री सरस्वती प्रसन्न





प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा.

रेडिओवरील पहाटेचे भक्ती संगीत याने अंतर्मनावर केलेले संस्कार हे अमिट आहेत.त्यातीलच हे अतिशय मधुर गीत.... गीतकार पी सावळाराम, अष्टपैलू गायिका आशा भोसले आणि संगीतकार वसंत प्रभू  जणू त्रिवेणी संगमच. गळ्याची सहज फिरत घेत घेतलेला आदरणीय आशाताई यांचा पहिला आलाप श्रोत्यांचे कान टवकारतो ...रघुपती राघव ....गजरी गजरी.... हा उच्चार दीर्घ करून हे राम आगमन होत असल्यानं सारी वृक्षवल्ली हर्षाने नाचू बोलू डोलू लागली आहे, पक्षांचे गोड कूजन सुरू आहे हे भाव प्रदर्शित होतात.

प्रतिभावंत कवी गीतकार पी सावळाराम यांचे शब्द शबरी आणि रामाचे , भक्त आणि देव याचे आगळं नाते स्वतःच्या स्वरातून पुढे त्या रसिकांच्या गळी उतरवतात.

जशी आई खूप दिवसांनी, वर्षाने आपला बाळ भेटीस येत आहे त्यावेळी ती आनंदात त्याला आवडत असलेले सारे काही गोड धोड पदार्थ तयार ठेवते....आणि त्याच्या भेटीची आस तिला लागलेली असते तीच आस शबरीची आहे.

रामनाम जपे वदे वाचे ती शबरी करी मानसपूजा ती भक्तीचे फळ चाखत होती,तर बोरे गोड आहेत ना याची चाचणी करून वनातील फळं रामा करता काढून ठेवत आहे.आणि राम तिच्या दारी येतो, तिनं दिलेली  बोरं प्रेमाने चाखून चवीने खात आहे गीतकाराचे शब्द कमालीचे चित्रदर्शी आहेत.रामनाम गोड आणि बोरे गोड असे हे अद्वैत भक्त आणि देव यांचं  नातं वर्णिले आहे.

इथे शामा हा शब्द असे सूचित करतो की भक्तास देवाची ओढ लागली आहे .... भिल्लिण राम नाम जपत देहभान हरपली आहे जणू काही आयुष्याची संध्याकाळ रात्र जवळ आली आहे म्हणजेच तिची भेटीची आस तीव्र आहे राम अवतरतो त्यावेळी त्याला ती आनंद आलिंगन देऊन एक प्रकारचे समर्पण करते...आणि स्वर्ग सुखाचा आनंद घेते.राम ही आपली जणू आई आजी खूप दिवसांनी भेटली म्हणून आनंदित होत आहे.जशी आपली आई आजी लहान बाळाला काही खाण्यास देताना प्रथम स्वतः ते चाखते ...तिखट नाही ना, फार उन नाही ना...याची काळजी घेते...त्याच मायेनं शबरी बोर चाखत रामाला जे द्यायचं ते गोड आहे ना याची खात्री करत आहे. असे हे अगदी गोड पवित्र नातं....

भाषिक अलंकारिक सौंदर्य याबाबत बोलायचे झाल्यास.....

वाचे, नाचे  ...गजरी शबरी अंतरी माधुरी आणि भूवरी ही यमके नाद माधुर्य अनुभव देतात. शब्द यातून रुप रस गंध स्पर्श याची जाणीव देणं हे कुठल्याही गीताचे अथवा  काव्याचे मोठेपणा सिद्ध करते ते इथे ठासून भरलं आहे.हे शब्दांचे विणकाम खास पी सावळाराम यांच्या प्रतिभेची उंची आणि खोली दर्शविते.

झाडावरील फळ जे इथे बोर आहे ते पिकण्यासाठी काही अवधी द्यावा लागतो त्याला ऊन वारा थंडी पाऊस हे सहन करावे लागते.... आणि मग ते पक्व होते गोड लागते तशीच भक्ती ही पक्व झाल्यावरच भगवंत भेटतो . असा हा समसमा योग आला आहे.

बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध असा हा भक्त आणि देव भेटीचा प्रवास आहे. शबरीने हे सर्व टप्पे पार केले आहेत.... रामाची ती परम उपासक आहे. राम कधी भेटेल असे तिला झाले आहे.रामदास स्वामींची करुणाष्टके यातही अशीच रामाच्या भेटीची तीव्रता आस आणि प्यास दिसून येते.

गीत राम भक्तीचे आहे आणि गीतकार ही पी सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू अशी ही शुभंकर जोडी...मोजकी वाद्ये गीत गोडी वाढवितात.... ऐकणारा त्यात गुंग होऊन जातो. राघव आणि  लाघव हे शब्द एकमेकात मिसळून जातात.

हेच ते क्षणभरचे का होईना जीवा शिवाचे ऐक्य होय.

न्यून ते करून घ्यावे पुरते. श्रीराम चरणी अर्पण.🙏🙏


रघुपती राघव गजरी गजरी https://share.google/PRDnaL9VEVqup9srU


टिप्पण्या

निनावी म्हणाले…
नंदकुमारजी हे रसग्रहण आपली ऊत्फूर्त प्रतिक्रिया आहे. प्रतिभासंपन्न कवी आणि संगीतकार आणि त्याला आशाताईंच्या स्वर्गीय आवाजाची जोड म्हणजे जणू सोनिया सुगंधूच. तो काळच भारावलेला होता.लता,आशा सुमन मालती पांडे, कुंदा बोकील, कुमुदिनी पेडणेकर‌ यानी सुरांचा
पाणलोट काढला होता
निनावी म्हणाले…
अरे वा खूप छान... रसग्रहण.. ..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण

मातृदिन- मातृवंदना

बिंब प्रतिबिंब.....