बिंब प्रतिबिंब.....

![]() |
बिंब प्रतिबिंब दृश्य बहु मनोहर.....
हे खरं की ते खरं...
भास आभास
सारा मायेचा खेळ,
जड ,चंचल, आणि निश्चळ
संत दाविती भेदाभेद
साधती योग्य मेळ *
काव्य उमले फुले
हेचि समर्थ वांग्मय अभ्यासाचे फळ
अर्पण करतो सदगुरू चरणी होण्या सुफळ.
* या ओळीचा गर्भितार्थ मानत मानत शिकवावे , संत सज्जन यांचा जन्म हा मानवांचा उद्धार करण्यासाठी झालेला असतो. आपण ज्ञानी मोठे असलो तरीही ते स्वतःला सर्वसामान्य असे दाखवतात कारण त्यांना लौकिकातच राहून कार्य करावयाचे असते.
मानत मानत शिकवावे
बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध
उद्धरीत जावे सकळजना
असे त्यांचे कार्य असते.
संत नि:स्पृह असतात त्यांची लक्षणे दासबोध यांत सांगितली आहेत
( दशक १४ समास १ अखंड ध्यान नि:स्पृह लक्ष्मण नाम).
Photo courtesy-
सारे फोटो हे चंबळ नदी परिसर , अभयारण्य
डॉक्टर घनश्याम बोरकर.
डॉक्टर, निसर्गप्रेमी, संत साहित्य गाढे अभ्यासक
प्रतिभावंत कवी, साहित्यिक, उद्योजक असे बहुआयामी मनस्वी व्यक्तिमत्व आहे.
त्यांची ओळख माझा सोलापूर येथील दयानंद कॉलेजमधील सहृदयी मित्र श्री संजय तिकोटेकर याने करून दिली. त्यांचे
भेटीचा आणि आणि सहभोजन योग जानेवारी २०२६ मध्ये संजयने आणला.
हे अलौकिक प्रतिभावंत कवी बा .भ बोरकर यांचे पुतणे आहेत. त्यांची अनेक पुस्तके आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.त्यांचे खेळीया नावाचे पुस्तक याच मित्राने मला तीन वर्षांपूर्वी भेट दिले होते. त्याची प्रस्तावना ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक डॉक्टर सोमनाथ कोमरपंत सर (माजी मराठी विद्यापीठ विभाग प्रमुख गोवा विद्यापीठ ) यांनी लिहिली आहे. सरांनी नामवंत साहित्यिक यांच्या १०० च्या वर पुस्तकांना प्रस्तावना लिहिली असून त्यांची स्वतःची अनेक साहित्य कृती टीकात्मक लिखाण काव्य रसग्रहणे अशी अनेक पुस्तके आहेत. सर
माझे साहित्यातील मोठे मार्गदर्शक गुरुस्थानी आहेत;दूरस्थ तरी अंतस्थ . सरांचे केवड्याचे पान हे कवितांचे रसग्रहणाचे पुस्तक वाचनात आले आणि सरांची आणि माझी पहिल्यांदा सहा वर्षांपूर्वी फोनवर प्रथम भेट झाली. त्याच वेळी सरांनी मला तुम्ही माझे सहोदर आहात असे उद्गार काढले. मी भारावून गेलो. त्यानंतर त्यांनी मला स्वतःची दोन पुस्तके केवड्याचे पान आणि कवी कुलगुरू केशवसुत हे अतिशय सुंदर हस्ताक्षर लिहून सप्रेम कुरियरने पाठवून भेट दिली. पुढे अनेक वर्ष हा स्नेह अधिकच वृद्धिंगत होत गेला आणि मला साहित्यातील अनेक शब्द परिभाषा , निरनिराळे साहित्यिक यांची वैशिष्ट्ये, त्यांची पुस्तके याविषयी अधिक माहिती ज्ञान देत समृद्ध करत गेला. ही सारी सरस्वतीची कृपा आहे. त्यांचे सघन सखोल लेखन हे मला आकृष्ट करत गेले. परंतु सरांची भेट ते गोव्याला असल्याने आणि माझ्या घरातील व्यस्ततेमुळे होऊ शकली नाही. म्हणूनच मी त्यावेळी त्यांना दूरस्थ तरी अंतस्थ गुरू असे म्हटले आहे.
त्यांच्या भेटीचा योग डिसेंबर २०२५ मध्ये आला. असे हे भेटीचे योगायोग हे माझे भाग्य.
डॉक्टर कोमरपंत सर यांचा सत्कार समर्थ वांग्मय गाढे अभ्यासक आणि श्रीमत् दासबोध निरुपणकार आणि माझे युनायटेड वेस्टर्न बँकेतील १९८२ पासूनचे जिव्हाळ्याचे स्नेही आदरणीय श्रीयुत पद्माकर बोंडाळे यांचे हस्ते
मडगाव गोवा या सरांच्या घरी केला हे माझे परम भाग्यच. सरांनी आम्हाला त्यादिवशी घरी जेवायला आग्रह केला आणि आम्ही तृप्त झालो. अशी ही जानेवारी आणि डिसेंबर महिन्यातील एकमेकांची आत्मतृप्तीची भेटाभेट सारी समर्थ कृपा.









टिप्पण्या
कोमरपंत सरांचे लिखाण लालित्य आणि प्रासादिकता यांनी परिपूर्ण असते.
त्यात वाचन,मनन आणि चिंतनाची बैठक असते.असो.
समर्थभक्त श्री बोंडाळेसाहेब यांना सस्नेह प्रणाम.
' सरस्वती ' तुझ्यावर प्रसन्न आहेच हे अनेकवेळा बोलून झालं. तुझे मित्र आणि गुरू यांचं तुला वेळोवेळी प्रेम आणि मार्गदर्शन मिळत गेलं. तुला या सर्वांचा सहवासही मिळाला. म्हणून नशीबवान. आयुष्याच्या या टप्प्यावर तुझी काव्यसंपदा बहरून येवो यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.
बिंब-प्रतिबिंब हे शीर्षक छान आहे. आणि त्यासोबतचे फोटो पण त्याला साजेसे.,अगदी छान आहेत. खरच सगळा भास-आभास असतो.😊
खूप छान व्यक्तींशी तुमच्या भेटी-गाठी होतीयेत..वाचून छान वाटलं.👍🏻👏🏻👏🏻
श्रीराम समर्थ.🌹🙏🏻