बन्सीधर



किती मोहक लडिवाळ रूप

कान्हा निळा सावळा 

किती लाविसी रे लळा.....

खेळ तव संचिताचा  परि आगळा

कंसमामा झाला वैरी 

 सिद्ध तुला मारण्या 

यमुना आला पूर..

तुला तारण्या 

जन्म होता आरंभिल्या लिला 

नवजात बाळ ते वासुदेव शिरी 

पद लागता यमुना दुभंगली 

म्हणून नीर ते अती पावन 

भाविक ते करती प्राशन 


वासुदेव देवकीस दिलेस वैराग्य 

यशोदेस लाभले मातृसौभाग्य 

दाविले विश्वरूप यशोदेस् 

मिरवला होऊन नंदकिशोर 

नवनीत चाटण्या तव ओठी 

सारं गोकुळ धावे तुझ्यापाठी

 सुखावती गाठी -भेटी 

नवनित असे ते लौकिकी 

परि होते ते अमृत अलौकिकी 


सदा तव ओठी बासुरी, 

म्हणूनी तू बन्सीधर  

ऐकून मंजुळ ध्वनी 

हर्षती धेनु डोलवती मान 

गोड घंटानादानी करती नमन

पुष्ट होती स्तन 

मग होई क्षीर स्निग्ध मधुर 

किमया तुझी अपरंपार

म्हणून तू मनमोहन

होता निसर्ग कोप 

करांगुली वरी तोलीसी गोवर्धन  

क्षणार्धी अवघे गोकुळ झालं 

पुन्हा सघन सधन


हरण केले महाभयंकर कालियाचे 

स्वार झाला तया शिरावर केलं नर्तन

शुद्ध झाली यमुना

म्हणून तू कालिया मर्दन 


येता मानव जन्मा 

न चुकला तुझा काही भोगत्रास

गेला गुरु गृही शिकण्या विद्याभ्यास

संदीपान ऋषींचा झालास तू शिष्य खास 

तिथेच झाली मैत्री तुझी सुदाम्याची 

तीच झाली कहाणी  पुढे

अमर मैत्री प्रेमाची


तू सुदर्शन चक्रधारी 

सोडविल्यास बंदीवासातून 

सोळा सहस्त्र नारी 


राधा प्रेम अमर गाठी

मीरा प्रेम झाली मधुरा भक्ती


पुरवण्या हट्ट सत्यभामेचा

आणलेस झाड प्राजक्ताचे  स्वर्गातूनी

फुले पडती तयाची रुक्मिणी अंगणी 


 सत्यभामेने दावण्या तुज वरचे प्रेम 

केली सुवर्णतुला

परि 

 सुवर्ण मुद्रा साऱ्या

पडल्या अपुऱ्या 

रुक्मिणीने ठेवताच तुळशी पान 

झाली सुवर्ण तुला समान 

केलेस सत्यभामेचे गर्वहरण

साधन असू दे किती सान 

 सांगितले  तयातील

भक्त भाव हाचि महान 


कौरव दरबारी वस्त्रहरण

करता आर्त धावा 

लाज राखली तू नंदलाला

द्रोपदीस दिले अभयदान,  

होता तुला जखम व्रण  

फाडूनी दिला तिनं भरजरी पितांबर 

बहीण भाऊ प्रेमाचे अजोड उदाहरण

मानून गोड सुदाम पोहे 

दाविलीस तू जगा 

कर्म विपाक सिद्धांत महती 

होता अनुताप 

सुदाम्यास मुक्ती 

सखा मैत्री अभेद्

निर्मळ भाव त्याचे 

अंतरी तुझ्या उमटले

दुजा मुखी हास्य उमलले 

फुलून आले, ओसंडले 

द्वैत अद्वैत जाहले


एकेक कथा त्या त्या परी महान 

अर्थ त्यात भरला गहन

गात तव गुण कीर्ती 

नारदमुनी फिरती त्रिखंडात 

ध्रुवास बसविले आढळपदी अंबरात


कुरुक्षेत्रि अपूर्व रणकंदन

केलेस सारथ्य सत्य रथाचे 

ध्वज झळके त्यावरी विराज पवन सूत हनुमान 

राम कृष्ण एकच असती याचेच हे सत्यापन

गुरू शिष्य श्रोता वक्ता संवाद

कथिली  अर्जुना गीता जगत कल्याणा

 दाविलीस आम्हां 

 कौरव पांडव ही मानवी वृत्ती 

केले निर्दालन असुरी गण 

पांडवांचे असे तू दिव्य अग्रभूषण


 पार्थास बोध करण्या, झालास तू सारथी, 

 शिष्योत्तम अर्जुन त्रिभुवनी अपूर्व  

  हतवीर्य होता तो रणांगणी

 सांगितला कर्तव्य धर्म , जीवन मर्म 


 धर्म रक्षणार्थ केलेस तू विविध कार्य  

योजिले नामी उपाय 

म्हणती त्यास कृष्णनिती 

गुंगविले जरासंधा 

वाचविण्या यदुप्रजा नरसंहार,

सोडलीस मथुरानगरी आलास तू द्वारका पुरी

योग्य समय येता 

 जरासंधास मारण्या उठविलीस तु वार्ता 

बलाढ्य ते दोन वीरसेनापती हंस और डिंभक 

यातील हंस गेला मृत्युपंथा

ऐकून हंस गेला, आत्मघात केला डिंभकाने 

पुढे आव्हान दिलेस जरासंधा खेळण्या द्वंद युद्ध 

भीमाकरवी त्याला केले पूर्ण गारद 

सांजसमयी युद्धविराम असता धाडलेस तू द्रौपदीस

 घेण्या भीष्म भेट वाजवून कंकण किणकिण 

मिळविला तिनं आशीर्वाद अभ्याद्य राहिले सौभाग्य 

येता योग्य काळ वेळ 

शिखंडी करवी भीष्माचार्यां झाले घायाळ 

इच्छा मरण हे तया वरदान 

शरपंजरी केली अर्जुनाने 

 येता उत्तरायण

सोडिला मग तयांनी प्राण

जरी तू साक्षात परमेश्वर 

परी येता मानवजन्मी

यादवी माजली तव राज्ये

कुळी आले दूषण 

जाहला तुज अतिव क्लेश 

तूझाच सारा खेळ

 रचिले तूच तव प्राक्तन 

अवतार अंती घुसला पदी बाण, 

झालास तू गतप्राण

घेता मानव जन्म

मृत्यू न चुकेही देवा 

दाविले हे सप्रमाण 


परि सांगे गीता , होण्या स्व उद्धार

आहे नर जन्मची महान 

सत्कारणी लावा देह  

नामस्मरण हाची श्रेष्ठ उपाय 

करण्या समाप्त जन्ममृत्युचक्र

 ठेवा सदा ओठी  राम कृष्ण हरी नाम

भवसागर तरण्या तीच होईल नाव 

तीच नेई अक्षरधाम

हर  दिनी जे  करी कर्म

करतो तुज अर्पण, 

सुटे कर्मबंधन  पुनर्जन्म 

 

देवकीनंदन गोपाळा.. 

आवडतो सकळा, 

सावरतो सकळा, 

 तव कीर्ती महती सांगण्या 

अपुरी पडे ही शब्दकळा 

दरवळे सुगंध हृदयमंदिरी

शब्दचि जाहले सुस्नात 

भागवत धर्म पताका उंचावत 

चरणी शतसहस्त्र प्रणिपात 


कृष्ण जयंती गोकुळाष्टमी साधून

सुचले म्या नंदकिशोरा हे कवन, 

मानून घे तया गोड 

जरी बोबडे बोबडे हे स्तवन .

🙏




टिप्पण्या

हिमवान म्हणाले…
"बन्सीधर " मुक्तछंदी काव्यसुमन हे
मोहविते मजलागी वाचण्या मुदे
शैशव अन्य बाल्य ज्याचे जोखमी किती!
असामान्य धैर्य वीर्य बालकी अती
कीर्तीसह यश कृष्णा घेई,खेचुनी
नाउमेद कधि न होई साहे हासुनी
गायिले चरित्र दिव्य प्रेमभक्तिने
आळविले गोविंदा मधुर गायने
रमलो मी माधव पदी काव्य वाचता
मंगल तव जीवनी ये भक्तिपूर्णता
हिमवान...
मित्रा
अभिवादन
अभिनंदन
शुभेच्छांसह
कल्याणमस्तु
श्रीराम



Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
ती.दादा आपणास आदरपूर्वक नमस्कार.
आपण वाचून अभिप्राय रुपी आशीर्वाद दिला खूप आनंद झाला. आमचे भाग्य आहे की आपणास आम्ही हे पाठवू शकतो सहज . ही भगवंत कृपा आहे. राम कृष्ण हरी. 🙏🙏
Jayant Kale म्हणाले…
. मुक्तछंदात गुंफलेले काव्य अतिसुंदर.👌🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार जयंत तू लगेच आस्वाद घेऊन अभिप्राय दिलास.खूप आनंद झाला.
अनिल पाठक म्हणाले…
श्रीकृष्णाचे चरित्र / अवतार कार्य दीर्घकाव्यातून छान सांगितले आहे.👌👍
Gurunath Deshpande Gv Kolhapur म्हणाले…
बन्सीधर काव्य सुंदर. मोजक्या शब्दांत कृष्ण जीवनाचा संपूर्ण चित्रपट मांडलास. उत्तम.
निनावी म्हणाले…
श्रीकृष्णच्या अवताराचा सर्वसमावेशक तरीही अत्यंत आटोपशीर असा जीवनपट मांडला आहे. काव्य पण छान झाले आहे
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
रघुनंदन, तुझा आपुलकीचा अभिप्राय भावला. सरस्वती कृपा असल्याने गोपाळ कृष्ण महिमा गाथा काव्य सुचलं.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
अनिल,तू लगेच आस्वाद घेऊन कळवलं, आनंद झाला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणींचां गुलमोहर ....

तुझ्या नामात रे गोडवा ......

वर्षाव