मन हो रामरंगि रंगले-





मन हो रामरंगि रंगले....


रामरंगि रंगले मन

आत्मरंगी रंगले मन

विश्वरंगि रंगले //


चरणि नेत्र गुंतले

भृंग अंबुजांतले

भवतरंग भंगले

अंतरंग दंगले //


प्रभू श्रीरामचंद्र यांचे अयोध्या नगरीमध्ये गुढ्या तोरणे उभारून स्वागत करण्यात आले हा दिन म्हणजे गुढीपाडवा. त्या अगोदर असतो तो रंगोत्सव. काही दिवसापूर्वीच रंगोत्सवानिमित्त विविध माध्यमातून रंगाचा उल्लेख असलेली गाणी ऐकू येत होती परंतु जे गाणं कुठेही ऐकायला मिळालं नाही पण मनामध्ये सारखं रुंजी घालू लागले ते गाणं म्हणजे मन हो राम रंगी रंगले. स्वरभास्कर पंडित भीमसेनजी यांनी गायलेले हे अतिशय भावपूर्ण गाणं आहे. प्रथम मला हा अभंग आहे असं वाटत होतं. परंतु ही भक्तीरचना' आठवणीतल्या गाणी' या संकेतस्थळावर शोध घेतला असता प्रतिभावंत संगीतकार श्री गोविंदराव टेंबे यांनी संगीत दिलेली व स्वतः त्यांचीच ही काव्य गीत रचना हे कळलं. रंग या विविध शब्दांचा उल्लेख असलेले विविध शब्द या गीतात अतिशय समर्पकरीत्या योजिलेले आहेत. त्याने मनावर अनेक वर्ष पकड घेतलेली आहे. मात्र आज हे गीत आकळलं .

या गीताचे रसग्रहण करावं असं वाटलं ते खाली देत आहे.


आदरणीय गोविंदराव टेंबे यांनी लिहिलेल्या 'तुलसीदास' या नाटकातील ही भक्ती रचना आहे .फक्त सतरा शब्द आणि दोन कडवी असे गीत गाताना भीमसेनजींनी सारा प्राण यात ओतला असून सुरुवातीच्या आलापीतच ते आपल्याला हातात बोट धरून रामाच्या मंदिरामध्ये घेऊन जाऊन त्याच्या सन्मुख उभे करतात. आणि हळूहळू आपल्या दैवी सुरातून साऱ्या श्रोत्यांना स्वर तल्लीन करत त्यांच्या अंतचक्षूसमोर रामराया उभा करतात. सगुणातून निर्गुणाकडे घेऊन जातात कारण श्रोतेजन गाण्यात रंगून डोलू लागतात .


रामरंगी, आत्मरंगी, विश्वरंगी ,भवतरंग आणि अंतरंग अशा पाच शब्दांचा सुरेख वापर करून ही रचना बांधली गेलेली आहे. रंगले, गुंतले, अंबुजातले (अंबुज म्हणजे पद्म -कमळ) भंगले ,दंगले अशी यमकं यामध्ये गुंफलेली आहेत.

रामाचे नाम ओठी नित्य घेत असता त्याची सवय लावून भक्त राम नामात रंगून गेला आहे. रामनामाशी अनुसंधान घडले आहे. मन आणि आत्मा एकरूप झाले आहेत.-साऱ्या विश्वातले चैतन्य आपल्यात समाविष्ट झाले आहे अशी त्याला अनुभूती येते आहे. असा अर्थ पहिल्या कडव्यातून जाणवतो.


परंतु हे सर्व कसे घडले हा चमत्कार कसा झाला याचा उलगडा पुढील कडव्यात आहे. सामान्यतः काव्यरचनेमध्ये मनाला विस्मयीत करणारी कलाटणी ही शेवटच्या कडव्यात अथवा ओळीत असते परंतु इथे त्याचा क्रम बदलला आहे . हे ही या गीताचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. राम नाम जप करताना डोळ्यासमोर रामाच्या मूर्तीचे ध्यान आहे आणि एक शरणागतीची भावना निर्माण झाली आहे .सारा विश्व पसारा यात राम भरून राहिला आहे (माझे तुझे हे विसरून ) जळी स्थळी काष्ठी पाषाणी राम भरून राहीला आहे तोची एक जगंनियता असा दृढ विश्वास भक्ताला झाला आहे. आणि तो ही कसा तर ज्याप्रमाणे भृंग हा कमळामध्ये मधाच्या ओढीने एकेक पाकळी पार करत गाभ्याशी जायचा प्रयत्न करतो आणि तेथेच गुंतून पडतो स्वतःच पूर्ण समर्पण तिथं घडतं .भृंग अंबुजातूंनी हा उच्चार दीर्घ करुन त्याचं तिथं तल्लीन होणं भीमसेनजी स्वरातून दाखवितात 'भवतरंग भंगले' या ओळीतून हे सारं व्यक्त होत. सर्व अहंकार गळून पडला आहे .सर्व षडरिपू यांचा अस्त झाला आहे; अंतरंगी फक्त रामनाम आता उमटलं आहे आणि त्यातच भक्त दंगून गेला आहे. जीव आणि शिव यांची गाठ पडली आहे.


इथं जे गीतकाराला आणि संगीतकार याला सांगायचं आहे ते आदरणीय भीमसेनजीनी आपल्या समर्थ स्वरातून साकारलं आहे. ऐकणारे सारे यांना(व्यष्टी आणि समष्टी) रामरूप होणं याचं प्रत्यंतर येतं.


https://www.aathavanitli-gani.com/Song/Man_Ho_Ram_Rangi




टिप्पण्या

हिमवान म्हणाले…
सुंदर रसग्रहण!
हे भावगीत आहे.यात
भक्त द्वैतातून राहून, भगवंताप्रती उत्कट प्रेमभाव
अनुभवत आहे.प्रत्यक्षात तो रामरायांशी सायुज्यता पाहून अद्वैतानन्दात नित्यतृप्त आहे.
द्वैत भावात हेतुत:रमणं हे भक्तीचा परमोच्च
आनंद अनुभवण्याची एकमेव साधन आहे. अतिशय उचित शब्द नियोजन आणि उत्कट
प्रेमाचं मनोहारु आविष्करण याचा मिलाफ या
ठिकाणी जाणवतो. शब्दांतील आशय,
गायक आणि साधकश्रोते यांच्या अन्तकरणात
खोलवर पोहोचवण्याचे अवघड काम, स्वरभास्करांनी सहज केले आहे. वस्तुत:सहजसमाधीत मनपण आत्मत्वात विलय
पावते. परंतु अद्वैताचा अवीट सुख भोगण्यासाठी
"मी" भान जिवंत ठेवले आहे. लेलेजी, आपण
फारच सुंदर, अभ्यासपूर्ण रसग्रहण केले आहे.
गाण्याचे कर्ते,प्रयोजन आणि अध्यात्मिकमूल्य
आपल्या शैलीदार स्वादपूर्ण शब्दरंगातून व्यक्त
होतात. अभिवादन! अभिनंदन!
शुभेच्छांसह
धन्यवाद
कल्याणमस्तु
श्रीराम




Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्रीराम. सुप्रभात.आपण निस्सीम रामभक्त आहात. आपल्याला हे रसग्रहण आवडलं याचा
मला आनंद झाला. माझी सेवा राम चरणी आपल्या मार्फत रुजू झाली आपला आशीर्वाद अनमोल आहे.घरातील व्यस्ततेमुळे आपणास उत्तर देण्यास उशीर झाला याबद्दल क्षमस्व लवकरच भेटू.
Dr Sushama Khanapurkar म्हणाले…
रामरंगि रंगले मन हे
अत्यंत भावमधूर श्रीराम भजन आणि तितकेच अर्थगर्भ रसग्रहण केले आहे. फारच छान लिहिलंय!
अत्यंत मनाला भिडणारी पंक्ती रचना व त्याला मिळालेला भीमसेनजीं चा आवाजाचा स्वर. त्यातून तू केलेले हे रसग्रहण ग्रहण करण्यासाठी ह्या गीताचे निर्माते व गायक साथीदार आपल्या जवळ असायला हवे होते. प्रत्येक गिताचे रसग्रहण करता येईलच अशी खात्री कुणीही जाणकार देऊ शकेल असे वाटत नाही. अंतर्मनातील व्यक्तत्ता ही रसग्रहण करून दाखवून देता येते हा अनुभव आज नंदू सेठ तुझ्या मुळे मिळाला. व्यक्त भक्ती आणि सरस्वती आज एकत्र अनुभवास आली आज या रसग्रह

णा ने
अनिल पाठक म्हणाले…
खूप छान रसग्रहण केलं आहे,नंदू.या काव्याकडे बघण्याची नवीन दृष्टी लाभली.अभिनंदन!
जयंत काळे म्हणाले…
प्रिय नंदू,
या काव्याकडे बघण्याची एक अनोखी दृष्टी तू दिलीस. गोविंदराव टेंबे यांचे शब्द, पंडितजींचे स्वर आणि तुझे रसग्रहण हा एक दुग्ध शर्करा योग आहे. फारच छान.👌🙏
अशोक परांजपे म्हणाले…
रसग्रहण खूप आवडले. त्यानिमित्त तुमची आध्यात्मिक वाटचाल कळली.आपले
सकौतुक अभिनंदन.
जयंत कुलकर्णी म्हणाले…
नंदुजी . तुम्ही भक्तिरस पूर्ण खूप छान रसग्रहण केले आहे. जे न देखे रवी ते कवी पाहतो, त्यामुळे या रचने कडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. अभिनंदन आणि शुभेच्छा!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी