स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
कवितेच्या अंगणात ,गीतांच्या चांदण्यात
पुष्प पहिले
कवी मन हे नेहमीच जागरूक असत. सभोवताल, निसर्गातील विविध आविष्कार, ऋतुबदल ,आसपासचे सुखदुःखाचे विविध प्रसंग , हे टिपकागदाप्रमाणे त्याच्या अंतर्मनात साठत असतात हीच काव्यबीज असतात. स्वानुभव आणि परकायाप्रवेश यातून काव्य जन्म घेत.
"फिरे रात्रंदिनी अवनी सुख दुःख भिडे कवी हृदयी उसंत मिळता उमटे कागदावंरी "
या प्रक्रियेतून कवी व्यक्त होत राहतो.
एखादी कविता किंवा गीत मला खूप आवडतं आणि ते आपल्याला का आवडते असं जर विचारलं तर त्यावेळी या कवितेमधील शब्दरचना, या कवितेमधील उपमा ,शेवटच्या कडव्यात दिलेली कलाटणी, नादमयता मांडलेला विचार असा पण काहीतरी सांगतो परंतु या सर्वांचा आपण एकत्रित विचार केला तर ते झालं कवितेच रसग्रहण .
कमी शब्दात जास्त आशय आणि एकाच कवितेतून एकापेक्षा जास्त अर्थ यक्त होण ही कविता या वांग्मय प्रकाराची वैशिष्ट्ये आहेत म्हणूनच कवीस अभिप्रेत अर्थ आणि आपणास भावलेला अर्थ हाही वेगळा असू शकतो.
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लागेल लावील वेड जीवा हे आशाताईंचं सुमधुर गीत ऐकलं ( कवी म पां भावे ) आणि अपूर्णतेच्या वर्णनाने मला काही दिवसांपूर्वी वाचलेली आचार्य प्र के अत्रे यांची 'मानवी अपूर्णता' ही कविता आठवली. या दोन्ही कवितांमध्ये आशय साधर्म्य आहे. या दोन्ही रचनांचा रसास्वाद आज आपण घेणार आहोत. कवितेच्या रसग्रहणात शब्दयोजना अर्थात शब्दालंकार ही कविता उठून दिसावी असे बाह्य घटक तर आशय, भावसौंदर्य हे अर्थालंकार आंतरिक घटक असतात.
काही स्त्रियांना पत्नी झाल्यावर प्रेयसी होण्याचे भाग्य मिळते तर काही भाग्यवान स्त्रिया प्रथम प्रेयसी आणि नंतर पत्नी होतात. स्वप्नातल्या कळ्यांनो या गीतातील भाव एका प्रेयसीचे आहेत; विशेषतः सैन्यदलातील सैनिकाच्या पत्नीचे आहेत. आपला प्रियकर सखा खूपच दूर परगावी आहे आणि तो आता केव्हा भेटणार या अंतरीक ओढीतून तिच्या ओठी आले आहेत. आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर ती स्वार झाली आहे .प्रियकराची मागील भेट ही खूपच अंतराने झाली होती या आठवणीत ती गुंग झाली आहे . त्याची भेट होईपर्यंत गत भेटीतील सुखद आठवणीत ती रममाण झाली आहे आणि त्याच वेळी तो आता केव्हा येणार याची हुरहुर तिला लागली आहे. आशा निराशेचे मेघ हे प्रत्येक प्रेमिकांच्या जीवनात येतच असतात. सैन्यदलातील मर्दाशी विवाह बंधनात गुंतलेल्या स्त्रीस व तिच्या जिवलगास मात्र हा अनुभव नेहमीचाच असतो. अनिश्चितता हीच निश्चितता हे मनी धरूनच ते जीवनसाथी झालेले असतात.
पूर्व आठवणी वरील समाधान , भेट लवकर होणार की नाही होणार या उंबरठ्यावरील भावना आणि गाठ तर नक्की होणार ही प्रबळ इच्छा असे सर्व संमिश्र भाव या गीतातून अगदी समर्पकपणे व्यक्त झाले आहेत .
रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरूनी गेल्या
कधि सोशिला उन्हाळा कधी लाभला विसावा
विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी
काट्या विनाच हाती केव्हा गुलाब यावा
या ओळी म्हणूनच रसिक हृदयी खूपच भिडतात. यमक -(अन्त्ययमक) हा शब्दालंकार इथे दिसून येतो तर अर्थालंकारच्या दृष्टीने पाहिले तर विरहरुपी पावसात भिजल्यावर प्रीतीच्या रोपट्याला फुलं येणार आहेत ही कविकल्पना (रुपक अलंकार) फारच रम्य आहे. जे हवे आहे ते न मिळणे, वा प्रतिक्षेने मिळणे वा अल्प मिळणे ही एक प्रकारची अपूर्णताच नाही का ? अपूर्णता हीच पूर्णतेची किंमत असते.
आचार्य अत्रे यांच्या' मानवी अपूर्णता' या कवितेत सारंगी, साज ,चित्रकला मूर्ती फूल , हिरा इत्यादी अनेक उत्तम प्रतिमांचा वापर करून विश्वातील प्रत्येक गोष्टीत पूर्णपणा येण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची जरुरी असते हेच शाश्वत सत्य सांगितले आहे.
सारंगीची साथ लागते आम्हाला गाणे गाया,
सौंदर्याला साज लागतो सोन्याचा नटवाया,
चित्रकलेचा उठाव खुलतो असता मागे छाया ,
कांती हिऱ्याची खुलवायास्तव लागे कोंदण काया
प्रासा वाचून बोल मनोहर फोल तुझे कवीराया,
रसिका वाचुनी तशी तुझीही पोपटपंची वाया
अशी ही सहज सोपी अर्थवाही यमक पूर्ण काव्य रचना आहे . सभोवताली पाहता निसर्गातही कमी-जास्त पणा आढळून येतोच. लहान सान ओढे नदीस मिळतात, नदी वाहत वाहत मोठी होत जाते आणि सागरास मिळते. सागरास रत्नाकर म्हटले आहे परंतु त्याचेही पाणी खारट असते . सागराच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊनच सुखकारक पर्जन्यवृष्टी होते आणि तहानलेली वसुंधरा तृप्त होते. पुन्हा ही पर्जन्यवृष्टी ही कुठे अति तर कुठे अल्प म्हणजे इथेही अपूर्णताच ! सारांश अपूर्णतेतूनच पूर्णतेची महती पटते.
संगीतकार अनिल अरुण आणि आशा भोसले यांचा स्वर्गीय स्वर आपल्याला एका वेगळ्याच विश्वात नेऊन अंतर्मुख करतात. स्वतः अनिल मोहिले हे उत्तम व्हायोलिन वादक होते. या गाण्यांमध्ये व्हायोलिनचा अतिशय सुंदर वापर केलेला आहे. एखादा गाण्याचे शब्द कितीही चांगले असले तरी त्याला संगीताचे कोंदण लावल्यावरच ते रसिक हृदयी भिडतं आणि म्हणूनच ते कवितेचं गाणं होतं... अशीच ही कलाकृती आहे....विणकाम आहे....
दोन्ही कविवर्य आणि संगीतकार आणि गायिका यांच्या स्मृतींना वंदन करतो.
https://youtu.be/QA3_MxEQW2A?si=0d-SVBLJmCYWYIbI


टिप्पण्या
अशोक आफळे.