अक्षर प्रवास..हस्ताक्षर दिनानिमित्ताने ✍️

 

अक्षर प्रवास.... हस्ताक्षर दिनानिमित्ताने ✍️







जन्मल्यावरी उमटतो प्रथम हुंकार ,

 हुंकार नव्हे तो आदिबीज ओंकार

बाळ बोले डोळ्यातूनी

सुरू होई मातृ नवजात तान्हा संवाद 

बोबडे बोबडे ते कान्हा बोल  

कळे आकळे मातृहृदयास 

मग काऊ चिऊ वनराजी ओळख 

अशी ही  नवबोली 

आई दावी क्रमाक्रमाने

 अक्षर खोली......


 श्री लिहून दावी आई 

  हातात पाटी पेन्सिल देई     

  गिरवाया अक्षर आरंभ 

  मग उमटते गमभन 


गणेश शारदा ज्ञान शक्ती रूपे 

देती नकळत आत्मभान 

होतो यशस्वी शिक्षणक्रम पूर्ण

करू मातृ पितृ शिक्षका वंदन

ऋण  त्यांचे महान


असे असावे हस्ताक्षर की 

ठरावी ती आपली 

अक्षर ओळख 


लिहावे नित्य संत साहित्य 

रामनाम अन् सुविचार 

चिरंतन असे काही

जे आहे  नित्यसत्य 

अनुसरून ते राही विवेक जागृत


लिहिता मिळतो मानसी

आराम,आत्मिक समाधान 

हात लिहिता ठेवता, 

होते मनाची मशागत 

मोहक हस्ताक्षर पाहता

वाटे ही जणू मोत्यांची माळ 

आनंद देई आपणांस 

आणि पाहून वाचून दुजास...


लेखणी, मेज,आणि वही 

ही पाहतात रोज वाट

कधी होईल आता पहाट

 अन् मिळतील 

नवीन अक्षर घाट

मिरवू आपुला थाट माट 


समर्थ सांगती दासबोध दशक एकोणीस प्रथम समासी 

लेखन क्रियानिरूपण 

कसे काढावे सुंदर वळणदार अक्षर, 

कसा असावा ग्रंथ ,

कसा सांभाळावा ग्रंथ

 जरी काळ पालटत

तरी आजही ते उचित 


बोध घेऊन त्यातूनी

करू नित्य प्रयास 

करि अल्प सायास 

ध्यानी असू द्यावे क्रियामाण स्वातंत्र्य

ठेवू अखंड ओठी हाती रामनाम

तेच देई अक्षर धाम

फलदायी होईल अक्षर प्रवास....

फलदायी होईल अक्षर प्रवास....

✍️


नंदकिशोर लेले.

टिप्पण्या

Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
अनिल पाठक अभिप्राय...हुंकारातील अक्षर ओळखी पासून सुरू होणारा हस्ताक्षरांचा प्रवास खूप छान सांगितला आहे. दासबोधाच्या आधारे सुवाच्य अक्षरांचे महत्व खूप भावले.👌🏻🙌🏻
Agnihotri Dattatray म्हणाले…
दत्तात्रय अग्निहोत्री अभिप्राय -तुझी हस्ताक्षर दिनानिमित्त लिहिलेली अक्षर प्रवास ही कविता खूप छान आहे. तो प्रवास आई आणि नवजात बाळाच्या संवादाने, जो पुढे, अक्षर ओळख आणि वळणदार अक्षर या पर्यंत जातो हे तू खूप छान पद्धतीने मांडले आहेस. फक्त आईच आपल्या मुलाला समजून घेऊ शकते त्या मुळे लहानपणी बोलता येत नसले तरी संवाद होऊ शकतो. शिवाय गणपती आणि शारदा यांची कृपा असते म्हणून. गणपती हा ज्ञान स्वरूप आहे त्या मुळे अर्थ कळतो तर शारदा त्या अर्थाला शब्दरूप देते, हे दासबोधात सांगितले आहे. कवितेत आलेला दासबोधाचा संदर्भ अगदी समर्पक आहे. एकूणच कविता छान जमली आहे.
शारदेचा तुझ्यावर वरदहस्त आहे, तो तसाच सतत राहो 👌👍

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण

बिंब प्रतिबिंब.....

रघुपती राघव गजरी गजरी रसग्रहण